अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री भारतात दाखल

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्रीनवी दिल्ली – अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन भारताच्या दोन दिवसांच्या दौर्‍यावर आले आहेत. भारत व अमेरिका आत्ताच्या काळातील आव्हानांविरोधात सहकार्य करीत आहेत. भारत व अमेरिकेमधील भागीदारी अतिशय महत्त्वाची, भक्कम आणि अधिकाधिक फलदायी ठरणारी असल्याचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी म्हटले आहे. ज्यो बायडेन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर आल्यानंतर, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताला सहकारी देश न म्हणता भागीदार देश म्हणून भारताचा उल्लेख केला जात आहे. ही बाब अमेरिकेच्या धोरणात झालेल्या बदलाचे संकेत देत असल्याची नोंद काही विश्‍लेषकांनी केली होती.

दोन दिवसांच्या या भेटीत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. लवकरच भारत व अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री व संरक्षणमंत्र्यांमध्ये ‘टू प्लस टू’ चर्चा पार पडेल. याची पूर्वतयारी म्हणूनही ब्लिंकन यांच्या या भारतभेटीकडे पाहिले जाते. पण अफगाणिस्तानातील परिस्थिती हा ब्लिंकन यांच्या दौर्‍यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरेल, असे दावे केले जातात. विशेषतः पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे सुरक्षित स्वर्ग हा आता भारताबरोबरच अमेरिकेच्याही चिंतेचा विषय बनला आहे. त्यावरही दोन्ही देशांचे परराष्ट्रमंत्री सखोल चर्चा करणार असल्याचे सांगितले जाते.

याबरोबरच चीनपासून संभवणार्‍या धोक्याचा मुद्दा या चर्चेत अग्रक्रमावर असेल, असे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने तसे संकेत दिले. मुक्त व स्वतंत्र इंडो-पॅसिफिक क्षेत्राबाबतचे भारत आणि अमेरिकेचे धोरण एकसमान असल्याचा दावा अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. त्यामुळे या सागरी क्षेत्राला चीनपासून असलेल्या धोक्यावर तसेच चीनच्या वर्चस्ववादी धोरणावरही परराष्ट्रमंत्री जयशंकर व परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांच्यात चर्चा होणार असल्याचे उघड होत आहे.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री भारताच्या दौर्‍यावर येत असताना, भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग ताजिकिस्तानच्या दौर्‍यावर गेले आहेत. अफगाणिस्तानच्या प्रश्‍नावर ‘शंघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन-एससीओ’च्या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंग सहभागी होती. त्याचवेळी सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री पाकिस्तानच्या येणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. तर पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ व आयएसआयचे प्रमुख फैज हमिद अमेरिकेला जाणार असल्याच्या बातम्या येत आहेत. हे दौरे व गाठीभेटी यांच्यामागे अफगाणिस्तानातील उलथापालथी असल्याचे स्पष्टपणे दिसते आहे.

अफगाणिस्तानचे लष्करप्रमुख देखील मंगळवारीच भारतात येणार होते. मात्र अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री भारताच्या दौर्‍यावर असताना, अफगाणी लष्करप्रमुखांची भारतभेट अमेरिकेने अफगाणिस्तानला सूचना देऊन पुढे ढकलल्याचा दावा पाकिस्तानच्या पत्रकारांनी केला आहे.

leave a reply