अफगाणिस्तानातील भारतीयांच्या सुटकेसाठी प्रयत्नांना वेग देण्याची पंतप्रधानांची सूचना

नवी दिल्ली – तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरिय बैठकीचे आयोजन केले. अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याला सर्वोच्च प्राथमिकता देण्याची सूचना यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केल्याचे वृत्त आहे. तर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्याशी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन यांच्यात चर्चा पार पडली. तर भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांच्याशी अफगाणिस्तानबाबत चर्चा केल्याचे वृत्त आहे.

अफगाणिस्तानातील भारतीयांच्या सुटकेसाठी प्रयत्नांना वेग देण्याची पंतप्रधानांची सूचनाअफगाणिस्तानची राजधानी काबुलमधून भारतीय राजनैतिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना वायुसेनेच्या विमानाद्वारे मायदेशी आणले जात आहे. पण अजूनही अफगाणिस्तानमध्ये भारतीय अडकलेले आहेत. त्यांना तालिबानकडून धोका नसल्याचा निर्वाळा तालिबानचे प्रवक्ते देत आहेत. पण याबाबत कुठल्याही प्रकारची जोखीम पत्करण्यास भारत सरकार तयार नाही. या सर्वांना सुरक्षितरित्या मायदेशी आणण्याची सूचना पंतप्रधान मोदी यांनी केली. यासाठी काबुलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनेक विमाने पाठवावी लागली तरी हरकत नाही, असे पंतप्रधानांनी या बैठकीत म्हटल्याचे सांगितले जाते.

तालिबानच्या दहशतीमुळे अफगाणिस्तान सोडून भारतात आश्रयासाठी प्रयत्न करणाऱ्या हिंदू व शीख समुदायाच्या मंडळींना लवकरात लवकर भारतात आणण्याची सूचनाही पंतप्रधानांनी केली. अफगाणिस्तानात धार्मिक अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू व शीख समुदायाला तालिबानच्या हल्ल्याचा धोका संभवतो. म्हणूनच त्यांच्या सुटकेसाठी भारत करीत असलेले प्रयत्न अतिशय महत्त्वाचे ठरतात. दरम्यान, मंगळवारी सकाळी 120हून अधिक भारतीय राजनैतिक अधिकारी व कर्मचाऱ्यांसह आयटीबीपीचे जवानांचा समावेश असलेले वायुसेनेचे ‘सी-17’ विमान काबुलमधून गुजरातच्या जामनगर विमानतळावर उतरले. या सर्वांनी अफगाणिस्तानातील भयंकर परिस्थितीची माहिती माध्यमांना दिली.

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन यांनी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या चर्चेत अफगाणिस्तानात अडकलेल्यांच्या सुटकेचा मुद्दा अग्रस्थानी असल्याचे सांगितले जाते. तर परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांच्याशी अफगाणिस्तानातील परिस्थितीवर चर्चा केली. अफगाणिस्तानात अडकलेल्या 21 भारतीयांना फ्रान्सने काबुलमधून पॅरिसला नेऊन त्यांची सुटका केली. यासाठी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री ‘जीन येस ले द्रियान’ यांचे आभार मानले आहेत.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची अफगाणिस्तानविषयक बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत परराष्ट्रमंत्री जयशंकर भारताची भूमिका मांडणार आहेत. पण पाकिस्तानने विनंती करूनही या बैठकीत पाकिस्तानला सहभागी करण्यात आलेले नाही. यावर पाकिस्तानची माध्यमे थयथयाट करीत आहेत. हा पाकिस्तानचा अपमान ठरतो, असे पाकिस्तानी विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

leave a reply