ओमिक्रॉन व्हेरिअंटमुळे जगभरातील रुग्णसंख्येत भयावह वाढ

- अमेरिकेत २४ तासात पाच लाख रुग्ण आढळले

वॉशिंग्टन/लंडन – कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिअंटने जगभरात हाहाकार उडविल्याचे चित्र समोर येत आहे. अमेरिकेत सोमवारी २४ तासांच्या अवधीत कोरोनाचे तब्बल पाच लाख रुग्ण आढळल्याचे सांगण्यात येते. तर ब्रिटन, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, पोलंड, ऑस्ट्रेलिया, युएई या देशांमध्ये विक्रमी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाझेशन’ने (डब्ल्यूएचओ) ओमिक्रॉनचा धोका वाढल्याचे सांगून एका आठवड्यात रुग्णसंख्येत ११ टक्क्यांची भर पडल्याचे बजावले.

पाच लाख रुग्णगेल्या महिन्यात आफ्रिका खंडात आढळलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिअंटचा १०० हून अधिक देशांमध्ये फैलाव झाला आहे. अमेरिका व युरोपातील अनेक देशांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिअंट हा ‘डॉमिनंट स्ट्रेन’ म्हणून समोर येत आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेत आढळलेल्या एकूण रुग्णसंख्येत ५८ टक्क्यांहून अधिक रुग्ण ओमिक्रॉनचे होते, अशी माहिती स्थानिक आरोग्ययंत्रणांनी दिली. ओमिक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे रुग्णसंख्येत अतिशय वेगाने भर पडत असून गेल्या आठवड्यात दरदिवशी सरासरी नऊ लाख, ३५ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाल्याचे ‘एएफपी’ या वृत्तसंस्थेने सांगितले.पाच लाख रुग्ण

अमेरिका हा सर्वाधिक वेगाने रुग्णसंख्या वाढणारा देश ठरला आहे. मंगळवारी संपलेल्या आठवड्यात अमेरिकेत दररोज सरासरी दोन लाख, ५४ हजार, ४९६ रुग्णांची नोंद झाली आहे. ही सरासरी या वर्षातील रेकॉर्ड रुग्णसंख्या असल्याचे सांगण्यात आले. वेगाने वाढणार्‍या सरासरीच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेतील एकूण रुग्णसंख्या पाच कोटी २७ लाखांवर गेली आहे. कोरोनाच्या साथीत अमेरिकेत आतापर्यंत आठ लाख, १८ हजारांहून अधिक जण दगावले आहेत. अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५० लाखांवर गेली आहे.

अमेरिकेपाठोपाठ याचा सर्वाधिक फटका युरोपिय देशांना बसला आहे. फ्रान्समध्ये रुग्णसंख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. मंगळवारी २४ तासांमध्ये फ्रान्समध्ये कोरोनाचे सुमारे एक लाख, ८० हजार रुग्ण आढळले आहेत. स्पेनमध्येही एका दिवसात जवळपास एक लाख रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली. ब्रिटनमध्ये एक लाख, ३० हजार रुग्णांची नोंद झाली असून पोर्तुगाल व पोलंडमध्ये कोरोनाच्या नव्या लाटेतील सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदविण्यात आली आहे. ‘डब्ल्यूएचओ’ने दिलेल्या माहितीनुसार, २० ते २६ डिसेंबर या कालावधीत जगभरात आढळलेल्या एकूण रुग्णसंख्येपैकी ५० टक्क्यांहून अधिक रुग्ण युरोपिय देशांमधील आहेत.

पाच लाख रुग्णअमेरिका व युरोपपाठोपाठ आशियाई देश तसेच ऑस्ट्रेलियामध्ये रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसून आली आहे. आखातातील युएईमध्ये २४ तासांमध्ये दोन हजार रुग्णांची भर पडली आहे. ऑस्ट्रेलियात एका दिवसात १५ हजार रुग्णांची नोंद झाली असून एकट्या ‘न्यू साऊथ वेल्स’ प्रांतात ११ हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. जगातील अनेक देशांमध्ये ओमिक्रॉन यापूर्वीच्या डेल्टा व्हेरिअंटपेक्षा अधिक वेगाने फैलावत असून ओमिक्रॉनचा धोका वाढतो आहे, असा इशारा ‘डब्ल्यूएचओ’ने दिला आहे.

leave a reply