अमेरिका-चीन संबंधांत तैवानच्या मुद्याला प्राधान्य नको

-अमेरिकेचे ज्येष्ठ मुत्सद्दी हेन्री किसिंजर यांचा सल्ला

डॅव्होस – ‘तैवानच्या मुद्यावर अमेरिका व चीनने थेट संघर्ष टाळायला हवा. अमेरिका व चीनमधील राजनैतिक वाटाघाटींमध्ये तैवानच्या मुद्याला प्राधान्य असू शकत नाही’, असा सल्ला अमेरिकेचे ज्येष्ठ मुत्सद्दी हेन्री किसिंजर यांनी दिला. चीनने तैवानवर हल्ला चढविलाच तर अमेरिका तैवानच्या रक्षणासाठी आपले लष्कर तैनात करील, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी नुकताच केला होता. यावर चीनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. अमेरिकेने तैवानच्या स्वातंत्र्याचा बचाव करु नये, असा इशारा चीनच्या परराष्ट्र विभागाने दिला होता.

US-China-relationsडॅव्होसमधील ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या बैठकीत किसिंजर यांनी अमेरिका-चीनमधील संबंधांवर आपली भूमिका मांडली. ‘अमेरिका व चीनने वाटाघाटी करताना दोन देशांमधील संबंधांमध्ये वैमनस्य आणणाऱ्या मुद्यांवरील चर्चेला प्राधान्य द्यायला हवे. हे करताना द्विपक्षीय सहकार्य कायम राहिल, यासाठी थोडी जागा ठेवायला हवी. अमेरिका व चीनने परस्परांमधील शत्रुत्त्व मिटविण्यासाठी पावले उचलणे हे संपूर्ण जगाच्या शांततेसाठी महत्त्वाचे आहे’, असे आवाहन किसिंजर यांनी केले.

US-Chinaअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी सत्तेवर आल्यानंतर, चीन-तैवान संघर्षाच्या मुद्यावर अमेरिका तैवानच्या सुरक्षेची काळजी घेईल, अशा स्वरुपाची वक्तव्ये वारंवार केली आहेत. त्यांच्या वक्तव्यानंतर अमेरिकेचा संरक्षण विभाग तसेच व्हाईट हाऊसकडून खुलासेही करण्यात आले आहेत. या खुलाशांमध्ये ‘वन चायना पॉलिसी’ व ‘तैवान रिलेशन्स ॲक्ट’ नुसार अमेरिका पावले उचलेल, असे वारंवार स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र अमेरिकी राष्ट्राध्यक्षांकडून वारंवार होणारी वक्तव्ये, अमेरिका चीनबाबतचे आपले धोरण बदलत असल्याचे संकेत देत असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. अमेरिकेबरोबरच जपान व ऑस्ट्रेलिया या मित्रदेशांनीही तैवानच्या मुद्यावर चीनविरोधातील धोरण अधिक आक्रमक केल्याचे समोर आले आहे.

या पार्श्वभूमीवर, अमेरिका व चीनमध्ये राजनैतिक संबंधांसाठी पुढाकार घेणारे प्रमुख मुत्सद्दी अशी ओळख असणाऱ्या किसिंजर यांचा सल्ला लक्ष वेधून घेणारा ठरतो. डॅव्होसमधील कार्यक्रमात किसिंजर यांनी रशिया-युक्रेन युद्धावरही खळबळजनक वक्तव्य केले होते. रशियाबरोबर शांतता हवी असेल तर युक्रेनने आपला थोडा भूभाग रशियाला द्यायला हवा, असे हेन्री किसिंजर म्हणाले होते.

leave a reply