अमेरिकेने दबाव टाकला तरी पाकिस्तान चीनबरोबरील सहकार्य कमी करणार नाही

- पंतप्रधान इम्रान खान यांचा दावा

इस्लामाबाद – ‘पाकिस्तानने चीनला साथ देऊ नये, यासाठी अमेरिका व इतर पाश्‍चिमात्य देश पाकिस्तानवर दबाव टाकत आहेत. पण पाकिस्तान आपला निकटतम मित्रदेश असलेल्या चीनबरोबरील सहकार्यातून माघार घेणार नाही’, अशा फुशारक्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मारल्या आहेत. इतकेच नाही तर भारताने देखील अमेरिकेच्या नादी लागून चीनबरोबर वैर पत्करू नये, याने भारताचेच नुकसान होईल, असा सल्ला देऊन इम्रान खान यांनी चीनला खूश करून टाकले.

अमेरिकेने दबाव टाकला तरी पाकिस्तान चीनबरोबरील सहकार्य कमी करणार नाही - पंतप्रधान इम्रान खान यांचा दावा‘चायना ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्क-सीजीटीएन’ या चिनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान बोलत होते. चीनच्या विरोधात अमेरिकेने क्वाडची स्थापना केली असून यात ऑस्ट्रेलिया व जपानसह भारताचाही समावेश केला आहे. चीनच्या विरोधातील अमेरिकेचे हे डावपेच चुकीचे असल्याचे शेरे पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी मारले. त्याचवेळी चीनबरोबर सहकार्य कमी करण्यासाठी अमेरिका व पाश्‍चिमात्य देश पाकिस्तानवर दबाव वाढवित असल्याचा दावा इम्रान खान यांनी केला. मात्र कितीही दबाव आला तरी पाकिस्तान आपला निकटतम मित्रदेश असलेल्या चीनबरोबरील सहकार्य कमी करणार नाही, असे दावे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले.

चांगल्या काळात सारेजण तुमच्यासोबत राहतात. पण चीन अत्यंत खडतर काळात देखील पाकिस्तानच्या सोबत राहिला, असे सांगून दोन्ही देशांच्या मैत्रीचे इम्रान खान यांनी दाखले दिले. अत्यंत विश्‍वासू मित्रदेश म्हणून पाकिस्तानी जनता चीनकडे पाहत आहे व दोन्ही देशांमध्ये अकृत्रिम स्नहेभाव असल्याचा दावाही यावेळी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केला. मुख्य म्हणजे भारतालाही यावेळी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी सल्ला देऊन टाकला. अमेरिकेच्या भरीस पडून भारताने चीनच्या विरोधात जाऊ नये. भारत व चीनमध्ये मोठा व्यापार सुरू आहे. अशा परिस्थितीत भारताने चीनच्या विरोधात जाण्याचा निर्णय घेतला, तर त्यामुळे भारताचेच नुकसान होईल, असे इम्रान खान यांनी बजावले आहे.

दरम्यान, इम्रान खान यांनी चिनी वृत्तवाहिनीसमोर मारलेल्या या फुशारक्यांमुळे पाकिस्तानसमोरील अडचणींमध्ये नवी वाढ होऊ शकते. आधीच अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या अपयशाला पाकिस्तान जबाबदार असल्याचे आरोप सुरू झाले आहेत. तालिबान अफगाणिस्तानात लष्करी मुसंडी मारत असताना, अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी याचे खापर पाकिस्तानवर फोडले आहे. पाकिस्तानमुळेच तालिबान अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत करीत असल्याचा दावा बोल्टन यांनी केला होता. त्यामुळे सध्या अमेरिकन लष्करी व राजनैतिक अधिकार्‍यांमध्ये पाकिस्तानच्या विरोधात संतापाची भावना आहे. त्यातच पाकिस्तानने अफगाणिस्तानवर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिकेला तळ पुरविण्यास नकार दिला होता. याचे परिणाम पुढच्या काळात पाकिस्तानला भोगावे लागतील, असे इशारे पाकिस्तानचेच विश्‍लेषक आपल्या सरकारला देत आहेत. मात्र अमेरिकेच्या या दडपणाचा सामना करण्याची तयारी पाकिस्तानने ठेवलेली आहे, असे या देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांनी जाहीर केले. चीन व रशिया या देशांचे सहाय्य घेऊन अमेरिकेच्या दडपणाला तोंड देण्याचे धोरण पाकिस्तान स्वीकारणार असल्याचे यामुळे उघड होत आहे. अमेरिकेच्या नाराजीमुळे पाकिस्तानला आर्थिक सहाय्य मिळणे अवघड जाईल. एफएटीएफच्या ग्रे लिस्टमध्ये पाकिस्तानला कायम ठेवून अमेरिकेने याची झलक आपल्या देशाला दाखविल्याचे पाकिस्तानच्या विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत चीनची खुशामत करून आपली अर्थव्यवस्था वाचविण्याची धडपड पाकिस्तानच्या पंतप्रधानांना करावी लागत असल्याचे दिसते.

leave a reply