जगाला लवकरच मोठ्या संघर्षाला तोंड द्यावे लागेल

- ब्रिटनच्या संरक्षणमंत्र्यांच्या इशारा

लंडन – या दशकाच्या अखेरपर्यंत जगाला मोठ्या संघर्षाला तोंड द्यावे लागेल, असा इशारा ब्रिटनचे संरक्षणमंत्री बेन वॉलेस यांनी दिला. पुढील काही वर्षात जग अधिक अस्थिर व धोकादायक जागा बनलेली असेल आणि कदाचित तिसऱ्या महायुद्धाचा भडकाही उडू शकतो, असेही संरक्षणमंत्री वॉलेस यांनी बजावले. हा संघर्ष व इतर संभाव्य धोक्यांची जाणीव ठेऊन ब्रिटनने आपल्या सुरक्षेसाठी अधिक प्रमाणात गुंतवणूक करायला हवी, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

जगाला लवकरच मोठ्या संघर्षाला तोंड द्यावे लागेल - ब्रिटनच्या संरक्षणमंत्र्यांच्या इशाराब्रिटनमधील ‘द फायनान्शिअल टाईम्स’ या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत संरक्षणमंत्री वॉलेस यांनी सध्याच्या रशिया-युक्रेन युद्धासह संभाव्य संघर्षांबाबत आपली भूमिका मांडली. रशिया-युक्रेनमधील युद्धाचे रुपांतर नाटो व रशियामधील व्यापक संघर्षात होऊ शकते, अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली. भविष्यात होणाऱ्या मोठ्या संघर्षात रशिया व चीनबरोबर आफ्रिकेतील दहशतवादी संघटना हासुद्धा एक घटक असू शकतो, असेही ब्रिटनच्या संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.

‘हे दशक संपेपर्यंत जग अधिक धोकादायक व अस्थिर बनेल. संरक्षण हा आपल्या जीवनाच्या महत्त्वाचा भाग झालेला असेल. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षानंतर कदाचित रशियाबरोबर मोठ्या संघर्षाला तोंड द्यावे लागू शकते. जगाला लवकरच मोठ्या संघर्षाला तोंड द्यावे लागेल - ब्रिटनच्या संरक्षणमंत्र्यांच्या इशारावर्चस्ववादी चीनचा धोकाही वाढलेला आहे आणि आफ्रिकेतील दहशतवादी गटांकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. संघर्षाची वेळ जवळ येत असून लवकरच जगाला मोठ्या संघर्षाला तोंड द्यावे लागेल’, असा इशारा संरक्षणमंत्री वॉलेस यांनी दिला.

नवा संघर्ष थेट असेल की अप्रत्यक्ष हे आता सांगता येणार नाही, पण सर्व प्रकारच्या प्रतिस्पर्ध्यांसाठी सज्ज राहणे आवश्यक असल्याची जाणीव ब्रिटनच्या संरक्षणमंत्र्यांनी यावेळी करून दिली. ही सज्जता ठेवण्यासाठी ब्रिटनने आपला संरक्षणखर्च जीडीपीच्या 2.5 टक्क्यांपर्यंत वाढविणे आवश्यक आहे व त्यासाठी योग्य वेळापत्रक आखून पावले उचलायला हवीत, असेही वॉलेस यांनी स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्रसंघटनेचे महासचिव असलेल्या अँटोनिओ गुतेरस यांनीही, जगासमोर मोठी आव्हाने व धोके असल्याची जाणीव करून दिली होती.

जगाला लवकरच मोठ्या संघर्षाला तोंड द्यावे लागेल - ब्रिटनच्या संरक्षणमंत्र्यांच्या इशारादोन दिवसांपूर्वीच ब्रिटन व जपानदरम्यान ऐतिहासिक ‘हिरोशिमा ॲकॉर्ड’वर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. या करारात ब्रिटन जपानबरोबरील सामरिक व आर्थिक भागीदारी भक्कम करणार असल्याचे संकेत देण्यात आले होते. त्याचवेळी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील ब्रिटनची संरक्षण तैनाती वाढविण्यात येईल, याकडेही लक्ष वेधण्यात आले होते. या करारात रशिया व चीन या दोन्ही देशांच्या वाढत्या सहकार्याचा आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या धोक्यांचाही उल्लेख करण्यात आला होता.

ही पार्श्वभूमी लक्षात घेता ब्रिटनच्या संरक्षणमंत्र्यांनी नव्या संघर्षाबाबत दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो. नव्या संघर्षासाठी ब्रिटनने सज्ज राहण्यासाठी केलेले आवाहनही महत्त्वाचे असून पुढील काळात ब्रिटन संरक्षणक्षेत्रात अधिक वाढ करील, असे संकेत यातून मिळत आहेत.

हिंदी

 

leave a reply