अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत प्रतिनिधीगृहात रिपब्लिकन पार्टीला बहुमत

donald-trump-announcesवॉशिंग्टन – अमेरिकेत झालेल्या मध्यावधी निवडणूकांमध्ये प्रतिनिधीगृहाचा ताबा मिळविण्यात रिपब्लिकन पार्टीला यश मिळाले आहे. बुधवारी संध्याकाळी जाहीर झालेल्या निकालांनुसार, रिपब्लिकन पार्टीला २१८ जागांवर विजय मिळाला आहे. या विजयामुळे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना पुढील दोन वर्षे आपला अजेंडा राबविण्यासाठी जोरदार संघर्ष करावा लागेल, असे संकेत मिळत आहेत. महागाई, वाढती गुन्हेगारी व अमेरिकी सीमांची सुरक्षा या मुद्यांवरून बायडेन प्रशासनाची कोंडी करण्यात येईल, असे रिपब्लिकन पार्टीचे नेते केव्हिन मॅकार्थी यांनी स्पष्ट केले.

गेल्या आठवड्यात झालेल्या मध्यावधी निवडणुकांच्या निकालाचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणून ओळखण्यात येणाऱ्या सिनेटवर नियंत्रण कायम राखण्यात सत्ताधारी डेमोक्रॅट पार्टीला यश मिळाले आहे. सिनेटमधील एका जागेची निवडणूक पुढील महिन्यात होणार असून त्यावर पार्टीची पकड किती घट्ट असेल, याचा निर्णय होईल असा दावा विश्लेषकांनी केला. प्रतिनिधीगृहाच्या ४३५ जागांपैकी सहा जागांचे निकाल बाकी आहेत. हे निकाल लागण्यापूर्वीच रिपब्लिकन पार्टीने २१८ जागांवर विजय मिळवून प्रतिनिधीगृहाचा ताबा आपल्याकडे राहिल, हे दाखवून दिले.

US-mid-term electionsउर्वरित सहा जागांपैकी तीन अथवा चार जागा रिपब्लिकन पार्टीला मिळण्याचे संकेत देण्यात आले आहेत. यासंदर्भातील अंदाज खरे ठरल्यास रिपब्लिकन पार्टीला २२०चा टप्पा ओलांडता येईल. प्रतिनिधीगृहातील या बहुमताच्या जोरावर राष्ट्राध्यक्ष बायडेन व डेमोक्रॅट पक्षाच्या धोरणांची अंमलबजावणी रोखण्यावर रिपब्लिकन पार्टी भर देईल, असे पार्टीच्या नेत्यांकडून सांगण्यात आले. रिपब्लिकन नेते केव्हिन मॅकार्थी हे प्रतिनिधीगृहाचे सभापती म्हणून निवडले जातील, अशी शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. सभापती म्हणून निवड झाल्यावर अमेरिकेच्या सीमा सुरक्षेच्या मुद्यावरील विधेयकाला प्राधान्य देण्यात येईल, असे मॅकार्थी यांनी सांगितले.

प्रतिनिधीगृहात निवडून आलेल्या सदस्यांमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या समर्थकांच्या माध्यमातून ट्रम्प आपला अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न करु शकतात, असा दावा विश्लेषकांकडून करण्यात येत आहे. मात्र रिपब्लिकन पार्टीतील ट्रम्पविरोधी गटही सक्रिय झाला असून हा गट या अजेंडा नाकारु शकतो, असे संकेत देण्यात येत आहेत. दरम्यान, मंगळवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२४ सालच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी आपल्या उमेदवारीची घोषणा केली. अमेरिकी जनता अजून चार वर्षे बायडेन व डेमोक्रॅट पक्षाची मनमानी सहन करु शकत नाही, असा दावा करून आपण पुन्हा एकदा अमेरिकेला महान बनविण्याचे प्रयत्न करण्यासाठी नेतृत्त्व करु, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. ट्रम्प यांच्या उमेदवारीला रिपब्लिकन पार्टीसह प्रसारमाध्यमे व माजी सहकाऱ्यांकडून थंडा प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात येते. काही माजी निकटवर्तियांनी ट्रम्प यांचा काळ आता संपला आहे, अशी प्रतिक्रिया दिल्याचेही समोर येत आहे.

leave a reply