पाकिस्तानच्या पंतप्रधानांना चीनची नाराजी भोवणार

- पाकिस्तानी माध्यमांचा दावा

चीनची नाराजीइस्लामाबाद – ‘चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर-सीपीईसी’चा भाग असलेल्या रेल्वे प्रकल्पासाठी चीनने पाकिस्तानला एक अब्ज डॉलर्स पुरविण्यास नकार दिला. सीपीईसी प्रकल्प सध्या रखडला असून याबाबत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या भूमिकेवर चीन नाराज आहे. वेगवेगळ्या मार्गाने चीन आपला असंतोष व्यक्त करीत असल्याचे दावे केले जातात. पाकिस्तानचा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या ‘पीएमएल-एन’ या नवाझ शरीफ यांच्या पक्षाशी चीनवर राज्य करणारा कम्युनिस्ट पक्ष सहकार्य प्रस्थापित करील, असे पाकिस्तानातील चीनच्या राजदूताने जाहीर केले आहे. हा इम्रान खान यांना चीनने दिलेला धक्का ठरतो. इतकेच नाही तर पंतप्रधान इम्रान खान यांची उचलबांगडी करण्यासाठी चीन पुढाकार घेत आहे, असा दावा पाकिस्तानी पत्रकार करू लागले आहेत.

Advertisement

दुसर्‍या देशातील आपला प्रभाव वाढवून त्या देशावर वर्चस्व गाजविण्यासाठी चीन राजकीय हस्तक्षेप करीत असल्याची उदाहरणे याआधीही समोर आली होती. श्रीलंका, नेपाळ, मालदीव इत्यादी देशांमध्ये आपले हस्तक असलेल्या नेत्यांना सत्ता मिळावी यासाठी चीनने मोठी गुंतवणूक करून सत्ताबदल घडवून आणले होते. पाकिस्तानातही चीन हा प्रयोग करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. पंतप्रधान इम्रान खान यांनी ‘सीपीईसी’ प्रकल्पात आधीच्या सरकारने गैरव्यवहार व भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले होते. म्हणूनच चीनबरोबर या प्रकल्पावर नव्याने वाटाघाटी करण्याचा प्रयत्न इम्रान खान यांनी करून पाहिला. पण चीनने त्याला स्पष्टपणे नकार दिला.

यावरील मतभेदानंतर सीपीईसी प्रकल्प सध्या ठप्प पडल्याचे दिसत आहे. पाकिस्तानला चीनकडून अधिक गुंतवणूक व कर्जाची अपेक्षा आहे. पण सदर प्रकल्पाच्या बाबतीत चीनच्याही काही अपेक्षा असून आत्तापर्यंत दिलेल्या कर्जाची परतफेड पाकिस्तान करील का, याबाबत चीनला शंका वाटू लागली आहे. यामुळे निर्माण झालेला संशय आणि अविश्‍वास याचा परिणाम सदर प्रकल्पावर झाला असून हा प्रकल्प पूर्णत्वात जाणार नाही, अशी चिंता पाकिस्तानी माध्यमे व्यक्त करू लागली आहेत.

अशा परिस्थितीत चीनने पाकिस्तानच्या विरोधी पक्षाशी हातमिळवणी केली आहे. पीएमएल-एनचे नेते शाहबाझ शरीफ यांच्याशी पाकिस्तानातील चीनचे राजदूत नॉंग रॉंग यांनी चर्चा केली. यानंतर माजी पंतप्रधान नवाझ शरीफ चीनचे जूने मित्र असल्याचे सांगून चीन जून्या मित्रांना कधीही विसरत नाही, असे राजदूत रॉंग म्हणाले. तसेच शरीफ यांचा पीएमएल-एन पक्ष व चीनची कम्युनिस्ट पार्टी यांच्यात उत्तम सहकार्य प्रस्थापित केले जाईल, असा संदेश रॉंग यांनी दिला.

हा पंतप्रधान इम्रान खान यांच्यासाठी चीनने दिलेला इशारा ठरतो. पुढच्या काळात इम्रान खान यांची उचलबांगडी करण्यासाठी चीन विरोधी पक्षांशी व पाकिस्तानी लष्कराशीही हातमिळवणी करील, असे दावे पाकिस्तानी पत्रकार करीत आहेत.

leave a reply