भारताच्या शस्त्रखरेदीमुळे पाकिस्तानात खळबळ

नवी दिल्ली/इस्लामाबाद – भारताने इस्रायलकडून ‘स्पाईस 2000’ हे गायडेड बॉम्ब तसेच ‘स्पाईक’ ही रणगाडाभेदी क्षेपणास्त्रे खरेदी करण्याची तयारी केली आहे. पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ला चढविताना भारताने ‘स्पाईस 2000’चा वापर केला होता. त्यामुळे भारताच्या या संरक्षण व्यवहाराचे पडसाद पाकिस्तानात उमटू लागले आहेत. भारताने बालाकोटवर हवाई हल्ला चढवून 300 जणांना ठार केले, हे मान्य न करण्याची घोडचूक पाकिस्तानच्या सरकारने केली आहे. यामुळे दडपणातून मुक्त झालेला भारत पाकिस्तानवर नव्या हल्ल्याची तयारी करीत असल्याचा चिंता या देशाच्या माजी राजनैतिक अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.

23 डिसेंबर रोजी इस्रायलच्या ‘राफेल ॲडव्हान्स डिफेन्स सिस्टीम’ या शस्त्रास्त्रनिर्मिती करणाऱ्या कंपनीने एका आशियाई देशाबरोबर आपला ‘स्पाईस’ बॉम्ब तसेच ‘स्पाईक’साठी करार झाल्याचे जाहीर केले होते. या देशाचे नाव सदर कंपनीने जाहीर केलेले नाही. पण ब्रिटनच्या ‘जेन्स डिफेन्स विकली’ या साप्ताहिकाने इस्रायली कंपनीने हा करार भारताबरोबरच केल्याचे म्हटले आहे. या बातम्या प्रसिद्ध होत असतानाच, भारत आपल्यावर हल्ल्याच्या तयारीत असल्याचे दावे ठोकणाऱ्या पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानचे सरकार भारत आपल्या देशावर हल्ल्याच्या तयारीत असल्याचा कांगावा करीत आहे. यासाठी भारत दहशतवादी हल्ल्याचे निमित्त पुढे करील, अशी चिंता पाकिस्तानचे पंतप्रधान व इतर मंत्री व्यक्त करीत आहेत.

काही दिवसांपूर्वी भारताच्या लष्करप्रमुखांनी संयुक्त अरब अमिरात व सौदी अरेबियाचा दौरा केला होता. भारताचे परराष्ट्रमंत्री तसेच उपपरराष्ट्रमंत्री देखील आखाती देशांना भेटी देत आहेत. याचा दाखला देऊन पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी भारत आपल्या पाकिस्तनवरील हल्ल्याला पाठिंबा मिळविण्याच्या तयारीत असल्याचा ओरडा सुरू केला आहे. हा दावा हास्यास्पद असल्याचे सांगून भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही बाब धुडकावली आहे. पण पाकिस्तानची माध्यमे तसेच पत्रकार व भारतद्वेष्टे विश्‍लेषक लवकरच भारताचा हल्ला होणार असे छातीठोकपणे सांगू लागले आहेत.

यासंदर्भात बोलताना पाकिस्तानचे माजी राजनैतिक अधिकारी जफर हिलाली यांनी लक्षवेधी विधाने केली. पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या बालाकोट येथे 26 फेब्रुवारी 2019 रोजी हवाई हल्ला चढविला होता. या हल्ल्यात बालाकोटमधील ‘जैश-ए-मोहम्मद’चा तळ नष्ट झाला होता. ‘स्पाईस 2000’ बॉम्बचा वापर करून चढविलेल्या या हल्ल्यात सुमारे 300 दहशतवादी ठार झाल्याचे दावे करण्यात येत होते. तर पाकिस्तानने हा दावा नाकारून यात फक्त काही झाडे व एक कावळा दगावल्याचे म्हटले होते. पण जफर हिलाली यांनी या हल्ल्याबाबत पाकिस्तानी सरकारने दडविलेली माहिती आपल्या देशाच्या मुळावर आल्याची टीका केली आहे. या हल्ल्यात 300 जण ठार झाले होते व ते नाकारून पाकिस्तानच्या सरकारने भारताच्या नव्या हल्ल्यांना आमंत्रण दिले आहे, असा ठपका हिलाली यांनी ठेवला आहे.

leave a reply