पाकिस्तानने दाऊद इब्राहिमच्या कराचीमधील वास्तव्याची कबुली दिली

इस्लामाबाद – १९९३ सालच्या मुंबई बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार आणि भारताच्या मोस्ट वाँटेड यादीत असलेला ‘दाऊद इब्राहिम कासकर’ हा पाकिस्तानच्या कराची शहरातच राहत असल्याची कबुली पाकिस्तानने दिली आहे. गेली कित्येक वर्षे भारताने पुरावे देऊनही, ‘दाऊद आपल्या देशात नाही’, अशी नकारघंटा पाकिस्तानने वाजविली होती. मात्र, ‘एफएटीएफ’कडून ब्लॅकलिस्ट होण्याची शक्यता बळावल्यामुळे पाकिस्तानला हे मान्य करावे लागले आहे. दाऊदबरोबर ‘लश्कर-ए-तोयबा’चा प्रमुख हफीझ सईद तसेच मौलाना मसूद अझहर यांच्याबरोबर किमान ८८ दहशतवाद्यांवर पाकिस्तानने निर्बंध लादले आहेत.

दाऊद इब्राहिम

दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यात टाळाटाळ केल्याचा आरोप करून पॅरिसस्थित ‘फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स’ने (एफएटीएफ) २०१८ साली पाकिस्तानला ‘ग्रे लिस्ट’मध्ये टाकले होते. त्याचबरोबर पाकिस्तानने २०१९ सालच्या अखेरीपर्यंत संबंधित दहशतवादी आणि त्यांच्या संघटनांवर कारवाई करण्यात कुचराई केली तर पाकिस्तानला थेट काळ्या यादीत टाकण्याचा इशारा ‘एफएटीएफ’ने दिला होता. पण कोरोनाव्हायरसच्या महामारीमुळे पाकिस्तानवरील ही कारवाई पुढे ढकलण्यात आली होती. मात्र पाकिस्तानने अजूनही या दहशतवाद्यांवर आणि त्यांच्या संघटनांवर कारवाई केलेली नाही. त्यामुळे ‘एफएटीएफ’च्या पुढच्या बैठकीत पाकिस्तान ब्लॅकलिस्ट होणे अटळ असल्याचे बोलले जाते. असे झाले तर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरातून मिळणारे आर्थिक सहाय्य बंद होऊ शकते. यामुळे आधीच गाळात रुतलेली पाकिस्तानची अर्थव्यवस्था अधिकच संकटात सापडेल, असे बोलले जाते.

या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकारने ८८ दहशतवाद्यांवर आर्थिक निर्बंध लादल्याची माहिती पाकिस्तानतील माध्यमे देत आहेत. यामध्ये जमात-उद-दवा, जैश-ए-मोहम्मद, तालिबान, आयएस, हक्कानी गट, अल कायदा आणि इतर काही दहशतवादी संघटनांचे प्रमुख किंवा दहशतवाद्यांचा समावेश आहे. दाऊद इब्राहिम, हफीझ सईद, मसूद अझहर, मुल्ला फझलुल्ला, झकीर उर रेहमान लख्वी, जलालुद्दिन हक्कानी, याह्या हक्कानी, खलिल अहमद हक्कानी, मुहम्मद याह्या मुजाहिद, नूर वली मेहसूद अशा मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांचा समावेश आहे. पाकिस्तानने टाकलेल्या आर्थिक निर्बंधांप्रमाणे या दहशतवाद्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्यात आले असून त्यांची खातीही गोठविण्यात येणार आहे.

या यादीतील दाऊद इब्राहिमचा समावेश आणि कराचीतील त्याच्या तीन बंगल्यांचा पत्ता पाकिस्तानचा मुखवटा टराटरा फाडणारा ठरला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून भारताने दाऊदच्या कराचीतील मालमत्तेची पत्त्यासह माहिती व पुरावे पाकिस्तानला सुपूर्द केले होते. पण पाकिस्तानने दरवेळी भारताचे पुरावे नाकारुन दाऊद पाकिस्तानात नसल्याचा बनाव केला होता. पण आता पाकिस्तानला स्वत:हूनच त्याची कबुली द्यावी लागली आहे.

leave a reply