भारतातील ‘ओमिक्रॉन’च्या रुग्णांची संख्या २१ वर पोहोचली

- पुण्यात सात आणि जयपूरमध्ये नऊ रुग्ण आढळले

नवी दिल्ली/पुणे/जयपूर – कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ व्हेरिअंटची संख्या देशात वाढू लागली आहे. शनिवारपर्यंत चार रुग्ण आढळले होते. मात्र रविवारी हीच संख्या २१ वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात पुण्यामध्ये ‘ओमिक्रॉन’ सात नवे रुग्ण आढळले आहेत, तर जयपूरमध्ये नऊ रुग्ण ‘ओमिक्रॉन’ पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे चिंतेमध्ये अधिकच भर पडली आहे.

भारतातील ‘ओमिक्रॉन’च्या रुग्णांची संख्या २१ वर पोहोचली - पुण्यात सात आणि जयपूरमध्ये नऊ रुग्ण आढळलेजगभरात ‘ओमिक्रॉन’ अतिशय वेगाने पसरत आहे. ४० हून अधिक देशात कोरोनाचा हा व्हेरिअंट पोहोचला असून हा व्हेरिअंट अतिशय वेगाने संसर्ग पसरविणारा असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहेत. भारतातही या व्हेरिअंटचे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. सर्वप्रथम कर्नाटकामध्ये दोन रुग्ण आढळले होते. यातील एक रुग्ण दक्षिण आफ्रिकेतून आला होता, तर दुसरा स्थानिक डॉक्टर होता. या डॉक्टरची कोणतीही परदेशी प्रवासाची किंवा कोणाच्या संपर्कात आल्याची नोंद नव्हती. त्यामुळे यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. कंेंद्रीय आरोग्य विभागांनी पाठविलेल्या सूचनांच्या आधारावर राज्यांकडून नियमावली जारी करण्यात आली आहे व परदेशातून येणार्‍या प्रवाशांवर लक्ष ठेवले जात आहे.

कर्नाटकनंतर गुजरातमध्ये आणि महाराष्ट्रात कल्याण-डोंबिवलीमध्ये एक रुग्ण आढळला होता. मात्र शनिवारपर्यंत चारवर असलेल्या ‘ओमिक्रॉन’च्या रुग्णांची संख्या रविवारी २१ वर पोहोचली आहे. दिल्लीत एक रुग्ण आढळला आहे. तर महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या आठवर गेली आहे. राज्यात पुणे जिल्ह्यात सात रुग्ण आढळले. यातील सहा रुग्ण पिंपर-चिचवड, एक रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रात आढळला.

पिंपरी-चिंचवडमध्ये आढळलेल्या रुग्णांमध्ये सहा जण एकाच कुटुंबातील आहेत. आफ्रिकन देश नायजेरमधून आपल्या दोन मुलींसह भावाला भेटण्याकरीता आलेल्या महिला ‘ओमिक्रॉन’ पॉझिटिव्ह आढळली. २४ नोव्हेंबरला ही महिला पिंपरी चिंचवडमध्ये आली होती, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. या महिलेपासून तिच्या दोन मुली, भाऊ व त्यांच्या दोन मुलीला कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ व्हेरिअंटची लागण झाली आहे. तसेच पुणे महापालिका क्षेत्रात आढळलेला ‘ओमिक्रॉन’चा रुग्ण टांझानियामधून आला होता. पुणे जिल्ह्यात नोंद झालेल्या या ‘ओमिक्रॉन’च्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या १३ जणांची आतापर्यंत ओळख पटवून चाचणी करण्यात आली आहे, असे आरोग्य विभागाने सांगितले.

रविवारी राजस्थानच्या जयपूरमध्ये ९ रुग्ण आढळले. यातील चार जण एकाच कुटुंबातील आहेत, तर ५ जण हे या रुग्णांच्या संपर्कातील असल्याचे समोर येत आहे. राजस्थानमधील हे कुटुंब नुकतेच दक्षिण आफ्रिकेहून आले होते, अशी माहिती अधिकार्‍याने दिली. देेशात ‘ओमिक्रॉन’च्या रुग्णांची संख्या वाढत असताना तिसर्‍या लाटेचा धोका व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सर्वच स्तरावर प्रतिबंधक नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे. देशात काही राज्यात पुन्हा कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत. या राज्यांमध्ये वाढत असलेल्या पॉझिटिव्ह दरावर आधीच केंद्राने चिंता व्यक्त केली असून खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. कर्नाटकात चिकमंगळुरू येथील एकाच विद्यालयातील ५९ विद्यार्थ्यांसह एकूण ६९ जण कोरोनाबाधीत आढळले आहेत.

या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना कोरोनाचा बुस्टर डोस देण्यात यावा का? यावर विचार सुरू झाला आहे. बुस्टर डोस देण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी तज्ज्ञांची एक बैठक लवकरच पार पडणार आहे. नुकतेच संशोधकांच्या पॅनलने सरकारला ४० वर्षांवरील नागरिकांना बुस्टर डोस देण्याची शिफारस केली होती. या पार्श्‍वभूमीवर ही बैठक पार पडत आहे.

leave a reply