रेल्वेच्या २.८ किलोमीटर लांबीच्या ‘शेषनाग’ने इतिहास रचला

नवी दिल्ली – तब्बल २५१ डब्यांची मालगाडी चालवून भारतीय रेल्वेने नवा इतिहास रचला आहे. रेल्वेने या २.८ किलोमीटर लांबीच्या मालगाडीचे नाव ‘शेषनाग’, असे ठेवले होते. या गाडीने सहा तासात २६० किलोमीटरचा प्रवास केला. याआधी ३० जून रोजी ‘अ‍ॅनाकोंडा’ ही १७७ डब्यांची मालगाडी रेल्वेने चालवली होती. ‘अ‍ॅनाकोंडा’चा हा विक्रम ‘शेषनाग’ने मोडला. मालवाहतुकीसाठी लागणार वेळ आणि खर्च कमी करण्याकरिता रेल्वेकडून जास्त डब्यांच्या आणि वेग असलेल्या मालगाड्या चालविण्याचा प्रयोग सुरु आहे.

'शेषनाग'दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेची ही मालगाडी नागपूरपासून छत्तीसगडमधील कोरबापर्यंत धावली. गुरुवारी दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी सोडण्यात आलेली ही मालगाडी १ वाजून ५ मिनिटांनी दुर्गला पोहोचली. त्यानंतर ही मालगाडी दुर्गहून पुढे बिलासपूर आणि तेथून कोरबाकडे रवाना करण्यात आली. २६० कि.मी. अंतर शेषनागने सहा तासात कापले. शेषनाग ‘ चार मालगाड्या एकत्र जोडून तयार करण्यात आली. या मालगाडीला २५१ डबे, ४ ब्रेक व्हॅन आणि ९ विद्युत लोकोमोटिव्ह या ट्रेनला जोडण्यात आले होते. त्याचे इंजिन ६ हजार हॉर्सपॉवरचे होते.

सर्वसाधारणपणे मालगाड्यांचा वेग ताशी ३०किलोमीटर असतो. मात्र शेषनागचा वेग ताशी ६३ किलोमीटर इतका होता. रेल्वेकडून मालगाड्यांचा वेग ताशी ८० किलोमीटर पर्यंत वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ३० जून रोजी ओडिशातील लाजकुरा आणि राउरकेला दरम्यान “ऍनाकोंडा’ ही १७७ डब्यांची मालगाडी चालवण्यात आली होती. या मालगाडीच्या तीन मालगाड्यांचे डबे एकत्र जोडण्यात आले होते. तर त्यासाठी तीन इंजिनचा वापर करण्यात आला होता. मुख्य म्हणजे या मालगाडीवर १५ हजार टन सामान देखील होते. अशा मालगाड्यांमुळे एकाच वेळी जास्तीत जास्त सामान घेऊन जाणे शक्य होणार आहे. असे मत पीयूष गोयल यांनी व्यक्त केले.

दरम्यान, प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी खाजगी कंपन्यांना सहभागी करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. देशातील १०९ मार्गावरील प्रवासी रेल्वे सेवेचे व्यवस्थापन खासगी कंपन्यांकडे देण्यासाठी रेल्वेकडून विचार करण्यात येत असून त्यासाठी खाजगी कंपन्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. रेल्वेतर्फे १०९ रेल्वेमार्गावर १५१ खाजगी रेल्वे गाडय़ा चालवण्यात येणार आहेत. या प्रकल्पामध्ये ३० हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. खाजगी सेवा एप्रिल २०२३ प्रर्यंत सुरु होईल अशी माहिती रेल्वेमंडळाचे अध्यक्ष व्ही.के. यादव यांनी दिली.

या सर्व ट्रेन १६ डब्यांच्या असतील व त्याचा वेग ताशी साधारण १६० किलोमीटर असेल. खाजगी कंपन्यांकडे व्यवस्थापन सोपवण्यात आल्यास प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध होऊ शकतील. प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेची बचत करणे, रोजगार निर्मितीला चालना देणे, सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रवाशांना जागतिक स्तरावरील प्रवासाचा अनुभव देणे आणि प्रवासी वाहतूक क्षेत्रातील मागणी व पुरवठ्यामधील तूट कमी करण्यासह आधुनिक तंत्रज्ञानाच्या रेल्वे आणणे हे या उपक्रमाचे उद्दीष्ट आहे.

रेल्वेने गेल्यावर्षी ४ ऑक्टोबर रोजी लखनौ-दिल्ली तेजस एक्सप्रेस ही देशातील पहिली खासगी ट्रेन सुरु केली. त्यानंतर यावर्षी १७ जानेवारी रोजी अहमदाबाद-मुंबई तेजस एक्सप्रेस आणि १६ फेब्रुवारी रोजी काशी महाकाल एक्स्प्रेस ही तिसरी खाजगी ट्रेन सुरू करण्यात आली. हा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर आता १०९ मार्गावरील प्रवासी ट्रेनचे व्यवस्थापन खाजगी कंपन्यांकडे देण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.

leave a reply