चीनच्या अरेरावीविरोधात पलाऊ अमेरिका-तैवानशी सहकार्य वाढविणार

- पलाऊच्या नवनियुक्त राष्ट्राध्यक्षांची घोषणा

लंडन – ‘चीनच्या छळवादाविरोधात स्वीकारलेल्या भूमिकेसाठी पलाऊसमोर बर्‍याच अडचणी आणल्या गेल्या. असे असले तरी इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनच्या अरेरावीविरोधात स्वीकारलेल्या भूमिकेपासून आपला देश माघार घेणार नाही’, अशी घोषणा इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील पलाऊ या छोट्या देशाचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष सुरंगेल व्हिप्स यांनी केली. त्याचबरोबर यापुढेही अमेरिका आणि तैवानबरोबर असलेले सहकार्य सुरूच राहणार असल्याचे सुरंगेल यांनी स्पष्ट केले. पलाऊच्या नवनियुक्त राष्ट्राध्यक्षांची घोषणा चीनच्या विस्तारवादी धोरणासाठी आव्हान ठरत आहे.

इंडो-पॅसिफिक क्षेत्रात मायक्रोनेशियाच्या पट्ट्यातील ‘पलाऊ’ या देशाचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष सुरंगेल व्हिप्स यांनी ब्रिटनमधील आघाडीच्या दैनिकाला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये राष्ट्राध्यक्ष सुरंगेल यांनी आपल्या सरकारची आगामी परराष्ट्र धोरणे स्पष्ट केली. पलाऊचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष थॉमस रेमेंगेसौ यांनी चीन, अमेरिका आणि तैवानबाबत स्वीकारलेली भूमिकाच यापुढेही कायम असेल, असे राष्ट्राध्यक्ष नियुक्त सुरंगेल यांनी सांगितले.

‘अमेरिका आणि पलाऊ यांच्यातील सहकार्य समान मूल्यांवर, लोकशाहीच्या मूल्यांवर आधारीत आहे. आज अमेरिका आणि चीनमध्ये स्पर्धा सुरू आहे. ही स्पर्धा देखील स्वातंत्र्य आणि लोकशाहीचे समर्थक आणि त्याविरोधात भूमिका घेणार्‍या देशांमध्ये आहे’, असे सांगून राष्ट्राध्यक्ष नियुक्त सुरंगेल यांनी चीनवर हल्ला चढविला. तसेच, ‘शक्तीशाली देश आपल्याहून दुर्बल शेजारी देशांना टाचेखाली ठेवण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी लोकशाहीवादी, समविचारी आणि शक्तीशाली सहकारी देश तुमच्याबरोबर असणे आवश्यक ठरते’, अशा शब्दात सुरंगेल यांनी चीनच्या वाढत्या धोक्याविरोधात अमेरिकेबरोबरचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले.

अमेरिकेबरोबरच्या सहकार्यासह सुरंगेल यांनी तैवानबाबतची आपल्या देशाची भूमिकाही कायम राहणार आहे. तैवानला स्वतंत्र देशाचा दर्जा देणारा आणि तैवानबरोबर सहकार्य असणार्‍या काही मोजक्या देशांमध्ये पलाऊचा समावेश आहे. येत्या काळातही पलाऊचे तैवानशी असलेले राजनैतिक संबंध कायम राहतील, अशी ग्वाही राष्ट्राध्यक्ष नियुक्त सुरंगेल यांनी दिली. तैवानला स्वतंत्र देशाचा दर्जा देऊन राजनैतिक सहकार्य प्रस्थापित केल्यामुळे चीनने पलाऊचे जबर नुकसान करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सुरंगेल यांनी केला.

‘आपल्या देशाचे तैवानबरोबरचे सहकार्य मान्य नसणार्‍या देशांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर, संयुक्त राष्ट्रसंघात किंवा पॅसिफिक देशांच्या संघटनेत पलाऊचे नुकसान करण्याचे आटोकाट प्रयत्न केले. यापुढेही असे प्रयत्न सुरू राहतील. पण या छळवादाविरोधात पलाऊ आपल्या भूमिकेतून अजिबात माघार घेणार नाही’, अशी घोषणा सुरंगेल यांनी या मुलाखतीत केली. गेल्या वर्षी चीनने तैवानशी सहकार्य प्रस्थापित करणार्‍या सॉलोमन आयलँड आणि किरीबाती या देशांवर दबाव टाकून आपल्या गटात वळविले होते. असाच प्रयत्न चीनने पलाऊबाबतही केला होता. पण पलाऊने चीनचा राजकीय दबाव उधळून लावत तैवानला स्वतंत्रदेशाचा दर्जा देण्याची भूमिका कायम ठेवली होती.

पलाऊ हा तैवानचा मोठा समर्थक देश असून गेल्या वर्षी अमेरिका आणि तैवानमध्ये झालेल्या सुरक्षाविषयक बैठकीतही पलाऊचा समावेश होता. त्याचबरोबर २०२० सालच्या सप्टेंबर महिन्यात चीनची आक्रमकता रोखण्यासाठी अमेरिकेने आपल्या देशात लष्करी व हवाई तळ प्रस्थापित करावे, असे आवाहन पलाऊनेच केले होते.

leave a reply