लष्करप्रमुखांकडून लडाखमधील संरक्षणसिद्धतेचा आढावा

नवी दिल्ली – लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी लडाखच्या एलएसीचा दौरा केला आहे. इथल्या संरक्षणसिद्धतेचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुखांचा हा दौरा असल्याचा दावा केला जातो. मुख्य म्हणजे २९-३० ऑगस्टच्या मध्यरात्री भारतीय सैनिकांनी ताब्यात घेतलेल्या ‘रेचिन ला’ टेकड्यांवरील युद्धसज्जतेचा लष्करप्रमुखांनी आढावा घेतला. चीनचे जवान या ठिकाणापासून जवळपास २०० ते ३०० मीटर अंतरापर्यंत तैनात करण्यात आलेले आहेत. हा भारताकडून चीनला देण्यात आलेला संदेश असल्याचे माध्यमांचे म्हणणे आहे.

सकाळी ८.३० मिनिटांनी लष्करप्रमुख लडाखच्या लेहमध्ये तैनात असलेल्या ‘१४ कॉर्प्स’च्या तळाला भेट दिली. लडाखच्या नियंत्रण रेषेवरील परिस्थितीचा प्रत्यक्ष अनुभव घेणे हा या दौर्‍यामागील हेतू असल्याचे लष्करातर्फे स्पष्ट करण्यात आले. यावेळी जनरल नरवणे यांनी सैनिकांशी थेट संवाद साधला. पुढच्या काळातही अशाच आवेश व जोशात काम करण्याचा संदेश लष्करप्रमुखांनी सैनिकांना दिला. तसेच सैनिकांना आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचीही लष्करप्रमुखांनी प्रशंसा केली. सैनिकांचे मनोबल अतिशय उच्च कोटीचे असल्याचा निर्वाळाही जनरल नरवणे यांनी दिला आहे.

दरम्यान, २९-३० ऑगस्टच्या मध्यरात्री भारतीय सैनिकांनी ‘रेचिन ला’, ‘मुखपरी’ आणि ‘मगर हिल’ या मोक्याच्या टेकड्यांचा ताबा घेतला होता. चिनी जवानांच्या समोर भारतीय सैनिकांनी केलेली ही आकस्मिक कारवाई थक्क करणारी होती. यावेळी चिनी जवानांनी भारतीय सैनिकांना रोखण्याचा प्रयत्न करून पाहिला, मात्र भारतीय सैनिकांनी त्याला दाद दिली नाही. यामुळे चीनचे लष्कर अचंबित झाले होते. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी याची गंभीर दखल घेऊन आपल्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांची खरडपट्टी काढली होती व काही अधिकार्‍यांवर कारवाईही केल्याच्या बातम्या आल्या होत्या. या टेकड्यांवर नियंत्रण मिळाल्यामुळे भारतीय लष्कराला या क्षेत्रातील चिनी जवानांच्या हालचालींवर नजर ठेवणे सोपे जात असल्याचे दिसत आहे. यामुळे चीनने विकसित केलेल्या ‘मोल्दो गॅरिसन’वर भारतीय लष्कराची करडी नजर रोखलेली असल्याचे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

जनरल नरवणे यांनी ‘रेचिन ला’ येथील चौकीला भेट देऊन इथल्या तयारीची पाहणी केली. तसेच तारा येथील तळालाही लष्करप्रमुखांनी भेट दिली आहे. याद्वारे भारताकडून चीनला सज्जड इशारा दिला जात आहे.

दरम्यान, भारत आणि चीनमधील हा सीमावाद सोडविण्यासाठी उभय देशांमध्ये आत्तापर्यंत पार पडलेल्या चर्चेला यश मिळालेले नाही. नजिकच्या काळात हा तणाव निवळण्याची शक्यता नाही, असे आजी-माजी लष्करी अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. भारताचे संरक्षणमंत्री व परराष्ट्रमंत्री चीनने भारताच्या विरोधात लष्करी धाडसाचा विचारही करू नये, असे वारंवार बजावत आहेत. तरीही चीनने ही आगळीक करून पाहिलीच, तर मुखभंग करणारे उत्तर भारताकडून दिले जाईल, असा इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी नुकताच दिला होता.

leave a reply