‘एलएसी’ स्पष्ट करण्याची प्रक्रिया सुरु केल्यास नवा वाद निर्माण होईल

- भारतातील चीनच्या राजदूतांचा दावा

नवी दिल्ली – भारत आणि चीनमधील ‘लाईन ऑफ अ‍ॅक्च्युअल कन्ट्रोल’ (एलएसी) स्पष्ट करण्याची प्रक्रिया सुरु करण्याचा चीनचा कोणताही विचार नाही. कारण यामुळे वाद वाढण्याची शक्यता आहे, असा दावा चीनचे भारतातील राजदूत सन वेईडोन्ग यांनी केला आहे. नियंत्रण रेषेबाबतचे दावे आणि नियंत्रण रेषा स्पष्ट करण्यासाठी नकाशाच्या अदलाबदलीच्या प्रक्रियेवर भारताकडून जोर दिला जात असल्याच्या बातम्या आल्या होत्या. यापार्श्वभूमीवर चीनच्या राजदूतांचे हे विधान केले आहे.

LACचीन पॅंगोन्ग त्सो सरोवराच्या भागातून आपले जवान अजून मागे घेतलेले नाहीत. मात्र चिनी राजदूतांनी ‘इंस्टिट्यूट ऑफ चाइनीज स्टडीज’च्या वेबिनारमध्ये बोलताना ‘एलएसी‘ वरील बहुतांश भागातून दोन्ही देशांचे सैनिक मागे गेले असून तणाव निवळला असल्याचा दावा केला. भारताने तत्काळ हे दावे फेटाळून लावले आहेत. या आधीही चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून असाच दावा करण्यात आला होता. चीनचे राजदूत वेईडोन्ग यांनी याचा पुरुच्चार करून भारतीय सैनिकांनीच ‘एलएसी’ ओलांडून चीनच्या क्षेत्रात घुसू नये, अशी उलटी अपेक्षा व्यक्त केली. तसेच चिनी सैनिक पॅंगोन्ग त्सो सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर आपल्या पारंपरिक क्षेत्रातच गस्त घालीत असल्याचा दावा केला.

मात्र ‘एलएसी’ स्पष्ट करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरु करण्याच्या पक्षात चीन नसल्याचे वेईडोन्ग म्हणाले. यामुळे नवा वाद निर्माण होईल, असा दावा त्यांनी केला. भारत आणि चीनमधील सीमा रेषा अस्पष्ट असल्याने चीन आतापर्यंत याचा सतत गैरफायदा घेत आला आहे. ही बाब चीनच्या विस्तारवादी वृत्तीला फायदेशीर ठरते, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. मात्र गलवान व्हॅलीतील संघर्षानंतर भारत अधिक आक्रमकपणे चीनला नियंत्रण रेषेबाबतचे दावे स्पष्ट करावेत, अशी मागणी करीत आहे. चीनबरोबर नकाशाची अदलाबदली करण्यावर भर दिला जात आहे. यामुळे चीनचे वास्तविक नियंत्रण रेषेबाबतचे दावे स्पष्ट होतील.

मात्र चीन आतापर्यंत या क्षेत्रातील आपल्या दाव्यानुसार नकाशाचे देवाणघेवाण करणे टाळत आला आहे. चीनबरोबर सीमावाद सोडवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत चर्चेच्या २२ फेऱ्या झाल्या आहेत. मात्र एलएसी स्पष्ट करण्यासाठी चीनची इच्छा दिसून आलेली नाही. त्यामुळे इतक्या टप्प्यातील चर्चेनंतरही काहीही साध्य झालेले नाही. नकाशाची अदलाबदल करण्याची चीनची ही टाळाटाळच चीनच्या मनीषेबाबत शंका उपस्थित करते. प्रत्यक्ष स्थितीत बदल करता यावा यासाठी चीन आपले दावे स्पष्ट करीत नसल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. चीनचे भारतातील राजदूत वेईडोन्ग यांच्या ‘एलएसी’ स्पष्ट झाल्यास नवे वाद निर्माण होतील या दाव्यातून ही बाब अधिक ठळकपणे स्पष्ट होते.

दरम्यान, भारताने चिनी ॲप्सवर टाकलेली बंदी, चीनच्या उत्पादनांवर बहिष्काराची मोहीम, चिनी गुंतवणुकीला रोखण्यासाठी भारताने घेतलेल्या निर्णयातून चीनला जोरदार झटके मिळत आहे, हे चीनच्या राजदूतांच्या इतर दाव्यावरून स्पष्ट झाले आहे. भारत आणि चीनची अर्थव्यवस्था एकमेकांना पूरक आणि एकमेकांवर अवलंबून आहे. त्यामुळे हे संबंध जबरदस्तीने तोडण्याचा प्रयत्न केल्यास दोघांनाही नुकसान होईल, असा दावा वेईडोन्ग यांनी केला आहे.

leave a reply