म्यानमारमधील वंशसंहारावर संयुक्त राष्ट्रसंघाची टीका

- नागरी वस्त्यांच्या जाळपोळीच्या नव्या घटना उघड

न्यूयॉर्क/यांगून – डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्यानमारच्या लष्कराने 35 गावकऱ्यांना जाळून मारल्याच्या घटनेची संयुक्त राष्ट्रसंघाने कठोर शब्दात निर्भत्सना केली. या वंशसंहारला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाईची आवश्‍यकता असून म्यानमारमधील हिंसाचार त्वरीत थांबविण्यात यावा, अशी सूचना संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने केली. दरम्यान, म्यानमारच्या लष्कराने आणखी एका गावातील वस्त्या आगीत पेटवून दिल्याची माहिती समोर येत आहे. तर जुंटा राजवट वंशसंहाराचा वापर शस्त्रासारखा करीत असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था करीत आहे.वंशसंहार

या महिन्याच्या सुरुवातीला थायलंडच्या सीमेलगत असलेल्या कयाह प्रांतात म्यानमारच्या लष्कराने आणखी एक अमानुष कारवाई केली. येथील मोसो गावानजिक म्यानमारचे लष्कर आणि स्थानिक सशस्त्र बंडखोरांमध्ये संघर्ष पेटला होता. या संघर्षानंतर म्यानमारच्या लष्कराने बंडखोरांना सहाय्य करणाऱ्या गावकऱ्यांना मोटारीत भरुन पेटवून दिल्याचा दावा केला जातो.

बंडखोर व स्थानिकांनी या मोटारींमधून जवळपास 35 मृतदेह बाहेर काढले होते. यामध्ये महिला व मुलांचा देखील समावेश असल्याचे समोर आले होते. म्यानमारची सत्ता काबिज करणाऱ्या जुंटा राजवटीने मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेवर प्रतिक्रिया दिलेली नाही. पण म्यानमारमधील लोकशाहीवादी गट, सशस्त्र बंडखोर आणि स्थानिकांकडून या अमानुषतेविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेनेही या घटनेची दखल घेतली. म्यानमारचे लष्कर व इतर सशस्त्र गटांनी हिंसाचार थांबवून मानवाधिकारांचे पालन करावे, असे आवाहन सुरक्षा परिषदेने केले. याआधीही आंतरराष्ट्रीय स्तरातून म्यानमारच्या जुंटा राजवटीला लोकशाहीवादी गटांवरील कारवाई थांबविण्याचे आवाहन केले होते. पण म्यानमारची जुंटा राजवट आंतरराष्ट्रीय समुदायाच्या प्रतिक्रियेला विशेष किंमत देत नसल्याचे दिसत आहे.

वंशसंहारगेल्या चोवीस तासात जुंटा राजवटीने म्यानमारच्या वेगवेगळ्या भागात केलेल्या कारवाईची माहिती समोर येत आहे. भारताच्या नागालँड आणि मणिपूर या राज्यांच्या सीमेला जोडलेल्या म्यानमारच्या सागाईंग प्रांतात लष्कराने नाचुआंग गावातील वस्त्या पेटवून दिल्या आहेत. सोमवारी तसेच गेल्या आठवड्यात गुरुवारी म्यानमारच्या लष्कराने या गावात जाळपोळ केली. यामध्ये नऊ नागरिकांचा बळी गेल्याचा दावा केला जातो.

तर म्यानमारच्या पश्‍चिम सीमाभागात लष्कराकडून सुरू असलेल्या हवाई कारवाईमुळे घाबरलेले हजारो म्यानमारी नागरिक थायलंडमध्ये आश्रय घेत असल्याचा दावा केला जातो. त्याचबरोबर जुंटा राजवटीने सूत्रे हातात घेतल्यापासून म्यानमारमधील अंमली पदार्थांची तस्करी वाढल्याची चिंता व्यक्त केली जाते.

दरम्यान, म्यानमारच्या जुंटा राजवटीविरोधात स्थानिकांनी वेगळ्या प्रकारे निदर्शने सुरू केल्याचे समोर येत आहे. या राजवटीचा निषेध करण्यासाठी लोकशाहीवादी कार्यकर्ते लष्करी वाहनांसमोर आडवे होऊन निदर्शने करीत आहेत. याचे फोटोग्राफ्स सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत. यामुळे 1989 साली चीनच्या तियानमेन चौकात लोकशाहीवादी विद्यार्थीगटाने कम्युनिस्ट राजवटीविरोधात केलेल्या निदर्शनांच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

leave a reply