पाकिस्तानी तटरक्षकदलाचा भारतीय मच्छिमार बोटींवर हल्ला

- भारताने फटकारले

अहमदाबाद,  (वृत्तसंस्था) – रविवारी  पाकिस्तानच्या तटरक्षकदलाने गुजरात सीमेजवळ दोन भारतीय मच्छिमार बोटींवर केलेल्या हल्यात एक मच्छिमार जखमी झाला होता. भारताने या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला आहे. पाकिस्तानी तटरक्षकदलाचा हल्ला  आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन करणारा असून पाकिस्तनाने अशी आगळीक पुन्हा करु नये अशा शब्दात भारताने पाकिस्तानला खडसावले आहे.
मागील काही दिवसापासून पाकिस्तानकडून सीमेवर सातत्याने गोळीबार करण्यात येत असून दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी सहाय्य करण्यात येत आहे. त्यातच आता पाकिस्तानी तटरक्षकदलाने भारतीय मच्छिमारांच्या बोटींना लक्ष्य केले आहे. गुजरात सीमेजवळ भारतीय बोटी मासेमारी करत असता पाकिस्तानी तटरक्षकदलाने या बोटींवर गोळीबार केला. यावेळी बोटीत आठ मच्छिमार होते. हल्ल्यात एक मच्छिमार जखमी झाला. पाकिस्तानी तटरक्षकदलाने हल्ला केल्यानंतर मच्छिमारानी याची माहिती भारतीय तटरक्षक दलाला दिली.
भारतीय तटरक्षकदलाने त्वरित पाकिस्तनी तटरक्षकदलाशी संपर्क केला असता  पाकिस्तानी तटरक्षकदलाने यास दुजोरा दिला. त्यानंतर भारतीय तटरक्षकदलाने ताताडीने “अरिंजय” जहाज मदतीसाठी पाठवले. या दोन्ही मच्छिमार बोटींची सुखररूप सुटका करण्यात आली आहे. ही घटना रविवारी सायंकाळी घडली.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने  या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. रविवारीच पाकिस्तानी लष्कराच्या हल्यात अडीच वर्षाच्या मुलीसह  तीन नागरिकांचा मृत्यू झाला होता. काही दिवसांपासून पाकीस्तानकाडून वारंवार भारताच्या कुरापती काढण्यात येत आहेत. सीमेवर तणाव निर्माण करण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.

leave a reply