अमेरिका-इराण अणुकरारामुळे इस्रायलचे हात बांधले जाणार नाहीत

- इस्रायलमधील अमेरिकेच्या राजदूतांची प्रतिक्रिया

जेरूसलेम – ‘अमेरिका आणि इराणमध्ये अणुकरार झाला तरी इस्रायलचे हात या कराराने बांधले जाणार नाहीत. इस्रायल आपल्या सुरक्षेसाठी आवश्यक ती कारवाई करू शकतो’, अशी प्रतिक्रिया इस्रायलमधील अमेरिकेचे राजदूत टॉम नाइड्स यांनी दिली. चार दिवसांपूर्वीच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी इस्रायलचा दौरा केला होता. इराणबरोबरील अणुकरारावर इस्रायलला आश्‍वस्त करण्यात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अपयशी ठरल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्‍लेषकांनी केला होता. त्यानंतर अमेरिकेकडून ही प्रतिक्रिया येत आहे.

इस्रायलचे हातइराण व पाश्‍चिमात्य देश अणुकराराच्या अगदी समीप पोहोचल्याच्या बातम्या येत आहेत. या अणुकरारासाठी बायडेन प्रशासनाने इराणच्या प्रमुख मागण्या मान्य केल्याचे आरोप तीव्र होऊ लागले आहेत. यामुळे इस्रायल व इराणच्या विरोधात खडे ठाकलेले आखाती देश नाराज झाले आहेत. त्यांना आश्‍वस्त करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी गेल्या आठवड्यात इस्रायलसह आखाती देशांचा दौरा केला होता.

पण काहीही झाले तरी इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ दिले जाणार नाही. त्यासाठी इस्रायल कुठलीही किंमत मोजायला तयार आहे, असे इस्रायलने याआधी बजावले होते. त्याचबरोबर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांच्या इस्रायल भेटीतही इस्रायलने हीच भूमिका मांडली. इराणचा अणुकार्यक्रम रोखण्यासाठी इस्रायल लष्करी कारवाईचा पर्याय वापरताना कचरणार नाही, असा इशारा पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनीही दिला होता.

यानंतर ब्लिंकन यांनी इस्रायलकडे इराणच्या अणुकराराला पर्याय सुचविण्याची मागणी केल्याच्या बातम्या अमेरिकन माध्यमांनी प्रसिद्ध केल्या होत्या. पण अणुबॉम्ब निर्मितीच्या जवळ पोहोचलेल्या इराणच्या अणुकार्यक्रमाला कुठलाही पर्याय नसल्याचे इस्रायलने याआधीच स्पष्ट केले होते. अशा परिस्थितीत, इस्रायलमधील अमेरिकेचे राजदूत टॉम नाइड्स यांनी इस्रायली वृत्तवाहिनीशी बोलताना, इराणवर कारवाई करण्यासाठी इस्रायल मोकळा असल्याचे सांगितले. अमेरिकेचा अणुकरार इस्रायलच्या कारवाईच्या आड येणार नसल्याचे नाइड्स यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, इराणबरोबर अणुकरारासाठी प्रयत्न करणार्‍या बायडेन प्रशासनाने इस्रायल व आखाती मित्रदेशांचा विश्‍वास गमावला आहे. अमेरिकेतील माध्यमे व विश्‍लेषक बायडेन प्रशासनाला याची जाणीव करून देत आहेत. असे असले तरी बायडेन प्रशासन इराणबरोबर अणुकरारासाठी ठाम आहेत. त्याचबरोबर इस्रायलच्या इराणवरील कारवाईला विरोध करणार नसल्याचेही सांगत आहे.

leave a reply