फिलिपाईन्स भारताकडून ब्रह्मोस खरेदी करण्याच्या तयारीत

नवी दिल्ली – भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची खरेदी करण्याचा निर्णय फिलिपाईन्सने घेतला आहे. लवकरच याबाबतच्या कराराची घोषणा होईल, असे दावे केले जातात. साऊथ चायना सी क्षेत्रात सध्या फिलिपाईन्सचा चीनबरोबर निर्माण झालेला तणाव लक्षात घेता, हा देश करीत असलेली ब्रह्मोसची खरदी चीनला अस्वस्थ करणारी बाब ठरते. त्याचवेळी भारताच्या संरक्षणविषयक निर्यातीला याचा फार मोठा लाभ मिळेल. या दोन्ही गोष्टी धोरणात्मकदृष्ट्या भारतासाठी अतिशय महत्त्वाच्या ठरतात.ब्रह्मोस

भारत व रशियाने संयुक्तपणे विकसित केलेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या खरेदीसाठी फिलिपाईन्स उत्सुक असल्याचे याआधी स्पष्ट झाले होते. दोन्ही देशांमध्ये याबाबत चर्चा सुरू होती व ही चर्चा आता मार्गी लागल्याचे दिसत आहे. फिलिपाईन्सने ब्रह्मोस च्या खरेदीसाठी निधी राखून ठेवला होता, असे दावे करणाऱ्या बातम्या समोर आल्या आहेत. तर काही बातम्यांमध्ये फिलिपाईन्सने या व्यवहारासाठी हालचाली सुरू केल्याचे नमूद करण्यात आले होते. पण अधिकृत पातळीवर याची घोषणा करण्यात आलेली नाही. कोरोनाच्या साथीमुळे हा व्यवहार रखडला होता, असेही बोलले जाते.

गेल्या काही दिवसांपासून फिलिपाईन्सने साऊथ चायना सीच्या क्षेत्रात चीनच्या आक्रमक कारवायांविरोधात ठाम भूमिका स्वीकारली आहे. साऊथ चायना सीमध्ये आसियानच्या सदस्यदेशांचे भक्कम संघटन उभारण्याचे आवाहन फिलिपाईन्सने केले आहे. चीनच्या अरेरावीविरोधात कठो भूमिका स्वीकारण्यासाठी अशा संघटनाची आवश्‍यकता असल्याचे फिलिपाईन्स सांगत आहे. त्याचवेळी फिलिपाईन्सने दक्षिण कोरियाच्या कंपनीकडून दोन विनाशिकांच्या खरेदीचा करार केला आहे.

फिलिपाईन्सच्या सागरी क्षेत्रात चीनची शेकडो मच्छिमार जहाजे बराच काळ वावरत होती. ही जहाजे मच्छिमारी करणारी असल्याचे वरकरणी दाखविले जात असले तरी प्रत्यक्षात हा चिनी नौदलाच्या पथकाचा भाग असल्याचे आरोप केले जातात. फिलिपाईन्सने याची गंभीर दखल घेऊन याविरोधात चीनला इशारे दिले होते. पण चीनने त्याकडे दुर्लक्ष केले. फिलिपाईन्सच्या सागरी क्षेत्रावर दावा सांगणारा चीन अशा प्रयत्नांद्वारे आपला अधिकार या सागरी क्षेत्रावर प्रस्थापित करीत असल्याचे समोर येत आहे.

यामुळेच फिलिपाईन्सला आपल्या संरक्षणासाठी वेगाने हालचाली कराव्या लागत आहेत. ब्रह्मोसच्या खरेदीला फिलिपाईन्सने दिलेला वेग हा या प्रयत्नांचा भाग ठरतो. जगातील अतिप्रगत सुपरसोनिक क्षेपणास्त्र अशी ओळख असलेले ब्रह्मोस खरेदी करून फिलिपाईन्सने आपण संरक्षणासाठी सज्ज होत असल्याचा संदेश चीनला दिला आहे. भारताच्या संरक्षणविषयक निर्यातीसाठी हा व्यवहार अतिशय महत्त्वाचा ठरू शकतो. फिलिपाईन्सनंतर, चीनच्या दहशतीखाली असलेे साऊथ चायना सी क्षेत्रातील इतर देश देखील भारताकडून ब्रह्मोसच्या खरेदीचा निर्णय घेऊ शकतात.

leave a reply