ईशान्य भारतात अतिरेकी कारवाया करणार्‍या ‘एनएससीएन-के’ संघटनेची शांतीचर्चेत सहभागी होण्याची तयारी

गुवाहाटी – ईशान्य भारतात अतिरेकी कारवाया करणारी ‘नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागलॅण्ड-खपलांग’ (एनएससीएन-के) या संघटनेने संघर्षबंदी करून शांतीचर्चेत सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. भारत सरकार नागा समस्येवर तोडगा काढण्यासाठी गांभिर्याने प्रयत्न करताना दिसत आहे. यामुळे लवकर तोडगा निघावा यासाठी ‘एनएससीएन-के’ शांतीचर्चेचे समर्थन करीत असल्याचे या संघटनेचा नेता निकी सुमी याने घोषित केले आहे. ईशान्य भारतात पूर्णत: शांती स्थापन करण्याच्या दृष्टीने ‘एनएससीएन-के’ने संघर्षबंदीची केलेली घोषणा सरकारचे मोठे यश ठरते. कारण सरकारबरोबर शांतीचर्चेपासून अद्याप दूर असलेली भारतीय मूळाच्या नागा नेत्यांची ही शेवटची संघटना आहे. तसेच गेल्या सहा सात वर्षात याच संघटनेने ईशान्य भारतात बहुतांश हिंसक कारवाया केल्या आहेत.

म्यानमारमधील ईशान्य भारतात हिंसक कारवाया करणार्‍या ‘एनएससीएन-के’चा प्रमुख निकी सुमी याने एक पत्रक प्रसिद्ध करून संघर्षबंदीची घोषणा केली. २०१५ साली ‘एनएससीएन-के’ सरकारबरोबर याआधी झालेला संघर्षविराम मोडून मोठ्या प्रमाणावर हिंसक कारवाया सुरू केल्या होत्या. याचवर्षी मणिपूरच्या चांडेलमध्ये लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या अतिरिकी हल्ल्यात १८ जवान शहीद झाले होते. ‘एनएससीएन-के’ने घडविलेल्या या हल्ल्याच्या प्रमुख आरोपींपैकी निकी सुमी एक असून त्याच्यावर १० लाखांचे ईनामही आहे. ‘एनएससीएन‘ या संघटनेपासून वेगळे होऊन ‘एनएससीएन-के’ या संघटनेची स्थापना करणार्‍या एस.एस.खपलांग याचा २०१७ साली म्यानमारमध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतर या संघटनेचे नेतृत्व न्यमलॅण्ग कोनायक याच्याकडे आले होते. मात्र त्यानेही नागाचा आणखी एक गट असलेल्या ‘एनएससीएन-आर’मध्ये प्रवेश केला. हा गट सध्या सरकारबरोबर शांतीचर्चेत सहभागी आहे. यानंतर ‘एनएससीएन-के’चे नेतृत्व निकी सुमी याच्याकडे आले.

‘एनएससीएन-के’ संघटनेकडून गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर हिंसक कारवाया करण्यात आल्या आहेत. सरकारबरोबर शांतीचर्चेला विरोध असणार्‍या परेश बारुआच्या ‘उल्फा-आय’ संघटनेने चीन आणि म्यानमारमधून भारतविरोधी कारवाया सुरू आहेत. त्याचवेळी ‘एनएससीएन-के’कडूनही अतिरेकी कारवाया सुरू होत्या. मात्र म्यानमारच्या लष्कराच्या मदतीने गेल्या दोन वर्षात भारताने मोहिम राबवून या अतिरेकी संघटनांना मोठे दणके दिले होते. या मोहिमेमध्ये या संघटनांचे कित्येक अतिरेकी ठार झाले. यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये कित्येक अतिरेकी शरणही आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर सरकारबरोबर शांती चर्चेला आतापर्यंत जोरदार विरोध करून हिंसक मार्ग न सोडणार्‍या ‘एनएससीएन-के’नेही आता शांतीचर्चेत सहभागी होण्याची दर्शवलेल्या तयारीला या पार्श्‍वभूमीवर पाहिले जात आहे.

leave a reply