रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाला राष्ट्राध्यक्ष बायडेन जबाबदार

- अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांचा ठपका

राष्ट्राध्यक्ष बायडेनवॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी पुरेसा ठामपणा व निर्धार न दाखविल्याने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन युक्रेनवर आक्रमण करु शकले, असा ठपका माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी ठेवला. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या कारकिर्दीत अमेरिकी प्रशासनाने केलेल्या कामावर गेल्या १४ महिन्यात पाणी फेरले गेले, असा दावाही त्यांनी यावेळी केला. बायडेन व रशियावर टीका करतनाचा अमेरिकेला असणारा सर्वाधिक धोका चीनच्या कम्युनिस्ट राजवटीकडून असल्याचेही त्यांनी बजावले.

अमेरिकेत ‘कॉन्झर्व्हेटिव्ह पॉलिटिकल ऍक्शन कॉन्फरन्स’ला सुरुवात झाली असून या परिषदेत बोलताना पॉम्पिओ यांनी बायडेन यांच्यावर टीकास्त्र सोडले. ‘रशियन हुकुमशहा युक्रेनच्या जनतेला धमकावताना, दहशतीचे वातावरण निर्माण करताना दिसत आहे. यामागे अमेरिकेच्या प्रशासनाने ठामपणा न दाखविणे हे प्रमुख कारण ठरले आहे. चार वर्षांपूर्वी ट्रम्प प्रशासनाने रशियाविरोधात निर्धार दाखविला होता, पण सध्याचे प्रशासन ते दाखवू शकले नाही’, असा ठपका माजी परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी ठेवला.

राष्ट्राध्यक्ष बायडेनबायडेन प्रशासनाचा कमकुवतपणा ही आपल्यासाठी दुःखाची बाब असून अमेरिकेला चांगल्या नेतृत्त्वाची गरज आहे व संपूर्ण जगाचे डोळे त्याकडे लागले आहेत, असा दावाही पॉम्पिओ यांनी यावेळी केला. माईक पॉम्पिओ यांनी यावेळी आपण आपल्या कारकिर्दीत रशियाविरोधी भूमिकेचा पुरस्कार केल्या असल्याचा दावाही केला. पॉम्पिओ यांनी २०२४ साली होणार्‍या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून दावा दाखल करण्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी ‘कन्झर्व्हेटिव्ह पॉलिटिकल ऍक्शन कॉन्फरन्स’ केलेले वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरते.

या परिषदेला डेमोक्रॅटिक पक्षाच्या माजी संसद सदस्य तुलसी गॅबार्ड यांची उपस्थिती लक्ष वेधून घेणारी ठरली. गॅबार्ड यांनी यावेळी डेमोक्रॅट पक्षाची धोरणे तसेच बायडेन यांच्या निर्णयांना लक्ष्य केले. अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांच्याविरोधातील चौकशी करणे आवश्यक असल्याची मागणी त्यांनी यावेळी केली. बायडेन-क्लिंटन व त्यांच्या निकटवर्तियांकडून राबविण्यात येणार्‍या अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाला आपला ठाम विरोध असल्याचेही गॅबार्ड यावेळी म्हणाल्या.

leave a reply