पाकिस्तानी लष्कराने देश चीनला विकला आहे

- ‘एमक्यूएम’चे प्रमुख अल्ताफ हुसेन यांचा आरोप

लंडन – पाकिस्तानच्या लष्कराने आपला देश चीनला विकल्याचा घणाघाती आरोप ‘एमक्यूएम’चे प्रमुख अल्ताफ हुसेन यांनी केला आहे. पाकिस्तानी लष्कराकडून मूहाजिर, बलोच, सिंधी व पश्तून नागरिकांविरोधात सुरू असलेली कारवाई याचाच भाग असल्याचेही हुसेन यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानमधील सिंधी तसेच मुहाजिर गटांनी पाकिस्तानी स्वातंत्र्यदिन ‘ब्लॅक डे’ म्हणून साजरा केला होता. बलोचिस्तानमधील संघटनांनीही चीन ‘सीपीईसी’च्या माध्यमातून आपल्यावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दावे केले आहेत.

पाकिस्तानी लष्कर

पाकिस्तानचे लष्कर व सुरक्षायंत्रणांवर पंजाबी समाजाचा प्रभाव असून हे लष्कर पाकिस्तानचे चिनीकरण करून संपूर्ण देश चीनच्या घशात घालण्याच्या हालचाली करीत आहे, असा आरोप ‘एमक्यूएम’चे प्रमुख अल्ताफ हुसेन यांनी केला. ‘पंजाबी समाजाचा प्रभाव असलेल्या लष्कराने ग्वादरसह बलोचिस्तानचा मोठा भाग चीनला विकला आहे. बलोच नागरिकांना त्यांच्या गावांमधून विस्थापित करून त्यांची घरे व जमिनी चीनच्या ताब्यात दिल्या जात आहेत. ग्वादरसह इतर संवेदनशील भाग चीनच्या पूर्णपणे नियंत्रणाखाली असून या भागात पाकिस्तानचे लष्करी अधिकारीही जाऊ शकत नाहीत’, या शब्दात हुसेन यांनी पाकिस्तानी लष्कराला लक्ष्य केले.

कराची शहरासह सिंध प्रांतातही याचीच पुनरावृत्ती होत असल्याचा दावा ‘एमक्यूएम’च्या प्रमुखांनी केला. ‘चीनच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सिंध प्रांतातील कराचीसह अनेक भागांमध्ये घरे तसेच बाजारपेठा जमीनदोस्त करून त्या जागा चीनच्या ताब्यात देण्यात येत आहेत. एमक्यूएमने या कारवायांना विरोध केल्यामुळे पाकिस्तानी लष्कराने कारवाई सुरू केली आहे’, असे हुसेन यांनी म्हंटले आहे. पख्तुनख्वा व गिलगिट-बाल्टिस्तानमध्येही अशाच स्वरूपाच्या कारवाया सुरू असून पाकिस्तानी लष्कर सिंधी व मुहाजिरांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

पाकिस्तानी लष्कर

‘चायना पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडॉर’च्या (सीपीईसी) माध्यमातून चीनच्या सत्ताधारी राजवटीने पाकिस्तानमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. या माध्यमातून चीनने पाकिस्तानचे ग्वादर बंदर पूर्णपणे ताब्यात घेताना इतर भागांमध्येही मोठ्या प्रमाणात घुसखोरी सुरू केली आहे. बलुचिस्तान प्रांताच्या पाकिस्तानमधील प्रमुख शहरांमध्ये चिनी नागरिक व अधिकाऱ्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून ते पाकिस्तानी यंत्रणांनाही जुमानीत नसल्याच्या अनेक घटनाही समोर आल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी, पाकिस्तानातील चीनच्या हितसंबंधांवर तसेच ‘चायना पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडॉर’वर (सीपीईसी) हल्ले चढविण्यासाठी पाकिस्तानातील दोन बंडखोर संघटना एकत्र आल्या होत्या. त्यावेळी चीनच्या विस्तारवादी आणि आक्रमक कारवायांमुळे सिंध व बलोचिस्तानचे सारखेच नुकसान झाले असून, ‘सीपीईसी’ प्रकल्पाच्या आड चीन सिंधसह बलोचिस्तानला स्वत:च्या नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोपही करण्यात आला होता. तर, बलोचिस्तान व सिंधमधील सुमारे ९० टक्के जनतेला स्वतंत्र बलोचिस्तान आणि स्वतंत्र सिंधूदेश हवा आहे, असे सांगून अमेरिकन संसदेत यासाठी विधेयक मांडले जावे, असे आवाहन अल्ताफ हुसेन यांनी काही महिन्यांपूर्वी केले होते.

leave a reply