क्वाडच्या बैठकीसाठी पंतप्रधान मोदी जपानला भेट देणार

नवी दिल्ली – क्वाड देशांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 मे रोजी जपानच्या भेटीवर जाणार आहेत. दोन दिवसांच्या या दौऱ्यात ते जपान व ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसह अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी ही माहिती दिली. युक्रेनमधील युद्धावर अमेरिका व नाटोचे लक्ष खिळलेले असताना, याचा लाभ घेऊन चीन तैवानवर हल्ला चढविल, अशी चिंता आंतरराष्ट्रीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर क्वाडच्या जपानमधील या बैठकीचे महत्त्व प्रचंड प्रमाणात वाढले आहे.

तैवानच्या हवाई हद्दीतील चीनच्या लढाऊ विमानांची घुसखोरी चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. कुठल्याही क्षणी चीन तैवानवर हल्ला चढविण्याची दाट शक्यता वर्तविली जाते. याची दखल घेऊन जपानने या क्षेत्रातील आपल्या हालचाली वाढविल्या आहेत. त्याचवेळी चीनचा तैवानवरील हल्ला हा जपानवरील हल्ला मानला जाईल, अशी घोषणा जपानने केली आहे. अशा काळात अमेरिकन नौदलाच्या युद्धनौकांचा ताफा या क्षेत्रात गस्त घालून तैवानला आश्वस्त करीत आहेत. पण त्यावर चीनची तीव्र प्रतिक्रिया उमटली असून यावरून चीनने थेट अमेरिकेला इशारे दिले आहेत.

अमेरिकेबरोबर, भारत आणि जपान व ऑस्ट्रेलियावरील सामरिक दडपण वाढविणाऱ्या हालचाली करून चीन निराळेच संकेत देत आहे. ही सारी तैवानवरी हल्ल्याची पूर्वतयारी असल्याची चिंता विश्लेषकांकडून व्यक्त केली जाते. मात्र अशा काळात अमेरिकेने तैवानला शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्याचा पुरवठा करण्याचे नाकारले आहे. युक्रेनला या शस्त्रास्त्रांची अधिक गरज असल्याचे कारण पुढे करून अमेरिकन कंपन्यांनी तैवानने दिलेल्या ऑडर्स रद्द केल्या आहेत. त्यामुळे बायडेन प्रशासन तैवानच्या सुरक्षेबाबत गंभीर आहे का, हा प्रश्न अधिक तीव्रतेने विचारला जात आहे.

या पार्श्वभूमीवर, बायडेन प्रशासनाच्या चीनविषयक धोरणाला अमेरिकेचे विरोधी पक्षनेते धारेवर धरत आहेत. म्हणूनच बायडेन यांच्या जपान दौऱ्याचे महत्त्व वाढले असून जपानमध्ये होणाऱ्या क्वाड देशांच्या बैठकीकडेही साऱ्या जगाची नजर लागलेली आहे. आधी पार पडलेल्या क्वाडच्या व्हर्च्युअल चर्चेत भारताने अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या मागणीनुसार युक्रेन युद्धासाठी रशियाचा निषेध करण्याचे नाकारले होते. त्यावर राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी भारतावर टीका केली होती. जपान व ऑस्ट्रेलिया रशियाविरोधी भूमिका घेत असताना भारत मात्र रशियाचा विरोध करताना कचरत असल्याचा ठपका राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी ठेवला होता. जपानमध्ये होणाऱ्या क्वाडच्या बैठकीत त्याची पुनरावृत्ती होईल का, हा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.

leave a reply