अंतराळ क्षेत्रात ‘क्वाड’ सहकार्य भक्कम होणार

- अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलियाच्या अंतराळ संस्थांबरोबर ‘इस्रो’चे प्रकल्प

अंतराळबंगळुरू – भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ‘क्वाड’मधील आपल्या सहकारी देशांबरोबर अंतराळ सहकार्य विस्तारणार आहे. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया निरनिराळ्या अंतराळ प्रकल्पांवर काम करीत आहेत. यामध्ये इस्रो आणि नासाच्या ‘निसार’ उपग्रह प्रकल्पाचा, जपानबरोबरील चंद्र मोहिमेचा समावेश आहे.

गेल्या आठवड्यात भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या ‘क्वाड’ देशांनी एक व्हर्च्युअल बैठक पार पडली पडली होती. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. यामध्ये भविष्यातील तंत्रज्ञानाच्या विकासासाठी एकत्रित काम करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. चारही देशांनी दिलेल्या संयुक्त निवेदनातही याचा उल्लेख होता. यासाठी ‘क्वाड’ देश निरनिराळ्या ‘वर्किंग ग्रुप’ची स्थापना करणार आहेत, अशी माहिती अधिकार्‍याने दिली आहे.

अंतराळतंत्रज्ञान क्षेत्रात अंतराळातील सहकार्य अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. भारताची ‘इस्रो’ सध्या अमेरिकेच्या नासाबरोबर ‘नासा-इस्रो सिंथेटिक एपर्चड रडार’ (एनआयएसएआर-निसार) मोहिमेवर काम करीत आहेत. २०२२ साली हा उपग्रह अवकाशात सोडण्यात येईल. ‘निसार’ उपग्रह हा एल आणि एस बॅण्ड या एकाचवेळी दोन फ्रिक्वेन्सीवर काम करणारा इमेजिंग उपग्रह असणार आहे.

या उपग्रहामुळे पृथ्वीचा, तेथील वातावरणाचा विस्तृत अभ्यास करता येईल. ‘नासा’ या मोहिमेसाठी ‘एल बॅण्ड’ जीपीएस रिसिव्हर, सॉलिड स्टेट रेकॉर्डर आणि पेलोड डाटा सबसिस्टिमचा पुरवठा करणार आहे. तर भारत यासाठी ‘एस बॅण्ड’ सिंथेटिक एपर्चड रडार (एसएआर) आणि प्रक्षेपण यान उपलब्ध करून देणार आहे. गेल्या आठवड्यातच इस्रोने या मोहिमेसाठी लागणारे ‘एस बॅण्ड’ एसएआर विकसित केल्याचे वृत्त आले होते.

नुकतेच ११ मार्च रोजी ‘इस्रो’ने जपान एअरोस्पेस एक्स्प्लोरेशन एजन्सीने (जेएएक्सए-जाक्सा) दोन्ही देशांमधील विविध पातळ्यांवर अंतराळ सहकार्याचा आढावा घेतला होता. यामध्ये दोन्ही देशांच्या एकत्रित अंतराळ सहकार्याचा भाग असलेल्या पृथ्वी निरिक्षण, चंद्र मोहिम आणि नेव्हिगेशन उपग्रहाबाबत प्रकल्पाच्या प्रगतीबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी या क्षेत्रातील संधी आणि देवाणघेवाणीबद्दलही चर्चा पार पडली. ‘इस्रो’ आणि ‘जाक्सा’मध्ये यावेळी ‘इंप्लिमेंटिंग ऍग्रीमेंट’ही पार पडले. यानुसार उपग्रहाकडून मिळणार्‍या माहितीच्या आधारे तांदळाच्या शेतीचे आणि वायु गुणवत्तेचे निरिक्षण करण्यात येणार आहे.

याशिवाय २०२३ मध्ये ‘इस्रो’ आणि ‘जाक्सा’ एकत्रितपणे चंद्र मोहिम राबविणार आहे. चंद्राच्या दक्षिण भागावर अंतराळयान पाठविण्यात येणार आहे. या संयुक्त चंद्र मोहिमेला ‘लूनार पोलर एक्स्प्लोरेशन’ (लुपेक्स) असे नाव देण्यात आले आहे.

याखेरीज ‘ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सी’ (एएसए)बरोबरही ‘इस्रो’ विविध प्रकल्पांवर काम करीत आहे. फेब्रुवारी महिन्यातच ‘इस्रो’ आणि ‘एएसए’मध्ये एक व्हर्च्युअल बैठक पार पडली होती. यावेळी २०१२ साली दोन्ही देशांच्या सरकारांमध्ये झालेल्या नागरी अंतराळ विज्ञान, तंत्रज्ञान आणि शिक्षण सहकार्य कराराच्या अंमलबजावणीवर चर्चा झाली. ‘एएसए’चे प्रमुख एनरिको पॅलेरमोही सहभागी झाले होते. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया अर्थ ऑब्जर्वेशन सॅटेलाईटवर काम करीत आहेत. तसेच इस्रोची मानवी अंतराळ मोहिम ‘गगनयान’ मोहिमेसाठी ऑस्ट्रेलियात ट्रान्पार्टेबल टर्मिनल उभारण्यात येणार आहे.

भारत अंतराळक्षेत्रात वेगाने प्रगती करीत असून गेल्या काही वर्षात भारताने राबविलेल्या मोहिमेने जगाला भारताच्या अंतराळ प्रगतीची दखल घ्यावी लागली आहे. तसेच भारताने व्यावसायिक अंतराळ उपग्रह प्रक्षेपणालाही सुरुवात केली असून यासाठी न्यू स्पेस इंडिया लिमिटेडकडून (एनएसआयएल) या व्यावसायिक शाखेने काही दिवसांपूर्वीच ब्राझिल आणि ऑस्ट्रेलियाचा उपग्रह अवकाशात सोडला होता. तसेच ‘एनएसआयएल’द्वारे उपग्रह प्रक्षेपणासाठी आणखी काही देशांनी संपर्क साधल्याची बातमीही आली होती.

गेल्यावर्षी भारताने अंतराळ क्षेत्र खाजगी संस्थांसाठी खुले केले होते. यानंतर भारताच्या अंतराळक्षेत्रात मोठी गुंतवणूक येत आहे. कित्येक परकीय कंपन्या भारतात या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. तसेच भारतातील कितीतरी स्टार्टअप कंपन्या या क्षेत्रात काम करीत आहेत. नुकतेच इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी अंतराळ क्षेत्रातील जास्तीतजास्त उपक्रमांना उद्योगांच्या हवाली करून इस्रो आधुनिक संशोधनावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे म्हटले आहे. या पार्श्‍वभूमीवर अंतराळ संशोधन क्षेत्रात ‘क्वाड’ देशांबरोबर इस्रोचे मजबूत होणारे सहकार्य लक्षवेधी ठरते.

leave a reply