युक्रेनच्या मुद्यावर बायडेन व पुतिन यांच्यात फोनवरून चर्चा

मॉस्को/वॉशिंग्टन – युक्रेनच्या मुद्यावरील वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी फोनवरून चर्चा करतील, अशी माहिती व्हाईट हाऊसने दिली. गुरुवारी दुपारी ही चर्चा होईल, असे अमेरिकेच्या ‘नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल`च्या प्रवक्त्या एमिली हॉर्न यांनी सांगितले. अमेरिकेकडून चर्चेसाठी तयारी असल्याचे वृत्त समोर येत असतानाच रशियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अमेरिकेवर नवे शीतयुद्ध सुरू केल्याचा ठपका ठेवला आहे.काही दिवसांपूर्वीच रशिया व अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांदरम्यान व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून चर्चा झाली होती. यात युक्रेनमधील तणावासह अनेक मुद्यांचा समावेश होता. या चर्चेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी पुतिन यांच्यासमोर मवाळ भूमिका स्वीकारल्याचे टीकास्त्र अमेरिकेतील विरोधी पक्षाने सोडले होते. ही चर्चा पुतिन यांच्यासाठी राजनैतिक विजय ठरल्याचा दावाही करण्यात आला होता. मात्र व्हाईट हाउसने यासंदर्भातील वृत्त फेटाळून बायडेन यांनी रशियाला कारवाईचा इशारा दिल्याचा खुलासा केला होता.

फोनवरून चर्चाया चर्चेनंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन अमेरिकेसह पाश्‍चात्य देशांसमोर ‘सिक्युरिटी पॅक्ट`चा प्रस्ताव देऊन त्याला लवकरात लवकर प्रतिसाद द्यावा अशी मागणीही केली होती. नाटो व युरोपिय देशांनी प्रस्तावाला विरोध दर्शविला असला तरी अमेरिकेने चर्चेची तयारी असल्याचे स्पष्ट केले होते. युक्रेनच्या मुद्यावर 10 जानेवारी रोजी दोन देशांमध्ये चर्चा होईल, असे वृत्तही प्रसिद्ध झाले होते. या पार्श्‍वभूमीवर दोन राष्ट्राध्यक्षांमध्ये फोनवरून चर्चेची बातमी समोर येणे लक्ष वेधून घेणारे ठरते.

व्हाईट हाउसने दिलेल्या माहितीनुसार फोनवरून संवाद साधण्याची मागणी रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याकडून करण्यात आली. दोन देशांच्या प्रमुख नेत्यांमध्ये थेट चर्चा होणे या गोष्टीला दुसरा अधिक चांगला पर्याय असू शकत नाही, अशी बायडेन यांची भूमिका असल्याने त्यांनी पुतिन यांच्याबरोबर फोनवरून संवाद साधण्याचा प्रस्ताव मान्य केल्याचेही अमेरिकी सूत्रांनी नमूद केले.

अमेरिका चर्चेसाठी तयार असल्याचे वृत्त समोर येत असतानाच रशियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अमेरिकेवर नव्या शीतयुद्धाचा ठपका ठेवला आहे. संयुक्त राष्ट्रसंघटनेतील रशियाचे उपराजदूत असणाऱ्या दिमित्रि पॉलिअन्स्की यांनी, अमेरिकेने ‘कोल्ड वॉर 2.0` सुरू केल्याचा आरोप केला. गेल्या शतकात शीतयुद्ध संपल्यानंतर पाश्‍चात्य देश मित्र बनल्याची व एका चांगल्या जगाचा भाग बनता येईल अशी भावना होती, पण काही काळातच त्याला तडे गेले, असा दावा पॉलिअन्स्की यांनी केला.

फोनवरून चर्चाआमच्या पाश्‍चात्य सहकाऱ्यांची उद्दिष्टे चांगली नसल्याचे लक्षात येऊ लागले. अमेरिकन्स तसेच युरोपियन्स रशियाचे अजून विघटन करण्याचा, त्याला तोडण्याचा, दडपण्याचा प्रयत्न करीत होते. नव्या सहस्त्रकात गोष्टी वेगाने बदलण्यास सुरुवात झाली. अमेरिकेसह इतर पाश्‍चात्य देशांनि रशियाकडे धोका म्हणून पाहण्यास सुरुवात केली. सध्या जे काही सुरू आहे त्याला शीतयुद्धाची रिमेक अर्थात शीतयुद्ध 2.0 असे म्हणता येईल`, असा आरोप रशियाच्या संयुक्त राष्ट्रसंघटनेतील उपराजदूतांनी केला. जगात पुन्हा एकदा भूराजकीय संघर्ष सुरू झाला आहे, असा दावाही पॉलिअन्स्की यांनी यावेळी केला.

दरम्यान, युक्रेन सीमेजवळील रशियन हालचालींच्या मुद्यावर अमेरिका, ब्रिटन, जर्मनी व फ्रान्सच्या परराष्ट्रमंत्र्यांदरम्यान चर्चा झाली. ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्री लिझ ट्रुस यांनी ही माहिती दिली आहे. या चर्चेपूर्वी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी बोलणी करून सुरक्षेसंदर्भात आश्‍वासन दिल्याचे वृत्तही समोर आले आहे.

leave a reply