बायडेन यांना रोखण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प अमेरिकेत ‘मार्शल लॉ’ लागू करतील

- लष्करी वर्तुळात चर्चा सुरू असल्याचा माध्यमांचा दावा

वॉशिंग्टन – भावी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सत्तेची सूत्रे हाती घेऊ नयेत, यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ‘मार्शल लॉ’ लागू करु शकतात, अशी जोरदार चर्चा अमेरिकेच्या लष्करी वर्तुळात सुरू झाली आहे. अमेरिकेतील आघाडीचे साप्ताहिक ‘न्यूजवीक’ने तसा दावा केला आहे. अमेरिकी लष्करातील आजी-माजी अधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेनंतर हा दावा करीत असल्याचे साप्ताहिकाने म्हटले आहे. मात्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी एक ट्विट करून ‘मार्शल लॉ’संदर्भातील वृत्त म्हणजे ‘फेक न्यूज’ असल्याचे सांगून ही बाब फेटाळून लावली आहे. मात्र अमेरिकेच्या संरक्षण विभागात यासंदर्भातील शक्यता व पर्यायासंदर्भात बोलणी सुरू असल्याच्या बातम्या देण्यात येत आहेत.

गेल्या महिन्यात झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटस्‌ पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांना सर्वाधिक मते मिळाली असून ‘इलेक्टोरेल कॉलेज’ या यंत्रणेनेही बायडेन यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले आहे. मात्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी काही राज्यांमधील मतदानात मोठे गैरव्यवहार झाल्याचे आरोप करून आपण विजयी झाल्याचे दावे केले आहेत. या मुद्यावरून त्यांनी सुरू केलेल्या न्यायालयीन लढाईला अपयश आले असून ट्रम्प इतर मार्गांची चाचपणी करीत असल्याचे सांगण्यात येते.

काही दिवसांपूर्वी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे माजी सल्लागार असणाऱ्या मायकल फ्लिन यांनी, ‘मार्शल लॉ’चा पर्याय समोर आणला होता. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी लष्करी अधिकारांचा वापर करून काही राज्यांमध्ये पुन्हा मतदान घ्यावे, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर मायकल फ्लिन व ट्रम्प यांच्या कायदेशीर सल्लागारांची व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्षांबरोबर बैठक झाल्याचे वृत्तही समोर आले होते. या बैठकीत फ्लिन व ट्रम्प यांच्या काही निकटवर्तियांनी उघडपणे राष्ट्राध्यक्षांना ‘मार्शल लॉ’ लागू करण्याचा सल्ला दिला होता, असा दावा सूत्रांनी केला.

या वृत्तानंतर, आर्मी सेक्रेटरी रायन मॅक्कार्थी व लष्करप्रमुख जनरल जेम्स सी. मॅक्कॉनविल यांनी संयुक्त निवेदन जारी केले. ‘अमेरिकेतील निवडणुकीचा निकाल ठरविण्यात अमेरिकी लष्कराची काहीही भूमिका नाही’, असा खुलासा यात करण्यात आला. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ट्विट करून ‘मार्शल लॉ=फेक न्यूज’ असे सांगून हा वाईट पत्रकारितेचा भाग असल्याची टीका केली. मात्र या स्पष्टीकरणानंतरही ‘मार्शल लॉ’संदर्भातील चर्चा अद्यापही थांबली नसल्याचे समोर येत आहे. अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय ‘पेटॅगॉन’मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये या मुद्यावर बोलणी सुरू असून याबद्दल व्हाईट हाऊसमध्ये माहिती पोचणार नाही, याची काळजी घेण्यात येत असल्याचा दावा माध्यमांनी केला.

अमेरिकेच्या लष्करी वर्तुळातील आजीमाजी अधिकाऱ्यांनी ‘मार्शल लॉ’चा पर्याय स्पष्ट शब्दात फेटाळून लावल्याचे ‘न्यूजवीक’च्या वृत्तात सांगण्यात आले आहे. निवडणुकांच्या निकालावरून ‘मार्शल लॉ’ लागू करण्याची कोणतीही तरतूद अमेरिकेच्या राज्यघटनेत नसल्याचीही जाणीव करून देण्यात येत आहे. मात्र त्याचवेळी सध्या कोरोनाच्या साथीच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेत ‘इमर्जन्सी’ लागू असून त्याअंतर्गत राष्ट्राध्यक्षांना असलेल्या अधिकारांकडेही लक्ष वेधण्यात येत आहे. ट्रम्प यांच्या समर्थकांकडून राजधानी वॉशिंग्टन व इतर भागात गडबड माजविण्याचा प्रयत्न झाला तर त्याचा आधार घेऊन ‘मार्शल लॉ’ लागू करण्यासाठी हालचाली होऊ शकतात, अशी शक्यताही माजी अधिकारी तसेच सूत्रांकडून वर्तविण्यात आली आहे.

leave a reply