पाकिस्तानची चीनकडे आणखी कर्जाची मागणी

इस्लामाबाद – ‘चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’साठी (सीपीईसी) पाकिस्तान चीनकडून २.७ अब्ज डॉलर्सचे नवे कर्ज घेणार आहे. ‘सीपीईसी’ अंतर्गत पेशावर ते कराचीपर्यंत रेल्वे लाईन विस्तारीत करण्यासाठी पाकिस्तानने हे कर्ज मागितल्याचे सांगितले जाते. पण प्रत्यक्षात पाकिस्तान या पैशांनी सौदी अरेबिया आणि कतारकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करणार असल्याचे दावे केले जात आहेत.

पाकिस्तानची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. देशात महागाईचा आगडोंब उसळल्यामुळे जनता इम्रान खान यांच्या सरकारवर संतापली आहे. त्यात कोरोनाव्हायरसच्या संकटामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचे आणखीनच तीन तेरा वाजले. अशा परिस्थितीत सौदी अरेबिया आणि कतारने पाकिस्तानकडे आपण दिलेली कर्जे चुकती करण्यास सांगितले आहे. पाकिस्तान तुर्की आणि इराणबरोबर जवळीक साधत असल्याच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबिया खवळला आहे. यामुळे सौदी आणि पाकिस्तानचे संबंध ताणले गेले असून सौदी अरेबियाने कर्जाची परतफेड करण्यास पाकिस्तानला बजावले होते.

दोनच दिवसांपूर्वी पाकिस्तान सौदीने दिलेल्या कर्जापैकी दोन अब्ज डॉलर्सच्या कर्जाची परतफेड करणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पाकिस्तानच्या परकीय गंगाजळीत वाढ झाल्याचे सांगण्यात आले असून त्यातून ही परतफेड केली जाणार असल्याचे बोलले जाते. पण प्रत्यक्षात पाकिस्तान त्यासाठी चीनकडून कर्ज घेणार असल्याचे बोलले जाते.

‘सीपीईसी’ अंतर्गत पेशावर ते कराचीपर्यंतच्या रेल्वे मार्गाच्या विस्तारासाठी पाकिस्तानला निधीची गरज भासत असल्याचे चित्र पाकिस्तान उभे करीत आहे आणि यासाठी चीनकडून २.७ अब्ज डॉलर्सच्या वाढीव कर्जाची मागणी करण्यात आली आहे. २०२० सालच्या एप्रिल महिन्यापर्यंत चीनने पाकिस्तानला दिलेल्या कर्जाची रक्कम ३० अब्ज डॉलर्सवर पोहोचली होती. यातील बरेचसे कर्ज ‘सीपीईसी’च्या नावाखाली घेतले गेले आहे.

पाकिस्तान चीनच्या कर्जाच्या जाळ्यात पुरता अडकला आहे. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची स्थिती पाहता चीनचे हे कर्ज फेडायला पाकिस्तानला ४० वर्ष लागतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या कर्जाच्या मोबदल्यात चीन पाकिस्तानची प्रचंड प्रमाणात पिळवणूक करील. मात्र सौदी आणि इतर आखाती देशांबरोबर संबंध बिघडविण्याचे आत्मघाती धोरण स्वीकारलेल्या इम्रान खान यांच्या सरकारसमोर दुसरा पर्यायच राहिलेला नाही. म्हणूनच अगतिकतेपोटी पाकिस्तानचे इम्रान खान सरकार चीनकडून हे कर्ज घेत आहे. असा दावा पाकिस्तानी पत्रकार करीत आहेत.

leave a reply