2019 सालच्या नोव्हेंबर महिन्यातील कोरोनाच्या संसर्गाची माहिती चीनने दडविली – अमेरिकेच्या वर्तमानपत्राचा दावा

वॉशिंग्टन/बीजिंग – चीनने जाणीवपूर्वक कोरोनाची साथ जगभरात पसरविली, या आरोपाला दुजोरा देणारी नवी माहिती जगासमोर आली आहे. अमेरिकेचे वर्तमानपत्र ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने चीनच्या वुहान प्रयोगशाळेतील संशोधकांना 2019 सालच्या नोव्हेंबर महिन्यातच कोरोनाचा संसर्ग झाला होता, अशी बातमी दिली. या संशोधकांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले, अशी माहिती यात देण्यात आली आहे. यानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही बातमी निराधार असल्याचे सांगून हा दावा फेटाळला आहे.

कोरोनाच्या संसर्गाची माहितीकोरोनाचा विषाणू म्हणजे चीनचे जैविक शस्त्रच असल्याचा आरोप सुरू झाला आहे. जरी हे जैविक शस्त्र नसले तरी चीनने या साथीचा वापर शस्त्रासारखाच केला, असे अमेरिकेचे विश्‍लेषक गॉर्डन चँग यांनी ब्रिटनच्या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. ही साथ पसरण्याच्या किमान पाच आठवडे आधी चीनला याची माहिती होती. पण चीनने ही सारी माहिती दडवून ठेवली, असा आरोप चँग यांनी केला होता. या आरोपांना पुष्टी देणारी बातमी ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने प्रसिद्ध केली.

2019 सालच्या नोव्हेंबर महिन्यातच वुहान येथील चीनच्या प्रयोगशाळेतील संशोधक आजारी पडले होते. कोरोनाचा संसर्ग हेच त्यांच्या आजारपणाचे कारण होते, असे सांगून द वॉल स्ट्रीट जर्नलने चीनने याची माहिती दडवून ठेवल्याचा दावा केला आहे. कोरोनाच्या उगमस्थानाची चौकशी करण्यासाठी तज्ज्ञांची बैठक लवकरच पार पडणार आहे. त्याच्या आधी समोर येत असलेली ही माहिती लक्षणीय ठरते. यामुळे चीन चांगलाच अडचणीत सापडला आहे.

कोरोनाच्या उगमस्थानाबाबतच्या तपासात वुहान प्रयोगशाळेत आजारी पडलेल्या या दोन संशोधकांची माहिती समोर आली, असे अमेरिकेच्या वर्तमानपत्राने स्पष्ट केले. मात्र याचे पुरावे व इतर तपशील याबाबत मतभेद आहेत, याकडेही सदर वर्तमानपत्राने लक्ष वेधले. जागतिक आरोग्य संघटनेने या साथीच्या तपासासाठी आपले पथक चीनमध्ये पाठविले होते. पण चीनने या पथकाला संपूर्ण सहकार्य करण्याचे नाकारले. कारण चीनला याबाबतची माहिती दडवून ठेवायची होती, हे ही आता यामुळे उघड होऊ लागले आहे.

दरम्यान, चीनने नेहमीप्रमाणे आपल्यावरील या आरोपाचे खंडन केले. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी द वॉल स्ट्रीट जर्नलने प्रसिद्ध केलेली बातमी चुकीची असल्याचा ठपका ठेवला. 30 डिसेंबर 2019 च्या आधी कुठल्याही चिनी संशोधकाला कोरोनाची लागण झालेली नव्हती, असे लिजिआन यांनी म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाला आरोपांवर खुलासे, स्पष्टीकरणे द्यावे लागत आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विश्‍लेषक व वर्तमानपत्रे कोरोनाची साथ चीननेच जगभरात पसरविली, असे गंभीर आरोप करीत आहेत. सुरूवातीच्या काळात या आरोपांची खिल्ली उडविणार्‍या चीनला आता यावर खुलासे व स्पष्टीकरणे देणे भाग पडत आहे. इतकेच नाही तर चीनवर यामुळे प्रचंड प्रमाणात दडपण आल्याचेही उघड होऊ लागले आहे.

यामुळे अस्वस्थ झालेल्या चीनने यासंदर्भात थेट अमेरिकेवरच हल्ला चढविल्याचे दिसते. अमेरिकेच्या सुमारे 200 जैविक प्रयोगशाळा दुसर्‍या देशांमध्ये सक्रीय आहेत, अशी माहिती देऊन या सार्‍या प्रयोगशाळा जागतिक आरोग्य संघटनेच्या परिक्षणासाठी खुल्या करण्यात याव्या, अशी मागणी चीनने केली आहे. याद्वारे आपण जैविक युद्धात गुंतलेले नसून अमेरिकाच तसे प्रयत्न करीत असल्याचा संदेश चीन सार्‍या जगाला देऊ पाहत आहे. पण सध्या तरी अमेरिकेवर तसे आरोप करून आपली सुटका करून घेण्याचे चीनचे प्रयत्न यशस्वी ठरण्याची शक्यता दृष्टीपथात नाही.

leave a reply