पाकिस्तानचा अफगाणी तालिबानशी संघर्ष अटळ

- पाकिस्तानच्या विश्‍लेषकांचा निष्कर्ष

संघर्ष अटळइस्लामाबाद – ‘‘अफगाणिस्तानातील तालिबानने प्रयत्न करूनही पाकिस्तान व ‘तेहरिक-ए-तालिबान’मधल्या वाटाघाटी यशस्वी होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे पुढच्या काळात ‘तेहरिक’शी वाटाघाटी शक्य नाहीत, आता या दहशतवादी संघटनेवर कठोर कारवाई केली जाईल’’, असे पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षामंत्री शेख रशिद यांनी म्हटले आहे. मात्र हे दावे करीत असताना, अफगाणिस्तानातील तालिबानशी पाकिस्तानचे उत्तम संबंध असल्याचे शेख रशिद दाखवू पाहत आहेत. पण प्रत्यक्षात तालिबान व पाकिस्तानमध्ये संघर्ष अटळ बनल्याचे या देशातील विश्‍लेषक सांगत आहेत.

सध्या बलोच बंडखोर संघटनांनी पाकिस्तानात हल्ल्याचे सत्र सुरू केले आहे. बलोचिस्तानच्या काही भागात तसेच पंजाब प्रांतातही बलोच बंडखोरांनी स्फोट तसेच हल्ले घडविल्याचा दावा केला होता. पण या बंडखोर संघटनांकडे इतकी ताकद नाही, त्यामागे तेहरिकचे दहशतवादी असल्याचा आरोप पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षामंत्र्यांनी केला होता. पाकिस्तानात होणार्‍या हल्ल्यांचे धागेदोरे अफगाणिस्तानात व भारतात असल्याचे दावेही शेख रशिद यांनी केले होते. पण पाकिस्ताननेच सत्तेवर आणलेल्या तालिबानचे राज्य अफगाणिस्ताना असताना, या देशातून पाकिस्तानवरील हल्ल्याची कारस्थाने कशी काय आखली जाऊ शकतात, हा प्रश्‍न पाकिस्तानचे पत्रकार व माध्यमे सरकारला विचारत आहेत.

अफगाणिस्तानातील व पाकिस्तानातील तालिबान वेगवेगळे आहेत. अफगाणी तालिबान पाकिस्तानचे मित्र तर पाकिस्तानातील ‘तेहरिक-ए-तालिबान’चे दहशतादी आपले शत्रू असल्याचे दावे केले जात होते. त्यामुळे अफगाणी तालिबान सत्तेवर आल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी हल्ले थांबतील, असा तर्क अफगाणी तालिबानचे समर्थक देत होते. पण तेहरिकच्या दहशतवाद्यांना अफगाणी तालिबान रोखत नसून उलट त्यांना सहाय्य करीत असल्याचे समोर आले आहे. यामुळे पाकिस्तान अधिकच असुरक्षित बनला आहे. त्यातच अफगाणिस्तान-पाकिस्तानमधल्या ड्युरंड लाईन सीमेवर तालिबानचा पाकिस्तानी लष्कराबरोबर संघर्ष झाल्याच्याही बातम्या येत आहेत.

या सार्‍या गोष्टींचा विचार करता, पुढच्या काळात पाकिस्तानचा अफगाणिस्तानातील तालिबानशी संघर्ष अटळ असल्याचे आता पाकिस्तानचे विश्‍लेषक मान्य करू लागले आहेत. पण आपणच सहाय्य करून अफगाणिस्तानात सत्तेवर आणलेल्या तालिबानच्या विरोधात जाणे आपल्याला महाग पडेल, याची जाणीव पाकिस्तानच्या लष्कर व सरकारला झालेली आहे. तसे केल्यास आपले धोरण पूणपणे फसले याची कबुली पाकिस्तानी लष्कराला आणि सरकारला द्यावी लागेल. शिवाय अफगाणी तालिबानशी टक्कर घेण्याची क्षमता सध्या तरी आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या पाकिस्तानच्या लष्कराकडे राहिलेली नाही.

यामुळे पाकिस्तानचे सरकार अफगाणी तालिबानच्या विरोधात जाण्याचे वक्तव्ये करण्याचे टाळत आहे. पण अफगाणिस्तानची सत्ता हाती आल्यानंतर तालिबानने पाकिस्तानची पर्वा न करण्याचे धोरण स्वीकारले आहे. याचा फार मोठा धक्का पाकिस्तानला बसला असून हा देश त्यातून अजूनही सावरलेला नाही. मात्र सध्या तरी तालिबानशी जुळवून घेऊन तेहरिकच्या विरोधात आगपाखड करण्यावाचून पाकिस्तानसमोर दुसरा पर्याय नाही. अंतर्गत सुरक्षामंत्री शेख रशिद यांच्या विधानातून हेच समोर येत आहे.

leave a reply