पाकिस्तानची १५० अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती पडतील

- अमेरिकेच्या माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचा इशारा

वॉशिंग्टन – ‘अफगाणिस्ताननंतर तालिबान पाकिस्तानचा ताबा घेईल. यामुळे पाकिस्तानकडे असलेली १५० अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती पडतील’, असा खळबळ माजविणारा इशारा अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी दिला. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी अफगाणिस्तानातून घेतलेल्या माघारीचे हे भयंकर दुष्परिणाम संभवतात, असे सांगून बोल्टन यांनी त्यावर सडकून टीका केली. माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ही चिंता व्यक्त करीत असताना, अमेरिकन कॉंग्रेसच्या ‘रिसर्च सर्व्हिस’ने पाकिस्तानात सुमारे १२ परदेशी संघटना सक्रीय असल्याचा विस्तृत अहवाल दिला आहे.

पाकिस्तानची १५० अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती पडतील - अमेरिकेच्या माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचा इशारातालिबानचा कडवा समर्थक असलेल्या पाकिस्तानच्या मौलाना अब्दुल अझिज याने लवकरच कट्टरपंथिय पाकिस्तानचा ताबा घेतील, असे जाहीर केले होते. अफगाणिस्तानात तालिबानला मिळालेले यश पाकिस्तानात मोठ्या जल्लोषात साजरे करण्यात आले होते. तालिबानचीच एक शाखा मानली जाणारी ‘तेहरिक-ए-तालिबान’ संघटनेने पाकिस्तानात आपली राजवट आणण्याची जोरदार तयारी केलेली आहे. पाकिस्तानी माध्यमांनी आपला उल्लेख दहशतवादी असा करता कामा नये, अशी धमकीही ‘तेहरिक’ने दिली आहे. त्याचवेळी अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या कारवाया अधिकच तीव्र झाल्याचे दिसत आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर हे सारे बदल टिपले जात असून अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी याबाबत जगाचा थरकाप उडविणारा इशारा दिला. ‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी एकाएकी अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेतल्याने, तालिबानला सहजपणे अफगाणिस्तानचा ताबा मिळाला. यामुळे तालिबानचे पुढचे लक्ष्य पाकिस्तानचा ताबा हे असेल. एकदा पाकिस्तान तालिबानच्या ताब्यात गेला की या देशाकडे असलेली सुमारे १५० अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती पडतील’, अशी गंभीर चिंता बोल्टन यांनी व्यक्त केली. एका रेडिओवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोल्टन यांनी हा इशारा दिला. याआधीही पाकिस्तानची अण्वस्त्रे दहशतवाद्यांपासून असुरक्षित असल्याची बाब समोर आली होती. पाकिस्तानी लष्करातच दहशतवादी मानसिकता असलेल्या काहीजणांचा समावेश असून त्यांच्यामुळे पाकिस्तानची अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती जातील, अशी चिंता काहीजणांनी व्यक्त केली होती. पाकिस्तान आपली अण्वस्त्रे सुरक्षित असल्याचे कितीही दावे करीत असला तरी त्यावर विश्‍वास ठेवण्यासारखी परिस्थिती नसल्याचे अनेकवार उघड झाले होते.

पाकिस्तानची १५० अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती पडतील - अमेरिकेच्या माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचा इशाराअफगाणिस्तानचा ताबा तालिबानकडे गेल्यानंतर, त्यापासून प्रेरणा घेऊन तेहरिक तसेच अन्य दहशतवादी संघटनांनी पाकिस्तानात कट्टरपंथियांची राजवट आणण्याची तयारी सुरू केली आहे. मौलाना अब्दुल अझिज याने दिलेला इशारा याची साक्ष देत आहे. यामुळे पाकिस्तानची अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती पडण्याचा धोका अधिकच तीव्र झाला आहे.

जॉन बोल्टन पाकिस्तानच्या अण्वस्त्रांबाबत ही चिंता व्यक्त करीत असताना, अमेरिकन संसदेच्या ‘कॉंग्रेशनल रिसर्च सर्व्हिस’ने (सीआरएस) पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या सुळसुळाटावर प्रकाश टाकणारा अहवाल प्रसिद्ध केला. यानुसार पाकिस्तानात सुमारे १२ परदेशी दहशतवादी संघटना सक्रीय आहेत. यामध्ये अल कायदा व हक्कानी नेटवर्कचा समावेश आहे. तसेच भारतात घातपात माजविणार्‍या ‘लश्कर-ए-तोयबा’, ‘जैश-ए-मोहम्मद’, ‘हिजबुल मुजाहिद्दीन’, ‘हुजी’, यांचा समावेश आहे. तसेच ‘आयएस-खोरासान’ ‘जंदुल्लाह’, ‘सिपाह-ए-साहबा’, ‘लश्कर-ए-झांगवी’ व या दहशतवादी संघटनांही पाकिस्तानात सक्रीय असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, भारतानेही संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत पाकिस्तानी अण्वस्त्रांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. थेट पाकिस्तानचा नामोल्लेख टाळून भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रिंगला यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाने अण्वस्त्रांबाबत अधिक सजगता दाखविण्याची गरज असल्याचे बजावले आहे.

leave a reply