अण्वस्त्रांच्या हल्ल्याबाबतचे सर्वाधिकार राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी स्वतःहून सोडून द्यावे

- डेमोक्रॅट पक्षाच्या संसद सदस्यांची मागणी

वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी, अण्वस्त्रहल्ल्याबाबत फक्त राष्ट्राध्यक्षांकडेच असलेले सर्वाधिकार स्वतःहून सोडून द्यावे, अशी वादग्रस्त मागणी सत्ताधारी डेमोक्रॅट पक्षाच्या सदस्यांनीच केली आहे. जवळपास ३० हून अधिक संसद सदस्यांनी अशी मागणी करणारे पत्र लिहिले असल्याची माहिती अमेरिकी माध्यमांनी दिली. एकाच नेत्याकडे अण्वस्त्रांच्या हल्ल्याबाबतचे अधिकार असणे अत्यंत धोकादायक ठरते, असे या संसद सदस्यांचे म्हणणे आहे.

‘अमेरिकेतील यापूर्वीच्या राष्ट्राध्यक्षांनी इतर देशांवर अण्वस्त्रहल्ले करण्याची धमकी दिली होती. काही राष्ट्राध्यक्षांनी यासंदर्भात केलेली वक्तव्ये व हालचाली तत्कालिन अधिकार्‍यांच्या चिंता वाढविणार्‍या ठरल्या होत्या. राष्ट्राध्यक्षांकडून अशा हल्ल्यापूर्वी इतरांचा सल्ला घेण्याची प्रथा असली तरी त्यासंदर्भात ठोस तरतूद नाही. युद्ध कायद्यांनुसार जर अण्वस्त्रहल्ल्याचे आदेश कायदेशीर

असतील, तर संरक्षणदलांना त्याची अंमलबजावणी करणे बंधनकारक ठरते. अमेरिकेतील न्यूक्लिअर फोर्सेसच्या सध्याच्या रचनेनुसार, असा हल्ला काही मिनिटातच होऊ शकतो’, असे सांगून एकाच व्यक्तीच्या हातात अण्वस्त्रहल्ल्याचे सर्वाधिकार ठेवणे ही अतिशय धोकादायक गोष्ट असल्याची जाणीव करून देण्यात आली आहे.

राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी हे अधिकार सोडून द्यावेत, अशी मागणी करतानाच संसद सदस्यांनी काही पर्यायही सुचविले आहेत. त्यात राष्ट्राध्यक्षांनी उपराष्ट्राध्यक्ष व सभापतींकडून परवानगी घ्यावी, असे सुचविण्यात आले आहे. गेल्या महिन्यात अमेरिकेतील कॅपिटल हिलवर झालेल्या हिंसाचारानंतर सभापती नॅन्सी पेलोसी यांनी, तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अण्वस्त्रहल्ल्याचे पाऊल उचलू शकतात, अशी भीती व्यक्त केली होती. पेलोसी यांनी संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले यांच्याशी या मुद्यावर चर्चाही केली होती.

मात्र आता डेमोक्रॅट पक्षाच्या सदस्यांनी आपल्याच पक्षाच्या राष्ट्राध्यक्षाने अण्वस्त्रसहल्ल्याचा अधिकार सोडून द्यावा, अशी आग्रही मागणी करणे ही अमेरिकेतील फार मोठी राजकीय घडामोड ठरते. यामुळे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे वाढलेले वय व त्यांच्या क्षमतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. खुद्द सत्ताधारी डेमोक्रॅट पक्षाच्या संसद सदस्यांचाच बायडेन यांच्या क्षमतेवर विश्‍वास नसल्याचे दिसू लागले आहे. काही दिवसांपूर्वी, राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना, व्हाईट हाऊसमध्ये राहणे आपल्यासाठी सोनेरी पिंजर्‍यात राहण्यासारखे ठरते, असे म्हटले होते.

ज्यो बायडेन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणारे सर्वात वृद्ध राजकीय नेते आहेत. त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्याकडे राष्ट्राध्यक्षपदासाठी शारिरीक उर्जा व मानसिक क्षमता आहे का, याबाबत चर्चा सुरू झाली होती. उपराष्ट्राध्यक्षपदासाठी कमला हॅरिस यांचे नाव निश्‍चित झाल्यानंतरही सोशल मीडियावर, बायडेन यांची जागा हॅरिस घेतील अशी चर्चा सुरू झाली होती.

दोन वर्षांपूर्वी माजी संरक्षणमंत्री रॉबर्ट गेट्स यांनी बायडेन यांच्यासारख्या वृद्ध व्यक्तींकडे राष्ट्राध्यक्षांसाठी लागणारी आवश्यक क्षमता आहे का, अशी शंका उपस्थित केली होती.

leave a reply