अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या धाडसाच्या परिणामांना तेच जबाबदार असतील

- इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ

तेहरान – ‘याआधी अमेरिकेने इराकमध्ये सर्वसंहारक शस्त्र असल्याचे कुभांड आखून आखातात विध्वंस माजविला होता. यासाठी अमेरिकेला सात लाख कोटी डॉलर्सचे नुकसान आणि 58,976 अमेरिकी नागरिकांचे बळी द्यावे लागले होते. राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत आलेला असताना ट्रम्प यांनी असेच धाडस केले तर त्याचे याहून भीषण परिणाम होतील व याला सर्वस्वी ट्रम्पच जबाबदार असतील’, अशी धमकी इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ यांनी दिली आहे.

इराकमधील अमेरिकी दूतावासावर झालेल्या रॉकेट हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला सज्जड इशारा दिला होता. त्यावर इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेला धमकावले आहे. त्याचबरोबर अमेरिकेकडून संभाव्य हल्ल्याचा धोका असल्याचे सांगून इराणने आपल्या अणुप्रकल्पांच्या सुरक्षेसाठी हवाई सुरक्षा यंत्रणा तैनात केल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

रविवारी इराकमधील अमेरिकेच्या दूतावासावर रॉकेट हल्ले झाले. यानंतर अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ, हंगामी संरक्षणमंत्री ख्रिस्तोफर मिलर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांच्यात सुरक्षाविषयक बैठक पार पडली. अमेरिकी दूतावासावरील रॉकेट हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्या इराणच्या विरोधातील पर्यायांवर सदर बैठकीत चर्चा झाल्याचा दावा केला जातो. या बैठकीनंतरच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला होता.

इराणचे परराष्ट्रमंत्री झरिफ यांनी अमेरिकेचे आरोप फेटाळले. कोरोनाव्हायरसच्या विरोधातील लढ्यात मिळालेले अपयश लपविण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी ट्रम्प इराणवर आरोप करुन परदेशातील आपल्या नागरिकांचा जीव धोक्यात टाकत असल्याचा आरोप परराष्ट्रमंत्री झरिफ यांनी केला. तसेच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प अमेरिकेची सत्ता मिळविण्यासाठी आपल्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवसांमध्ये इराणवर हल्ले चढवू शकतात, असा ठपका इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ठेवला.

पण ट्रम्प यांनी असे धाडस केलेच तर त्याचे भीषण परिणाम होतील व यासाठी सर्वस्वी तेच जबाबदार असतील, असे परराष्ट्रमंत्री झरिफ म्हणाले. यासाठी झरिफ यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांचा फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध केला. 2001 साली इराकमधील सद्दाम हुसेनच्या राजवटीवर चढविलेल्या हल्ल्यात अमेरिकेच्या झालेल्या जीवित व वित्तहानीची आठवण परराष्ट्रमंत्री झरिफ यांनी करुन दिली.

इराणचे लष्करी अधिकारी देखील अमेरिकेला वेगवेगळ्या शब्दात इशारा देत आहेत. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌सच्या नौदल विभागाचे वरिष्ठ कमांडर रिअर ॲडमिरल अली रेझा तांगसिरी यांनी इराणचे नौदल आपल्या सागरी क्षेत्राच्या सुरक्षेसाठी सज्ज असल्याचे जाहीर केले. होर्मुझच्या आखातातील बेटांवर तैनात आपल्या जवानांची पाहणी केल्यानंतर तांगसिरी यांनी ही घोषणा केली. दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या आण्विक पाणबुडीने या सागरी क्षेत्रातून प्रवास केला होता. त्यानंतर इराणकडून ही प्रतिक्रिया आली आहे. तर कासेम सुलेमानी यांच्या हत्येचा सूड घेतला जाईल, अशी धमकीही इराणचे लष्करी अधिकारी देत आहेत.

leave a reply