देशातील कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या २२ हजारावर

महाराष्ट्रात चोवीस तासात ७७८ नवे रुग्ण

नवी दिल्ली – गुरुवारी देशभरात लॉकडाऊनला एक महिना पूर्ण झाला. लॉकडाऊनआधी ५१९ असलेली देशातील कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या आता २२ हजारावर गेली आहे. गुरुवारी महाराष्ट्रातच ७७८ नवे रुग्ण आढळले. एकट्या मुंबईतच दिवसभरात ५२२ नवे रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या चार हजाराच्या पुढे गेली आहे.

देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २१७०० वर पोहोचल्याचे गुरुवारी सायंकाळी आरोग्य मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आले. मात्र त्यानंतर विविध राज्यांनी गुरुवारी दिवसभरात आढळलेल्या आपल्या राज्यातील या साथीच्या रुग्णांची संख्या जाहीर केली. आरोग्य मंत्रालयातर्फे जाहीर केलेली रुग्णांच्या संख्या गुरुवारी सकाळपर्यंतच्या माहितीवर आधारलेली असल्याने गुरुवारी रात्रीपर्यंत देशातील रुग्णांची संख्या २२००० च्या पुढे गेल्याचे स्पष्ट झाले. एकट्या महाराष्ट्रात दिवसभरात ७७८ नवे रुग्ण आढळले. एका दिवसात एवढे रुग्ण आढळल्याने चिंता वाढल्या आहेत. मुंबईतच ५२२ रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ६,४२७ वर पोहोचली आहे, तर मुंबईतील रुग्णांची संख्या ४,०२५ झाली आहे.

मुंबईत आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांपैकी ६३ टक्के रुग्ण आठ वॉर्डांमधील आहेत. जी साऊथ (हाजी अली ते वरळी), इ वॉर्ड (जे. जे. ते चिंचपोकळी), एल वॉर्ड (चुनाभट्टी ) के पश्चिम (विलेपार्ले पश्चिम ते ओशिवरा) एफ नॉर्थ (दादर पूर्व ते चुनाभट्टी), जी नॉर्थ (वरळी ते धरावी), डी वॉर्ड (चर्नीरोड ते हाजी अली), के पूर्व (सांताक्रूझ ते जोगश्वरी पूर्व) असे हे आठ वॉर्ड आहेत. गुरुवारी धारावीत २५ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे धारावीतील एकूण रुग्णांची संख्या २१४ झाली आहे.

महाराष्ट्रानंतर सर्वाधिक रुग्ण संख्या असलेले राज्य आता गुजरात बनले आहे. गेल्या आठवडाभरापासून गुजरातमध्ये या साथीच्या रुग्णांची संख्या सतत वाढली असून या राज्यातील रुग्णांची संख्या २४०७ वर पोहोचली आहे. गुरुवारी दिल्लीत १२८ नवे रुग्ण आढळले. यामुळे या राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २,३२४ वर गेली आहे. यानंतर राजस्थान आणि मध्य प्रदेशात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे.

लॉकडाऊनला महिना पूर्ण झाला आहे व रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र लॉकडाऊनमुळे या साथीचा वेगाने फैलाव रोखता आला आहे, असे आरोग्य मंत्रालयातर्फे सांगण्यात आले. तसेच केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाऊनमधून आणखी काही दुकानांना सूट दिली आहे. यामध्ये मोबाईल रिचार्जची दुकाने, पाठ्यपुस्तकांची दुकाने, उन्हाळा असल्याने पंख्यांची दुकाने, पिठाची चक्की यांना सवलत देण्यात आली आहे. अर्थात रेड झोनमध्ये या दुकानांना किती सूट द्यायची याचा निर्णय जारी केलेल्या दिशानिर्देशांच्या बंधनात राहून राज्यांना घ्यायचा आहे, असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे.

leave a reply