आफ्रिकेत २०१४ साली आलेली एबोलाची साथ अमेरिकी ‘लॅब’मधील अपघातामुळे

अमेरिकी संशोधकाचा दावा

Jonathan-Lathamवॉशिंग्टन – आफ्रिकेत २०१४ साली आलेल्या एबोलाच्या साथीसाठी सिएरा लिओन या देशातील अमेरिकी प्रयोगशाळेत झालेला अपघात कारणीभूत होता, असा दावा अमेरिकी संशोधकांनी केला. २०१४ ते २०१६ या काळात आलेल्या या साथीमध्ये ११ हजारांहून अधिक जण दगावले होते. आफ्रिकेत आतापर्यंत आलेल्या एबोलाच्या साथींमधील ही सर्वात मोठी साथ ठरली आहे. एबोलाचा दावा समोर येत असतानाच, अमेरिकेतील जैविक प्रयोगशाळांमध्ये गेल्या दोन दशकात शेकडो अपघात झाले असून ही बाब अमेरिकी आरोग्ययंत्रणेने लपवून ठेवल्याचे वृत्त ‘द इंटरसेप्ट’ या वेबसाईटने दिले आहे.

Ebola epidemic in Africaविस्कॉन्सिन विद्यापीठात संशोधक म्हणून काम केलेले ‘व्हायरोलॉजिस्ट’ डॉक्टर जोनाथन लॅथम व पत्रकार सॅम हुसेनी यांनी एबोला साथीसंदर्भातील दावा प्रसिद्ध केला आहे. या दाव्यात त्यांनी सिएरा लिओनमधील केनेमा भागात असलेल्या अमेरिकी लॅबचा उल्लेख करून त्यातून एबोलाचा विषाणू पसरला असावा, असे म्हटले आहे. २०१४ साली आलेल्या एबोलाच्या साथीनंतर या प्रयोगशाळेतील अनियमिततेबाबत अनेक अहवाल प्रसिद्ध झाले होते, याकडे लॅथम यांनी लक्ष वेधले. सिएरा लिओन सरकारने या लॅबला एबोलाच्या चाचण्या थांबविण्याचे आदेश दिले होते, ही बाबदेखील त्यांनी उघड केली.

epidemie-ebola२०१४ साली पश्चिम आफ्रिकेत आलेली साथ गिनिआमधील एका लहान मुलातून सुरू झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र त्याच्या संपर्कात आलेल्या वटवाघळाचा शोध घेण्यात संशोधकांना तसेच आरोग्ययंत्रणांना अपयश आले. त्याचवेळी संबंधित परिसरात असलेल्या वटवाघळांमध्येही एबोला विषाणूचा अंश आढळला नव्हता. त्यामुळे गिनिआतून साथ सुरू झाली हा दावाच चुकीचा असल्याचे लॅथम व हुसेनी यांनी म्हटले आहे. आपले संशोधन त्यांनी ‘इंडिपेंडन्ट सायन्स न्यूज’ या वेबसाईटवर प्रकाशित केले आहे. पश्चिम आफ्रिकेत यापूर्वी एबोलाचा ‘मॅकोना व्हेरिअंट’ आढळला नव्हता. असे असताना अचानक या व्हेरिअंटची साथ गिनिआसारख्या देशात कशी सुरू झाली, असा सवाल डॉक्टर लॅथम यांनी केला आहे.

सिएरा लिओनमधील प्रयोगशाळेतून विषाणू लीक झाला हे लपविण्यासाठी गिनिआमधून साथ सुरू झाल्याचा देखावा तयार केला गेला, असा आरोपही संशोधकांनी केला. गिनिआतून साथीला सुरुवात झाल्यानंतर अमेरिकेने केनेमामधील लॅबला निधी देणे बंद केले व त्याचे पुढील कंत्राटही रद्द केले याकडेही लॅथम व हुसेनी यांनी लक्ष वेधले.

दरम्यान, एबोला साथीबद्दल माहिती उघड होत असतानाच अमेरिकेतील एका वेबसाईटने देशातील जैविक प्रयोगशाळांमध्ये होणाऱ्या अपघातांचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. अमेरिकेत कार्यरत असणाऱ्या प्रयोगशाळांमध्ये गेल्या दोन दशकांमध्ये शेकडो अपघात झाले असून त्यांची माहिती ‘नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ हेल्थ’ या आघाडीच्या आरोग्ययंत्रणेने लपवून ठेवली, असे ‘द इंटरसेप्ट’ या वेबसाईटने सांगितले.

leave a reply