एफ-16साठी पाकिस्तानला सहाय्य करून अमेरिका भारताला मूर्ख बनवू शकत नाही

- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

वॉशिंग्टन – पाकिस्तानच्या हवाई दलाच्या ताफ्यात असलेल्या एफ-16 विमानांच्या अद्ययावतीकरणासाठी अमेरिकेने पाकिस्तानला सुमारे 45 कोटी डॉलर्सचे पॅकेज जाहीर केले होते. हे सहाय्य दहशतवादविरोधी कारवाईसाठी असून यामुळे भारताने विचलित होण्याचे काहीच कारण नाही, असा खुलासाही अमेरिकेने दिला होता. पण या विमानांची क्षमता सर्वांनाच ठाऊक आहे आणि त्याचा वापर कुठे होतो, याचीही सर्वांना माहिती आहे. त्यामुळे हा खुलासा देऊन अमेरिका भारताला मूर्ख बनवू शकत नाही, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेला खडसावले आहे. तसेच अमेरिकेच्या पाकिस्तानबरोबरील संबंधांचा दोन्ही देशांना फायदा झालेला नसून आत्तापर्यंत दोन्ही देशांचे यामुळे नुकसानच झालेले आहे, याकडे जयशंकर यांनी लक्ष वेधले.

शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेने पाकिस्तानला एफ-16 विमाने पुरविली होती. याच्या देखभाल व दुरूस्तीसाठी पाकिस्तान अमेरिकेवर अवलंबून आहे. पण अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळात पाकिस्तानचे लष्करी सहकार्य रोखून धरले होते. अफगाणिस्तानातील दहशतवादविरोधी युद्धात पाकिस्तान छुप्यारितीने तालिबानला सहाय्य करून अमेरिकेचा घात करीत असल्याचा ठपका ठेवून ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला होता. मात्र बायडेन प्रशासनाने हा निर्णय फिरविला असून एफ-16 विमानांसाठी पाकिस्तानला 45 कोटी डॉलर्सचे पॅकेज जाहीर केले होते. दहशतवादविरोधी युद्धासाठी या विमानांचा वापर केला जाईल, भारताच्या विरोधात नाही, असा खुलासा करून अमेरिकेने यापासून भारताला विचलित होण्याचे काहीच कारण नसल्याचे जाहीर केले होते.

अमेरिकेच्या या बालिश दाव्यांचा परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चांगलाच समाचार घेतला. वॉशिंग्टनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात भारतीय समुदायाशी संवाद साधताना जयशंकर यांनी नेमक्या शब्दात भारताची भूमिका मांडली. एफ-16 विमानांचा वापर करून पाकिस्तान दहशतवाद्यांवर कारवाई करणार नाहीत, तर त्याचा वापर भारताच्याच विरोधात होईल. असे असताना अमेरिका यासंदर्भात असे खुलासे देऊन भारताला मूर्ख बनवू शकत नाही, ही बाब जयशंकर यांनी अमेरिकेच्या लक्षात आणून दिली. तसेच अमेरिकेच्या अशाच धोरणांमुळे भारताचे रशियाबरोबरील सहकार्य अधिकच दृढ झाले, याचीही जाणीव जयशंकर यांनी आपल्या विधानांद्वारे करून दिली आहे. अमेरिका आणि पाकिस्तानच्या संबंधांचा विचार करता, याने दोन्ही देशांचे भले झालेले नाही, ही बाब जयशंकर यांनी लक्षात आणून दिली. अमेरिकेचे धोरणकर्ते आजवरचा हा अनुभव लक्षात घ्यायला तयार नाहीत, याकडेही जयशंकर यांनी लक्ष वेधले.

आज भारत शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्याच्या सुट्ट्या भागांसाठी रशियावर अवलंबून आहे. कारण शीतयुद्धाच्या काळात भारताला अमेरिकेकडून कुठल्याही प्रकारची शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्य उपलब्ध करून दिले जात नव्हते. त्यामुळे सोव्हिएत रशियाबरोबरील भारताची संरक्षणविषयक भागीदारी अधिकच भक्कम होत गेली, असे जयशंकर म्हणाले. त्यामुळे अमेरिकेने भारताला नाकारलेले सहकार्यच भारत व रशियाचे सहकार्य दृढ करणारी बाब ठरली, असे लक्षात आणून देऊन जयशंकर यांनी अमेरिकेला आरसा दाखविला. याबरोबरच अमेरिकी वर्तमानपत्रांनी भारताबाबत दाखविलेल्या आकसबुद्धीवरही जयशंकर यांनी बोट ठेवले. स्वतःला भारताचे विश्वस्त मानून ही वर्तमानपत्रे भारताला आपल्याला हवी ती दिशा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. या वर्तमानपत्रांकडून काश्मीरचे अत्यंत चुकीच्या पद्धतीने वार्तांकन केले जात आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या रक्तपाताकडे दुर्लक्ष करून ही वर्तमानपत्रे उलट भारतालाच लक्ष्य करीत राहतात, या दुटप्पीपणावर जयशंकर यांनी कडाडून प्रहार केले आहेत. भारतातील काही नाराज गटांना अमेरिकी माध्यमे अवास्तव प्रसिद्धी देत राहतात, यावरही भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आक्षेप नोंदविला आहे. मात्र यापुढे भारत आपल्या विरोधातल्या या अपप्रचाराला प्रत्युत्तर दिल्याखेरीज राहणार नाही, असे जयशंकर यांनी बजावले आहे.

 

leave a reply