इराणसमर्थक दहशतवादी आखातात तैनात अमेरिकी जवानांवर हल्ले चढवतील

- अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा इशारा

इराणसमर्थक दहशतवादीदुबई – ‘आखात सध्या गृहयुद्धाआधीच्या काळातून प्रवास करीतआहे. पण येत्या काळात इराणसमर्थक दहशतवादी आखातात तैनात अमेरिकी जवानांवर हल्ले चढवतील, अमेरिकेच्या सहकारी देशांना लक्ष्य करतील व यामुळे आखतात नवा तणाव निर्माण होईल’, असा इशारा अमेरिकन हवाईदलाचे वरिष्ठ अधिकारी लेफ्टनंट जनरल ॲलेक्सस ग्रिन्केविच यांनी दिला. त्याचबरोबर इराणच्या अणुकार्यक्रमात वेगाने सुरू असलेल्या हालचाली देखील आखातातील तणाव वाढविणाऱ्या असल्याचा दावा लेफ्टनंट जनरल ग्रिन्केविच यांनी केला. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या आखात दौऱ्यानंतर अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी हा इशारा दिला आहे.

आखातातील अमेरिकेच्या लष्करी कमांडच्या नेतृत्वात बदल होत आहेत. इराक, सिरिया, अफगाणिस्तानसह आखातातील हवाईदलाची सूत्रे लेफ्टनंट जनरल ग्रिन्केविच यांच्या हाती सोपविण्यात आली आहेत. कतारमधील अमेरिकेचे हवाईतळ अल उदेद येथील कमांडची सूत्रे हाती घेण्याआधी लेफ्टनंट जनरल ग्रिन्केविच यांनी माध्यमांशी बोलताना इराण व इराणसंलग्न दहशतवादी संघटनांपासून असलेला धोका अधोरेखित केला.

इराणसमर्थक दहशतवादीअणुकराराबाबतच्या वाटाघाटी सुरू असतानाही इराणकडून अणुकार्यक्रमाचा सुरू असलेला विस्तार हा या क्षेत्रातील तणावाचे मुख्य कारण असल्याचा दावा लेफ्टनंट जनरल ग्रिन्केविच यांनी केला. तसेच इराणकडून असलेल्या धोक्याची जाणीवही ग्रिन्केविच यांनी करुन दिली. ‘अमेरिकेवर सातत्याने हल्ले झालेले नाहीत. पण या हल्ल्यांची योजना आखली जात आहे, हे अमेरिका ओळखून आहे. येत्या काळात अमेरिकेच्या विरोधात फार मोठे काही घडविण्याची तयारी सुरू आहे’, असा दावा ग्रिन्केविच यांनी केला.

तसेच येमेनमध्ये इराणसंलग्न हौथी बंडखोर संघर्षबंदीसाठी तयार झाले असले तरी ही परिस्थिती फार काळ राहणार नसल्याचा इशारा ग्रिन्केविच यांनी दिला. तर इराकमधील इराणसंलग्न दहशतवाद्यांकडूनही अमेरिकेच्या जवानांच्या सुरक्षेला धोका असल्याचा दावा अमेरिकेच्या हवाईदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला.

दरम्यान, गेल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी सौदी अरेबियाचा दौरा केला होता. इराणचा अणुकार्यक्रम व इराणसंलग्न दहशतवादी संघटनांचा वाढता प्रभाव हे मुद्दे सौदी तसेच अरब-आखाती मित्रदेशांनी बायडेन यांच्यासमोर मांडले होते. त्यावेळी बायडेन यांनी येमेनमधील संघर्षबंदीचे स्वागत केले होते. पण बायडेन यांच्या सौदी दौऱ्यानंतर हौथी बंडखोरांनी संघर्षबंदीची मुदत वाढविणार नसल्याची घोषणा केली होती. त्यानंतर हौथी बंडखोरांनी येमेनी लष्करावर हल्ले चढविल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

leave a reply