अमेरिका-जपान-फ्रान्सच्या नौदलाचा ‘इंडो-पॅसिफिक’मध्ये संयुक्त सराव

- फ्रान्सची आण्विक पाणबुडी सरावात सहभागी

गुआम/बीजिंग – इंडो-पॅसिफिक क्षेत्रात अमेरिका, जपान व फ्रान्सदरम्यान संयुक्त नौदल सराव पार पडला. अमेरिकेच्या ‘पॅसिफिक फ्लीट’ने ही माहिती दिली. या सरावात अमेरिकेची विनाशिका ‘युएसएस जॉन मॅक्केन’, जपानची विनाशिका ‘जेएस ह्युगा’ व फ्रान्सची आण्विक पाणबुडी ‘एफएस एमेरॉद’ सहभागी झाल्या होत्या. फ्रान्सने या क्षेत्रातील नौदल सरावासाठी आण्विक पाणबुडी पाठविण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात येते.

गेल्या काही वर्षात चीनने आपल्या संरक्षणदलांचे सामर्थ्य मोठ्या प्रमाणात वाढविण्यास सुरुवात केली आहे. चीनचे नौदल सध्या जगातील सर्वात मोठे नौदल म्हणून ओळखण्यात येत असून त्यात विमानवाहू युद्धनौकांसह प्रगत विनाशिका, अत्याधुनिक अ‍ॅम्फिबियस शिप्स, पाणबुड्या, टेहळणी नौका व ‘अंडरवॉटर ड्रोन्स’चा समावेश आहे. या नाविक सामर्थ्याच्या बळावर चीनने ‘साऊथ चायना सी’ व ‘ईस्ट चायना सी’सह इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील देशांविरोधात कारवाया सुरू केल्या आहेत. चीनच्या कारवाया रोखण्यासाठी अमेरिकेने व्यापक धोरण आखून या क्षेत्रातील आघाडीच्या देशांसह युरोपिय देशांनाही इंडो-पॅसिफिकच्या सुरक्षेसाठी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

अमेरिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन फ्रान्स व जर्मनी या आघाडीच्या देशांनी स्वतंत्र ‘इंडो-पॅसिफिक पॉलिसी’ जाहीर केली आहे. त्यात चीनच्या आक्रमकतेला रोखण्यासाठी या क्षेत्रात संरक्षण तैनातीचेही संकेत देण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच जपानने, जर्मनीने आपली युद्धनौका पॅसिफिक क्षेत्रात पाठवावी, असे आवाहन केले होते. फ्रान्सने या क्षेत्रातील आपली तैनाती यापूर्वीच सुरू केली असून, नौदल सरावात फ्रेंच पाणबुडीचा सहभाग त्याचाच भाग मानला जातो. यापूर्वी फ्रान्सने आपल्या विनाशिका इंडो-पॅसिफिकमध्ये ‘फ्रीडम ऑफ नॅव्हिगेशन’ अंतर्गत पाठविल्या होत्या. मात्र बहुराष्ट्रीय सरावात आण्विक पाणबुडी पाठविण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
अमेरिका-जपान व फ्रान्सचा नौदल सराव पॅसिफिक महासागराचा भाग असलेल्या ‘फिलिपाईन्स सी’ क्षेत्रात पार पडला. या सरावापूर्वी फ्रेंच पाणबुडी व ‘सपोर्ट शिप’ने अमेरिकेच्या गुआममधील संरक्षणतळाला भेट दिल्याची माहिती अमेरिकी नौदलाकडून देण्यात आली. सरावादरम्यान ‘अँटी सबमरिन वॉरफेअर टॅक्टिक्स’वर भर देण्यात आल्याचे अमेरिकी नौदलाच्या ‘सेव्हन्थ फ्लीट’कडून सांगण्यात आले. ‘भागीदार देशाच्या पाणबुडीबरोबर सरावाची संधी मिळणे ही दुर्मिळ संधी आहे. या सरावाने आमची युद्धसज्जता अधिक मजबूत झाली’, अशी प्रतिक्रिया अमेरिकी विनाशिकेवरील वरिष्ठ अधिकारी लेफ्टनंट रायन यांनी दिली.

संयुक्त सरावानंतर अमेरिकी विनाशिका ‘युएसएस जॉन मॅक्केन’ने साऊथ चायना सीमधील ‘स्प्राटले आयलंड’ भागातून प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी चीनच्या युद्धनौकेने अमेरिकी विनाशिकेचा पाठलाग केल्याची माहिती अमेरिकी नौदलाकडून देण्यात आली आहे. दरम्यान फ्रान्सची आण्विक पाणबुडी व सपोर्ट शिप फिलिपाईन्समध्ये दाखल झाल्याचे सांगण्यात येते.

leave a reply