सौदी सर्वाधिक प्रमाणात शस्त्रास्त्रे खरेदी करणारा देश

- स्वीडनस्थित अभ्यासगटाचा अहवाल

शस्त्रास्त्रेस्टॉकहोम – गेल्या पाच वर्षांमध्ये आखाती देशांच्या शस्त्रास्त्र खरेदीमध्ये २५ टक्क्यांची वाढ झाली आहे. सौदी अरेबिया हा जगातील सर्वात मोठा शस्त्रआयातदार देश ठरला असून जगभरातील एकूण संरक्षणविषयक खरेदीपैकी सुमारे ११ टक्के इतकी शस्त्रास्त्रांची खरेदी एकट्या सौदीने केली आहे. जगभरातील शस्त्र खरेदी-विक्रीवर नजर ठेवणार्‍या स्विडनस्थित ‘सिप्री’ने ही माहिती उघड केली. अमेरिकेने सौदीचा शस्त्रपुरवठा रोखण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही सौदी व इतर आखाती देशांच्या शस्त्रखरेदीवर त्याचा परिणाम होणार नसल्याचे सिप्रीने म्हटले आहे.

‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्युट’चा (सिप्री) अहवाल सोमवारी प्रसिद्ध झाला. या अहवालाच्या पहिल्या टप्प्यामध्ये जगभरातील शस्त्रास्त्र व्यवहारांबाबत गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी जाहीर करण्यात आली. २०१६ ते २० या कालावधीत जिथे आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्रेबाजारातील शस्त्रास्त्रांच्या खरेदी-विक्रीत विशेष बदल झाला नाही. पण या काळात आखाती देशांच्या शस्त्रखरेदीत मोठी वाढ झाल्याची नोंद या अभ्यासगटाने केली. यासाठी सिप्रीने २०११ ते १५ या पाच वर्षांच्या कालावधीशी तुलना केली आहे.

इराणचा अणुकार्यक्रम, आखाती देशांमधील शस्त्रस्पर्धा या नेहमीच्या मुद्यांबरोबरच येमेनमधील संघर्ष आणि सौदी व कतारमधील तणाव देखील शस्त्रखरेदी वाढविणारा ठरला, असा निष्कर्ष या अहवालात नोंदविण्यात आला आहे. सौदी व अरब मित्रदेशांना येमेनमधील संघर्षात यश मिळाले नाही. पण या संघर्षाच्या काळातच सौदी, युएई या देशांनी अमेरिकेकडून केलेल्या शस्त्रखरेदीत मोठी वृद्धी दिसल्याचे सिप्रीने म्हटले आहे. सौदीच्या शस्त्रआयातीत ६१ टक्क्यांची वाढ झाली आहे.शस्त्रास्त्रे

सिप्रीच्या अहवालानुसार, गेल्या पाच वर्षांमध्ये जगातील सर्वात मोठा शस्त्रनिर्यातदार असलेल्या अमेरिकेने ९६ देशांना शस्त्रास्त्रांची विक्री केली आहे. यापैकी जवळपास २५ टक्के शस्त्रे सौदी अरेबियाला पुरविण्यात आली आहेत. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना हे व्यवहार झाले होते.

तर २०१६ ते २० या पाच वर्षांच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या शस्त्रास्त्रांच्या व्यवहारांपैकी ११ टक्के शस्त्रे सौदीने खरेदी केली आहेत. भूमध्य समुद्रात तुर्कीबरोबरील वादात अडकलेल्या इजिप्तच्या शस्त्रखरेदीत १३६ टक्क्यांची तर कतारच्या शस्त्रखरेदीत ३६१ टक्क्यांची वाढ झाल्याचे सिप्रीचे म्हणणे आहे.

२०१६ ते २० च्या कालावधीत जगातील पहिल्या पाच शस्त्रनिर्यातदार देशांमध्ये अमेरिका आघाडीवर आहे. जगाच्या एकूण संरक्षणविषयक निर्यातीत अमेरिकेचा हिस्सा ३७ टक्के इतका आहे. तर दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या रशियाचा या बाजारपेठेतील हिस्सा भारताने शस्त्रखरेदी कमी केल्यामुळे कमी झाल्याचे सिप्रीच्या अहवालातून उघड होत आहे.

leave a reply