काश्मीरमध्ये गेल्या २४ तासात सात दहशतवादी ठार

- सुरक्षादलाचा एक जवान शहीद

श्रीनगर – गेल्या चोवीस तासात काश्मीर खोऱ्यात सुरक्षादलांनी सात दहशतवाद्यांना ठार केले असून या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे व दारूगोळा जप्त केला आहे. शनिवारी पहाटे पुलवामाच्या जदूरा सेक्टरमध्ये सुरक्षादलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. या चकमकीदरम्यान एक जवान शहीद झाला. या भागात अजून काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली असून सर्च ऑपरेशन सुरू आहे. त्यापूर्वी शुक्रवारी दुपारी शोपियानच्या किलूरा भागात सुरक्षादलांनी चार दहशतवाद्यांना ठार केले तर एका दहशतवाद्याला अटक केली.

काश्मीरमध्ये गेल्या २४ तासात सात दहशतवादी ठारशुक्रवारी शोपियानमध्ये पकडण्यात आलेल्या दहशतवाद्याकडून सुरक्षादलाच्या जवानांना पुलवामामधल्या दहशतवाद्यांची खबर मिळाली. त्यानंतर जवानांनी शुक्रवारी रात्रीपासून या दहशतवाद्यांची शोध मोहिम सुरू झाली. सुरक्षादलाचे जवान जदूरा भागात पोहोचल्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरु केला. सुरक्षादलाच्या जवानांनी त्याला प्रत्युत्तर देत तीन दहशतवाद्यांना ठार केले.

या कारवाईत सुरक्षादलाचा एक जवान शहीद झाला आहे. तसेच घटनास्थळावरून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. या दहशतवाद्यांची नावे आणि ते कुठल्या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत, हे अजून स्पष्ट झालेले नाही. तसेच या भागात अजून काही दहशतवादी लपल्याची शंका असून सुरक्षादलाने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.

शुक्रवारी शोपियान जिल्ह्यातील किलूरा भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षादलाच्या जवानांना मिळाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर परिसरात सुरक्षादलाच्या जवानांनी घेराव घातला आणि शोधमोहीम सुरू केली. यादरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. जवानांनी चोख प्रत्युत्तर देत चार दहशतवादी ठार केले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून दोन एके रायफल्स आणि तीन पिस्तुल्स हस्तगत करण्यात आल्या आहेत.

कारवाईत ठार झालेले दहशतवादी ‘अल बद्र’ या दहशतवादी संघटनेचे असून यामध्ये अल बद्रच्या कमांडरचा समावेश आहे. या दहशतवाद्यांपैकी काही दहशतवाद्यांचा जम्मू आणि काश्मीरमधील सरपंच सुहैल भट यांच्या हत्येत सहभाग होता, अशी माहिती जम्मू आणि काश्मीरच्या पोलिसांनी दिली आहे. गेल्या दोन आठवड्यात सुरक्षादलाने शोपियानमध्ये एकूण १० दहशतवाद्यांना ठार केले आहे.

leave a reply