तालिबानच्या दहशतवादाविरोधात क्वाडने ‘इंटेलिजन्स’चे सहकार्य करावे

- भारताच्या संरक्षणदलप्रमुखांची अपेक्षा

नवी दिल्ली – तालिबान अफगाणिस्तानचा ताबा घेणार हे निश्‍चित होते. आम्हाला अपेक्षा होती, त्याच्या दोन महिने आधी ही गोष्ट घडली, असे भारताचे संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी म्हटले आहे. तसेच तालिबानमध्ये कुठल्याही स्वरुपाचा बदल झालेला नाही अशी नोंद करून केवळ तालिबानचे पार्टनर्स बदलले आहेत, असा टोला जनरल रावत यांनी लगावला. तालिबानच्या दहशतीचा धोका वाढत असताना क्वाडचे सदस्य असलेल्या देशांनी गोपनीय माहितीचे आदानप्रदान करावे, असे सांगून जनरल रावत यांनी अमेरिकेकडून असेलली अपेक्षा, अमेरिकेचे ॲडमिरल जॉन ॲक्विलिनो यांच्यासमोर स्पष्ट शब्दात मांडली.

तालिबानच्या दहशतवादाविरोधात क्वाडने ‘इंटेलिजन्स’चे सहकार्य करावे- भारताच्या संरक्षणदलप्रमुखांची अपेक्षा‘द इंडिया-युएस पार्टनरशिप: सेक्युअरिंग द 21 सेंच्युरी’ या विषयावर एका अभ्यासगटाने आयोजित केलेल्या चर्चेत जनरल रावत बोलत होते. अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडचे ॲडमिरल जॉन ॲक्विलिनो यांच्याबरोबरील संयुक्त मुलाखतीत जनरल रावत यांनी अफगाणिस्तानातील परिस्थिती व तालिबानबाबत परखड भूमिका मांडली. अफगाणिस्तानात घडत असलेल्या गोष्टींची भारताला आधी कल्पना आली होती. फक्त या गोष्टी अपेक्षेहून दोन महिने आधी घडत आहेत, असे जनरल रावत म्हणाले. गेल्या वीस वर्षात तालिबानमध्ये बदल झालेला नाही, केवळ तालिबानचे पार्टनर्स बदलले आहेत. अफगाणिस्तानातून बाहेर पडलेली मंडळी तालिबानच्या कारवायांची माहिती देत आहेत. त्यावरून हेच स्पष्ट होते, असे संरक्षणदलप्रमुख पुढे म्हणाले.

अफगाणिस्तानातील दहशतवाद भारतात दाखलझालाच, तर भारत दहशतवादावर करीत आहे, तितक्याच कठोर कारवाईद्वारे उत्तर देईल. या दहशतवादाचा मुकाबला करताना क्वाड देशांकडून गोपनीय माहितीचे सहकार्य मिळाले, तर त्याचे भारत स्वागत करील, असे जनरल रावत यांनी म्हटले आहे. दरम्यान, चीनच्या कारवायांमुळे इंडो-पॅसिफिक क्षेत्रात क्वाडचे सहकार्य अत्यावश्‍यक बनले आहे, असे संरक्षणदलप्रमुखांनी सूचक शब्दात मांडले.

हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागराची सीमारेषांनी विभागणी करता येत नाही. भारताने हिंदी महासागर क्षेत्र सुरक्षित ठेवावे व इतर देशांनी पॅसिफिक महासागराची जबाबदारी सांभाळावी, अशी जबाबदारीची वाटणीही करता येऊ शकत नाही. म्हणूनच इंडो-पॅसिफिक क्षेत्राचा व्यापक विचार करणे भाग आहे. क्वाडच्या सहकार्यामागे हा दृष्टीकोन आहे. आम्हाला इथे वाहतुकीचे पूर्ण स्वातंत्र्य अपेक्षित आहे, असे जनरल रावत यांनी स्पष्ट केले.

तालिबानच्या अफगाणिस्तानातील विजयामुळे निर्माण झालेली परिस्थिती व चीनचे आव्हान, या दोन्हीचा सामना करण्याची क्षमता भारतीय संरक्षणदलांकडे आहे, असा विश्‍वास जनरल रावत यांनी व्यक्त केला. भारताच्या शेजारी दोन अण्वस्त्रधारी देश आहेत. पण या दोघांपासून असलेला धोका लक्षात घेऊन भारताने आपली पारंपरिक व आण्विक युद्धाचीही सिद्धता ठेवलेली आहे, असे जनरल रावत यांनी बजाले. इंडो-पॅसिफिक क्षेत्राबाबतची भारताची ही भूमिका आक्रमक नसून समतोल साधणारी व सुरक्षेला प्राधान्य देणारी आहे. क्वाडमध्ये इतर देशांच्या सहभागाचेही स्वागतच होईल, असे सांगून जनरल रावत यांनी ब्रिटनची विमानवाहू युद्धनौका ‘एचएमएस क्विन एलिझाबेथ’च्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील मोहिमेचे स्वागत केले.

leave a reply