तैवान म्हणजे युक्रेन नसल्याचा चीनचा इशारा

spokesperson-Hua-Chunyingबीजिंग – तैवान म्हणजे युक्रेन नसून तो चीनचा अविभाज्य भाग आहे, असा इशारा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे. चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी, अमेरिकेची धोरणे चीनविरोधात संघर्षाचा मार्ग निवडणारी आहेत, असा आरोप केला. रशिया-युक्रेनमधील तणावपूर्ण घटनाक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेने ‘इंडो-पॅसिफिक स्ट्रॅटेजी’ जाहीर केली असून त्यात तैवानची स्वसंरक्षणाची क्षमता इंडो-पॅसिफिकच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याचा उल्लेख केला आहे. अमेरिकेने जाहीर केलेल्या या धोरणानंतर तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनी संरक्षणदलाला सज्ज व सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर चीनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.

रशिया-युक्रेन सीमेवरील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर रशिया व चीनमधील जवळीक अधिक वाढताना दिसत आहे. चीनने युक्रेनच्या मुद्यावर रशियाला समर्थन दिले असून रशियानेही तैवान प्रकरणात चीनला पाठिंबा दिला होता. यावर तैवानकडून चिंता व्यक्त करण्यात आली होती. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दोन प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिल्यानंतर तैवानची काळजी अधिकच वाढली आहे. चीन रशियाचे अनुकरण करून तैवानविरोधात कारवाईचे पाऊल उचलेल, असे दावे तैवानमधून करण्यात येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर तैवानने आपल्या संरक्षणदलांना अधिक सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

China's-warningयादरम्यान, अमेरिकेने नवी ‘इंडो-पॅसिफिक स्ट्रॅटेजी’ प्रसिद्ध केली असून त्यात तैवानच्या संरक्षणाचा मुद्दा मांडण्यात आला आहे. अमेरिका तैवानला स्वसंरक्षणाची क्षमता पुरविण्यासाठी सहाय्य पुरवेल, असा उल्लेखही इंडो-पॅसिफिक धोरणात आहे. अमेरिकेने तैवानबाबत केलेला हा उल्लेख चीनला चांगलाच अस्वस्थ करणारा ठरला आहे. चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत यावर स्पष्ट नाराजी दर्शविली. अमेरिकेने आपल्या नव्या धोरणातून चीनला रोखणे हे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे म्हटले असून ही बाब चुकीचा संदेश देणारी आहे, अशी टीका परराष्ट्रमंत्री यी यांनी केली.

चीनच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनीही, तैवान चीनचा अविभाज्य भाग असून त्याची तुलना युक्रेनशी करता येणार नाही, असे बजावले आहे. चीन आपल्या अखंडतेशी कधीही तडजोड करणार नाही, असा इशाराही चिनी प्रवक्त्यांनी दिला.

leave a reply