फिलिपाईन्समध्ये चीनविरोधात निदर्शने

मनिला – फिलिपाईन्सच्या सागरी व हवाईहद्दीत घुसखोरी करणार्‍या चीनच्या विरोधात फिलिपिनो जनतेत असलेला रोष शिगेला पोहोचला आहे. दोन दिवसांपूर्वी 123व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने फिलिपाईन्समध्ये जनतेने शेकडोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून चीनच्या घुसखोरीविरोधात जोरदार निदर्शने केली. ही निदर्शने म्हणजे वसाहतवादी आणि परदेशी हल्लेखोरांना दिलेला इशारा असल्याचे निदर्शकांच्या आयोजकांनी बजावले आहे. त्याचबरोबर फिलिपाईन्स सीमधील घुसखोरीप्रकरणी चीनविरोधात मवाळ भूमिका घेणारे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुअर्ते यांच्यावरही निदर्शकांनी टीका केली आहे.

फिलिपाईन्समध्ये चीनविरोधात निदर्शनेस्पेनच्या वसाहतवाद्यांपासून फिलिपाईन्सला मिळालेल्या स्वातंत्र्याला 123 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने शनिवारी फिलिपाईन्सच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पण या कार्यक्रमांना गर्दी करण्याऐवजी फिलिपिनो जनतेने रस्त्यावर उतरून चीनविरोधात निदर्शने केली. मनिलामधील चीनच्या दूतावासासमोर जोरदार घोषणाबाजी केली. चीनच्या जहाजांनी फिलिपाईन्सच्या हद्दीतून चालते व्हावे, वेस्ट फिलिपाईन्स सागरी क्षेत्रावर फिलिपाईन्सचाच हक्क आहे, असे फलक यावेळी निदर्शकांनी उंचावले.

तर फिलिपाईन्समधील विद्यार्थी, शेतकरी, मच्छिमार, संशोधक आणि निदर्शकांनी मकाती शहरातील चीनच्या उच्चायुक्तालयासमोर राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांच्याविरोधात निदर्शने केली. चीनच्या घुसखोरीला उत्तर देण्यासाठी आणि फिलिपाईन्सच्या सार्वभौमत्वाच्या सुरक्षेसाठी देशाला प्रखर राष्ट्रवादी नेत्याची गरज असल्याच्या घोषणा यावेळी निदर्शकांनी दिल्या. गेली काही वर्षे दुअर्ते यांचे धोरण चीनधार्जिणे बनल्याची टीका फिलिपाईन्समधील नेते तसेच जनता आणि माध्यमे करीत आहेत.

leave a reply