रशिया सचोटीने भारताला अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरवित आहे

- रशियाच्या राजनैतिक अधिकार्‍यांचा दावा

नवी दिल्ली – ‘रशियासाठी भारत हा निकटतम मित्र आणि सहकारी देश आहे. युक्रेनच्या मुद्द्यावर भारताने स्वीकारलेल्या भूमिकेचा रशिया आदर करतो. भारताला अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरविण्याबाबत रशियाने नेहमीच सचोटीची भूमिका स्वीकारली होती. यापुढेही उभय देशांमधील सहकार्य असेच अबाधित राहील’, असा विश्वास भारतातील रशियन दूतावासाचे व्यवस्थापक रोमन बाबुश्कीन यांनी व्यक्त केला.

अत्याधुनिक तंत्रज्ञानकाही तासांपूर्वीच अमेरिका आणि युरोपिय देशांनी युक्रेनच्या प्रश्‍नावरून रशियावर निर्बंध जाहीर केले आहेत. या निर्बंधांचा परिणाम भारत-रशियातील सहकार्यावर होऊ शकतो, असे काहीजणांचे म्हणणए आहे. त्यावर भारतातील रशियन राजनैतिक अधिकार्‍यांची ही प्रतिक्रिया आली आहे

रशिया हा भारताचा पारंपरिक सहकारी मित्रदेश आहे. तर गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेनेही भारताबरोबर धोरणात्मक सहकार्य प्रस्थापित केले आहे. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताने युक्रेनच्या प्रश्‍नावर अमेरिकेच्या भूमिकेचे समर्थन करावे अशी बायडेन प्रशासनाची अपेक्षा आहे.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी यासाठी भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्नही केला होता. पण संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत युक्रेनच्या मुद्द्यावर भारताने तटस्थ भूमिका स्वीकारलेली आहे. गेल्या आठवड्यात राष्ट्रसंघाच्या बैठकीत रशियाविरोधी ठरावावर कुणाच्याही बाजूने किंवा विरोधात मतदान न करता भारताने अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला होता.

रशियाने भारताच्या भूमिकेचे स्वागत केले होते. अमेरिका आणि युरोपिय देशांनी रशियावर निर्बंध लागले असले तरी त्याचा परिणाम भारत-रशिया सहकार्यावर होणार नसल्याचा विश्वास बाबुश्कीन व्यक्त करीत आहेत. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात भारत आणि रशिया यांच्यात झालेल्या टू प्लस टू बैठकीत ठरल्याप्रमाणे उभय देशांमधील सहकार्य नव्या उंचीवर जातील, असे बाबुश्कीन पुढे म्हणाले.

दरम्यान, अमेरिकेने रशियावर कडक आर्थिक निर्बंधांची घोषणा केली असून युरोपिय देश देखील अमेरिकेला या आघाडीवर साथ देत आहेत. अशा परिस्थितीत रशियाबरोबर सहकार्य कायम ठेवून अमेरिका तसेच युरोपिय देशांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध राखण्याची कसरत भारताला करावी लागणार आहे. भारताने याची तयारी केली असून कुठल्याही परिस्थितीत आपल्या परराष्ट्र धोरणाचा समतोल ढळू देणार नाही, असे स्पष्ट संकेत भारताकडून दिले जात आहेत.

leave a reply