अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीच्या भयंकर निर्णयाचा राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी केलेला बचाव दयनीय

- विरोधी पक्षनेते व माजी अधिकाऱ्यांचे घणाघाती प्रहार

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या आकस्मिक सैन्यमाघारीमुळे अफगाणिस्तानसमोर खड्या ठाकलेल्या संकटाला राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याची टीका जगभरातून होत आहे. पण आपला निर्णय योग्यच असल्याचे सांगून राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी त्याचे समर्थन केले. अफगाणी नेते आणि लष्करच जर तालिबानशी लढायला तयार नसेल, तर अमेरिकेने अफगाणिस्तानसाठी युद्ध का करावे? असा प्रश्‍न बायडेन यांनी केला. तसेच सैन्यमाघारीचा निर्णय आधीचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीच घेतला होता, असा बचाव बायडेन यांनी केला. ‘आपली कातडी वाचविण्यासाठी राष्ट्राध्यक्ष बायडेन दयनीय पातळीवर प्रयत्न करीत आहेत. अफगाणिस्तानबाबत त्यांनी स्वीकारलेला मार्ग अत्यंत घातक आणि अमेरिकेची मानहानी करणारा ठरतो’ अशा शब्दात अमेरिकेचे नेते तसेच माजी लष्करी अधिकारी या निर्णयाची निर्भत्सना करीत आहेत.

अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीच्या भयंकर निर्णयाचा राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी केलेला बचाव दयनीय - विरोधी पक्षनेते व माजी अधिकाऱ्यांचे घणाघाती प्रहार‘अपेक्षा होती, त्यापेक्षाही अधिक वेगाने तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला. पण तालिबानच्या तुलनेत कितीतरी अधिक संख्येने असलेल्या अफगाणी लष्कर व नेत्यांनी लढण्याचेच नाकारले. अफगाणी नेत्यांनी गुडघे टेकले आणि हा देश सोडून दुसरीकडे धाव घेतली. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानसाठी अमेरिकेने लढावे ही अपेक्षा अवाजवी ठरते. मी अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीच्या निर्णयावर अजूनही ठाम आहे’, असा दावा राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी केला. पण त्यांची ही विधाने बेजबाबदारपणाची ठरतात, असा ठपका सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी ठेवला. ‘अफगाणिस्तानातील परिस्थिती बायडेन यांच्याच बेताल धोरणाचा परिपाक आहे, याला सर्वस्वी तेच जबाबदार आहेत आणि आता ते याचे खापर दुसऱ्यावर फोडू पाहत आहेत’, असे ग्राहम म्हणाले.

‘आपल्या चुकीच्या निर्णयावर ठाम राहून बायडेन यांनी अमेरिकेची पाठराखण करणाऱ्या हजारो अफगाणींच्या कत्तलीचा मार्ग खुला करून दिला. तसेच तालिबानच्या साथीने अमेरिकेसाठी धोकादायक असलेल्या अल कायदाच्या नव्या उदयाची तयारी बायडेन यांनी करून दिलेली आहे’, अशा जहाल शब्दात बायडेन यांच्या निर्णयाच्या गंभीर परिणामांची जाणीव ग्राहम यांनी करून दिली. तर अफगाणिस्तानात तालिबानच्या विरोधात लढलेले अमेरिकेचे माजी लष्करी अधिकारी तर तालिबानचे दहशतवादी अमेरिकेला साथ देणाऱ्या अफगाणींची यादी तयार करीत असल्याची माहिती देत आहेत.अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीच्या भयंकर निर्णयाचा राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी केलेला बचाव दयनीय - विरोधी पक्षनेते व माजी अधिकाऱ्यांचे घणाघाती प्रहार

‘अमेरिकेच्या या अफगाणी मित्रांना बायडेन यांनी वाऱ्यावर सोडून दिल्याने अमानवी हत्याकांडाखेरीज त्यांच्यासमोर दुसरे भवितव्यच उरलेले नाही. या चुकीसाठी मी माझ्या देशाला कधीही माफ करणार नाही’, अशी हताश प्रतिक्रिया सीआयएचे माजी विश्‍लेषक मॅट झेलर यांनी नोंदविली आहे. तसेच तालिबानने अपेक्षाहून आधी काबुलचा ताबा घेतला, हा बायडेन यांचा दावा मॅट झेलर यांनी पूर्णपणे धुडकावून लावला.

‘तालिबान काही दिवसात काबुलमध्ये धडकेल, असा इशारा मी स्वतःहून बायडेन प्रशासनाला दिला होता. तसेच अमेरिकेला सहाय्य करणाऱ्या हजारो अफगाणींना सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचे प्रस्ताव देखील मी प्रशासनाला स्वतःहून दिले होते. पण वारंवार सांगूनही त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. ही अक्षम्य बेपर्वाई ठरते’, अशा शब्दात झेलर यांनी बायडेन प्रशासनाचे वाभाडे काढले. ‘बायडेन प्रशासन मानवाधिकारांसाठी लढा देत असल्याचा प्रचार केला जातो. पण अमेरिकेला सहाय्य करणाऱ्यांचा जीव वाचविण्याचे प्रयत्न न करणाऱ्या बायडेन प्रशासनाने, अमेरिकेवर कधीही विश्‍वास ठेवता येणार नाही, हा संदेश साऱ्या जगाला दिलेला आहे’, असे सांगून झेलर यांनी आपली निराशा व्यक्त केली.

leave a reply