जी7च्या बैठकीदरम्यान पंतप्रधानांची प्रमुख देशांच्या नेत्यांशी चर्चा

हिरोशिमा – जपानच्या हिरोशिमामधील जी7च्या बैठकीदरम्यान, पंतप्रधान मोदी यांची जपान, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम या देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा पार पडली. यामुळे भारताचे वाढत असलेले आंतरराष्ट्रीय महत्त्व या बैठकीत पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. सदर बैठकीसाठी चीनला आमंत्रित करण्यात आले नव्हते, ही बाब आंतरराष्ट्रीय माध्यमे प्रकर्षाने लक्षात आणून देत आहेत. त्या पार्श्वभूमीवर, भारताला जपानमध्ये जी7च्या बैठकीत मिळत असलेला प्रतिसाद ठळकपणे जगासमोर येत आहे.

जी7च्या बैठकीदरम्यान पंतप्रधानांची प्रमुख देशांच्या नेत्यांशी चर्चाजपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांच्याशी पंतप्रधान मोदी यांची ग्रीन हायड्रोजन, अतिप्रगत तंत्रज्ञान, डिजिटल व नागरी पायाभूत सुविधा क्षेत्र तसेच सेमीकंडक्टर्सच्या उत्पादनाबाबतच्या सहकार्यावर चर्चा झाली. जपानकडे जी7चे अध्यक्षपद आले आहे. तर भारत यावर्षी होणाऱ्या जी20 परिषदेचा अध्यक्ष आहे. याचा दाखला देऊन दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी विकासासाठीचा निधी, अन्नसुरक्षा, जागतिक हवामानबदल आणि ऊर्जाक्षेत्रातील परिस्थितीचा आढावा घेतला. ग्लोबल साऊथचा अर्थात अविकसित व विकसनशील देशांना भेडसावणाऱ्या समस्यांवर पंतप्रधान मोदी व पंतप्रधान किशिदा यांच्यामध्ये विचारविनिमय झाला.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्याबरोबरील पंतप्रधान मोदी यांच्या चर्चेत द्विपक्षीय व्यापार व आर्थिक सहकार्याचा मुद्दा अग्रक्रमावर होता. तसेच संरक्षणसाहित्याच्या संयुक्त निर्मितीवर आणि नागरी अणुऊर्जेविषयक सहकार्यावर भारत व फ्रान्सच्या पंतप्रधानांची चर्चा संपन्न झाली. पंतप्रधान मोदी फ्रान्सच्या बॅसिल डे समारोहात सहभागी होणार आहेत. यावरही यावेळी दोन्ही नेत्यांचे बोलणे झाल्याचे सांगितले जाते. जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांच्याशीही भारताच्या पंतप्रधानांची द्विपक्षीय चर्चा झाली. यामध्ये क्षेत्रातील घडामोडी व जागतिक आव्हानांचा समावेश होता. भारताच्या युरोपिय महासंघाबरोबरील व्यापारी सहकार्यासाठी जर्मनीने केलेल्या सहाय्यासाठी यावेळी पंतप्रधानांनी चॅन्सेलर शोल्झ यांचे आभार मानले.

जी7च्या बैठकीदरम्यान पंतप्रधानांची प्रमुख देशांच्या नेत्यांशी चर्चाब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनाक व इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांच्याशीही पंतप्रधान मोदी यांची द्विपक्षीय चर्चा झाली आहे. तर दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सूक योल यांच्याच्याबरोबरील चर्चेत दोन्ही देशांमधील व्यापार, संरक्षणविषयक सहकार्य आणि सेमीकंडक्टर्सच्या निर्मितीचे मुद्दे या चर्चेत अग्रक्रमावर होता.

व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह यांच्याशी पंतप्रधान मोदी यांची ऊर्जा, गुंतवणूक व व्यापार यावर चर्चा झाल्याचे सांगितले जाते. दोन्ही देशांमधील धोरणात्मक सहकार्य अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी पंतप्रधान मोदी व व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह यांनी यावेळी व्यक्त केला.

जपानमधील या जी7च्या बैठकीतील भारताची उपस्थिती व चीनची अनुपस्थिती अधिकच प्रकर्षाने जगासमोर आली. जगभरातील प्रमुख देश भारताबरोबरील सहकार्य व्यापक करण्यासाठी उत्सुकता दाखवित आहेत. त्याचवेळी चीनच्या वर्चस्ववादी कारवायांवरही प्रमुख देशांकडून चिंता व्यक्त करण्यात येते. त्यामुळे भारताची विश्वासार्हता वाढत असताना, चीन मात्र विश्वासार्हता गमावत असल्याचे दिसू लागले आहे. जागतिक पटलावरील भारताचा उदय व चीनची घसरण एकाच वेळी समोर येत आहे. ही बाब चीनला अधिकाधिक अस्वस्थ करणारी ठरते. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी याची दखल घेतल्याचे दिसत आहे.

हिंदी

 

leave a reply