पंजाबमधील विषारी दारुच्या बळींची संख्या ८६ वर

चंदिगड – पंजाबमध्ये विषारी दारु प्यायल्याने बळी गेलेल्यांची संख्या ८६ वर पोहोचली आहे. शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसात पंजाब पोलिसांनी याप्रकरणी १०० हून अधिक ठिकाणी छापे मारले असून २५ जणांना अटक केली आहे. तसेच निष्काळजी पणाचा ठपका ठेवत आतापर्यंत सात उत्पादन शुल्क अधिकारी, सहा पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

poisonous-liquor-Punjabपंजाबच्या अमृतसर, बाटला आणि तरनतारन या तीन जिल्ह्यांमध्ये विषारी दारू प्यायल्याने नागरिकांचे बळी गेले आहेत. तरनतारनमध्ये तब्बल ६३ नागरिकांचे बळी गेले, तर अमृतसर ग्रामीण भागात १२ आणि गुरदासपूर (बटाला) येथे ११ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कालच मॅजिस्ट्रियल चौकशीचे आदेश दिले होते.

या प्रकरणी शुक्रवारी आठ जणांना अटक करण्यात आली होती. तर शनिवारी १७ जणांना अटक करण्यात आली. वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेल्या छापेमारीत सुमारे १५०० लिटर विषारी गावठी दारू जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. विषारी दारू प्यायल्याने बळी गेलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना २ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

leave a reply