युक्रेनमधील परिस्थिती, इंधनाचे वाढते दर आर्थिक स्थैर्याला आव्हान देणारे – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

Nirmala-Sitharamanमुंबई – रशिया-युक्रेनमधील तणाव आणि इंधनतेलाच्या वेगाने वाढत असलेल्या किंमती देशाच्या आर्थिक स्थिरतेसाठी आव्हान ठरू शकतात, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. अर्थमंत्री सीतारामन यांच्या उपस्थितीत ‘फायनान्शियल स्टेबिलिटी डेव्हल्पमेंट काउन्सिल’ची (एफएसडीसी) बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत देशाच्या आर्थिक स्थिरतेसाठी धोकादायक ठरू शकणार्‍या या दोन प्रश्‍नांवर व इतर आव्हानांवर सविस्तर चर्चा करण्यात आली, अशी माहिती सीतारामन यांनी दिली. तसेच वित्तीय क्षेत्रावरील आरबीआयसह इतर सर्व नियंत्रकांनी परिस्थितीकडे बारकाईने लक्ष ठेवावे, असे निर्देश दिल्याचे सीतारामन यांनी स्पष्ट केले.

मंगळवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती १०० डॉलर प्रतिबॅरलजवळ पोहोचल्या आहेत. रशियाने युक्रेनमध्ये सैन्य पाठविल्याच्या बातम्यानंतर इंधनाच्या दरात अधिकच वाढ झाली. सप्टेबर २०१४ सालानंतर इंधन तेलाच्या किंमती ९९ डॉलर्स प्रतिबॅरलच्या पुढे पोहोचल्या. रशिया हा इंधन तेलाचे उत्पादन घेणारा जगातील प्रमुख देशांपैकी एक असून एकूण जागतिक इंधन तेलाच्या उत्पादनापैकी १० टक्के उत्पादन एकटा रशिया करतो. प्रामुख्याने युरोपिय देशात रशियातून इंधन तेल व नैसर्गिक वायूची निर्यात होते. भारत रशियामधून करीत असलेल्या इंधन तेलाची आयात तुलनेने खूप कमी आहे. २०२१ सालात भारताने रशियातून ४३ हजार ४०० बॅरल प्रती दिवस इतके इंधन तेल आयात केले. हे प्रमाण भारत आयात करीत असलेल्या इंधन तेलाच्या एक टक्का इतके आहे. मात्र जागतिक स्तरावर रशिया-युक्रेनमधील तणावामुळे इंधनाच्या किंमती अधिकच भडकल्या आहेत. त्यामुळे भारताचा इंधन आयातीवरील खर्च वाढणार आहे.

या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी पार पडलेल्या ‘एफएसडीसी’च्या बैठकीचे महत्त्व वाढते. मुंबईत या बैठकीसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उपस्थित होत्या. या बैठकीनंतर त्यांनी ‘एफएसडीसी’च्या बैठकीत युक्रेन व कच्च्या तेलाच्या किंमतींमुळे देशासमोर उभ्या राहिलेल्या आव्हानांवर चर्चा झाल्याचे स्पष्ट केले. कच्च्या तेलाच्या आंरराष्ट्रीय बाजारात वाढत असलेल्या किंमतींनंतर इंधन कंपन्या इंधनाच्या किरकोळ किंमतीबाबत निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमती देशाच्या आर्थिक प्रगती व स्थैर्यासाठी अडथळ्याच्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये आणखी किती वाढ होईल, हे सांगणे कठीण आहे, असे त्यांनी स्पष्ट केले व याबाबत वाटणारी चिंता दर्शवली.

इंधन तेलाच्या किंमतीबरोबर युक्रेन व रशियामधील तणाव हासुद्धा चिंतेचा विषय आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. युक्रेन मुद्यावर राजनैतिक मार्गाने तोडगा निघायला हवा, असे सीतारामन म्हणाल्या. युक्रेन प्रश्‍नाचा भारताच्या व्यापारावर परिणाम झालेला नाही. पण सरकार या भूराजकीय तणावाकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे. भारताच्या निर्यातीवर याचा विपरित परिणाम होणार नाही, यासाठी दक्षता घेतली जात असल्याचे अर्थमंत्री सीतारामन यांनी स्पष्ट केले.

या बैठकीला आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास, सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी, अर्थसेवा सचिव संजय मल्होत्रा, महसूल सचिव तरुण बजाज, आर्थिक व्यवहार सचिव अजय सेठी, अर्थ सचिव टी. व्ही. सोमनाथ आणि अर्थराज्यमंत्री भागवत कराड सहभागी झाले होते.

leave a reply