आर्क्टिकमधील संरक्षणसिद्धतेसाठी रशियाकडून ‘रिसर्च लॅब’ची उभारणी

मॉस्को – आर्क्टिक क्षेत्रातील अतिथंड वातावरणात वापरण्यात येणाऱ्या शस्त्रास्त्रांसाठी रशियाने स्वतंत्र ‘रिसर्च लॅब’ उभारली आहे. ‘द सेंट्रल सायंटिफिक रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर प्रिसिजन मशिन इंजिनिअरिंग’ या संस्थेने ही माहिती दिली आहे. प्रयोगशाळेत उणे 60 अंश इतक्या कमी वातावरणात शस्त्रांची चाचणी घेण्याची सुविधा आहे, असे सांगण्यात येते. काही महिन्यांपूर्वीच रशियाने आर्क्टिकसाठी स्वतंत्र धोरण जाहीर केले असून त्यात इंधनक्षेत्राचा विकास व लष्करी सिद्धतेसाठी महत्त्वाकांक्षी योजनांचा समावेश आहे. नवी ‘रिसर्च लॅब’ही त्याचाच भाग मानला जातो.

आर्क्टिक क्षेत्रापैकी सुमारे 53 टक्के समुद्रकिनारा व 50 टक्के लोकसंख्या रशियाचा भाग मानला जातो. रशियाकडून उत्पादन होणाऱ्या नैसर्गिक इंधनवायूपैकी 90 टक्के नैसर्गिक वायु आर्क्टिक क्षेत्रातून येतो. तर कच्च्या तेलाच्या उत्पादनापैकी सुमारे 20 टक्के आर्क्टिकमधील इंधनक्षेत्रातून येते. गेल्या काही वर्षात आर्क्टिक क्षेत्रातील बर्फ वेगाने वितळण्यास सुरुवात झाली असल्याने या सागरी मार्गाने होणाऱ्या व्यापारातही वाढ होऊ लागली आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी गेल्या काही वर्षात आर्क्टिक क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केल्याचे समोर येत आहे.

गेल्या दशकभरात रशियाने आर्क्टिक भागातील व त्याला जोडून असलेल्या प्रांतांमध्ये 50हून अधिक संरक्षणतळ सक्रिय केले आहेत. आर्क्टिक सागरी क्षेत्रासाठी रशियाने पाच प्रगत ‘न्यूक्लिअर आईसब्रेकर्स’ कार्यरत करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली असून त्यातील एक सप्टेंबर महिन्यात सक्रिय झाली आहे. काही महिन्यांपूर्वी रशियाने ‘फ्रान्स जोसेफ लँड’ या आर्क्टिकमधील भागात प्रगत लढाऊ विमानांच्या सहाय्याने हवाईसराव पार पाडला असून, या क्षेत्रातील हवाईतळ युद्धसज्ज केल्याचा दावा डेन्मार्कच्या गुप्तचर यंत्रणेने केला आहे.

गेल्या सहा महिन्यात रशियाने आर्क्टिक भागात अतिप्रगत क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेतल्याचेही समोर आले आहे. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात ‘बुरवेस्टनिक’ नावाच्या ‘न्यूक्लिअर पॉवर्ड क्रूझ मिसाईल’ची चाचणी घेण्यात आल्याचे सांगण्यात येते. तर नोव्हेंबर महिन्यात ‘झिरकॉन’ या प्रगत हायरपसोनिक क्षेपणास्त्राचीही चाचणी घेण्यात आली आहे. संरक्षणतळांची उभारणी व या चाचण्या रशिया आर्क्टिकमध्ये लष्करी वर्चस्वासाठी हालचाली करीत असल्याचे दाखवून देतात. आर्क्टिकमधील शस्त्रास्त्रांच्या चाचणीसाठी सुरू करण्यात आलेली लॅबदेखील त्याचाच भाग आहे.

ही लॅब शीतयुद्धाच्या काळात उभारण्यात आली होती. मात्र त्यानंतर आर्थिक अडचणींमुळे बंद करण्यात आली होती. रशियाच्या आर्क्टिक धोरणाअंतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध करून ती पुन्हा सुरू करण्यात आली असून सध्या त्यात रायफल्स, ग्रेनेड लाँचर्स व तोफगोळ्यांची चाचणी सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. या लॅबपाठोपाठ रशियाने फक्त आर्क्टिक क्षेत्राच्या संशोधनासाठी स्वतंत्र ‘रिसर्च व्हेसल’ही लाँच केल्याचे उघड झाले.

गेल्या आठवड्यात ‘नॉर्थ पोल’ नावाची ही शिप लाँच करण्यात आली असून त्यासाठी तब्बल 10 कोटी डॉलर्स खर्च करण्यात आले आहेत. हे जहाज सलग दोन वर्षे सागरी तसेच बर्फाळ क्षेत्रात सक्रिय राहू शकते, असा दावा रशियन सूत्रांकडून करण्यात आला आहे.

leave a reply