पाकिस्तान सरकारने भारताबाबतचे वास्तव स्वीकारावे

- पाकिस्तानच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांचा इम्रान खान सरकारला टोला

इस्लामाबाद – ‘भारत संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य बनणे मोठी बाब नाही. पण भारताला संयुक्त राष्ट्रसंघात १९२ पैकी १८४ मते मिळणे ही मोठी बाब ठरते. पाकिस्ताच्या मित्रदेशानेही भारताच्या बाजूने मतदान केले. आता तरी वास्तव स्वीकारा’, असा टोला पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री ख्वाजा असिफ यांनी पंतप्रधान इम्रान खान यांना लगावला. इतकेच नाही तर पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणापासून ते अर्थव्यवस्था आरोग्य यंत्रणा सारे काही कोलमडले आहे, असेही ख्वाजा असिफ पुढे म्हणाले.

Pakistan-Indiaकाही दिवसांपूर्वीच भारताला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्यत्व मिळाले.यासाठी भारताला १८४ मते मिळणे ही फार मोठी बाब ठरते. यावरुन भारताची राजकीय ताकद वाढत आहे, हे मान्य करावेच लागेल, असे ख्वाजा असिफ यांनी स्पष्ट केले. भारताला संयुक्त राष्ट्रसंघाचे अस्थायी सदस्यत्व मिळाल्यानंतर पाकिस्तान नाराज झाला होता. पाकिस्तानने भारताला शुभेच्छाही दिल्या नव्हत्या. उलट पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी पाकिस्तानवर याचा काहीही परिणाम होणार नाही, असे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर ख्वाजा असिफ यांनी पाकिस्तान सरकारला वास्तव स्वीकारण्याचा सल्ला दिला आहे.

पाकिस्तानच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांनी इतर मुद्द्यांवरुनही पाकिस्तानच्या सरकारला फटकारले. पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण सपशेल अपयशी ठरल्याची जळजळीत टीका ख्वाजा असिफ यांनी केली. पाकिस्तानची आरोग्य यंत्रणा आणि अर्थव्यवस्था कोलमडल्याचेही असिफ यांनी सांगितले. दरम्यान, आधीच कोरोनाव्हायरसच्या साथीने पाकिस्तान हैराण झाला आहे. पाकिस्तानसारख्या गरीब देशाला लॉकडाऊन करणे परवडणार नाही, असे पंतप्रधान इम्रान खान यांनी स्पष्ट केले होते. पण आता पाकिस्तानात कोरोनाचा विस्फोट झाल्यावर इम्रान खान यांना विरोधी पक्षाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

leave a reply