इस्रायलवर आरोप करणार्‍या राजदूताची रशियाकडून पाठराखण

मॉस्को – इराण किंवा हिजबुल्लाह नाही, तर आखातातील तणावाला इस्रायल जबाबदार असल्याचा ठपका रशियाच्या इस्रायलमधील राजदूतांनी ठेवला होता. त्यावर इस्रायलकडून संतप्त प्रतिक्रिया उमटली. इस्रायलने रशियाचे राजदूत ‘राजदूत अन्तोली विक्टोरोव्ह’ यांना या प्रकरणी समन्स बजावले. मात्र रशियाने आपल्या राजदूताचे समर्थन केले असून इस्रायल या प्रकरणी नको तितकी संवेदनशीलता दाखवित असल्याचा शेरा मारला आहे.

‘इराण किंवा हिजबुल्लाहकडून इस्रायलवर हल्ले चढविले जात नाहीत. तर इस्रायल सिरियाच्या हद्दीचा भंग करून हल्ले चढवित आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य असलेल्या दुसर्‍या देशाच्या हद्दीत शिरून इस्रायलने चढविलेले हे हल्ले नियमांचा भंग करणारे आहेत. यामुळे आखाती क्षेत्रात तणाव निर्माण झाला आहे’, असे रशियाचे राजदूत विक्टोरोव्ह म्हणाले होते. या व्यतिरिक्त हिजबुल्लाहने इस्रायलच्या सीमेजवळ भुयारी मार्ग खोदल्याचा कुठलाही पुरावा नसल्याचा आश्‍चर्यजनक दावा रशियन राजदूतांनी केला होता.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या निरिक्षकांनी फार आधीच हिजबुल्लाहने खणलेल्या भुयारी मार्गांवर चिंता व्यक्त केली होती. पण रशियन राजदूतांनी आपल्या मुलाखतीद्वारे हिजबुल्लाहला आरोपमुक्त केल्याचे दिसत आहे. एका इस्रायली वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत रशियन राजदूतांनी केलेली टीका इस्रायलने अत्यंत गांभीर्याने घेतली. याचे फार मोठे पडसाद उमटले असून इस्रायलने या प्रकरणी रशियन राजदूतांना समन्स बजावले.

इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयातील राजकीय धोरणांचे संचालक एलोन बार यांनी रशियाच्या राजदूतांना खडसावले होते. इराणसंलग्न हिजबुल्लाह ही दहशतवादी संघटना असल्याची आठवण बार यांनी रशियन राजदूतांना करुन दिली होती. त्याचबरोबर इराण तसेच हिजबुल्लाहने इस्रायलच्या विनाशाच्या घोषणा दिल्या होत्या, याची आठवण बार यांनी करून दिली. रशियन राजदूतांची विधाने मर्यादा ओलांडणारी आणि आखातातील वास्तवाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणारी असल्याचे ताशेरे इस्रायलने ओढले होते.

आखातातील सत्य जाणून घेण्यासाठी रशियाने अशी चिथावणीखोर विधाने करण्यापेक्षा द्विपक्षीय चर्चा करावी, असे बार यांनी विक्टोरोव्ह यांना बजावले होते. इस्रायलचे परराष्ट्रमंत्री गाबी अश्केनाझी यांनी देखील रशियन राजदूतांचे आरोप इस्रायल कधीही खपवून घेणार नसल्याचे स्पष्ट केले होते. इस्रायल सरकारने आपल्या राजदूताची कानउघडणी करण्याच्या तब्बल दहा दिवसानंतर रशियाने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

रशियान परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोव्हा यांनी सदर मुलाखतीवर इस्रायलची प्रतिक्रिया अति संवदेनशील असल्याची टीका केली. आपल्या राजदूताने आखाताबाबत मांडलेली भूमिका, याआधीही रशियाने इस्रायलच्या बरोबर केलेल्या वेगवेगळ्या चर्चेदरम्यान मांडली होती. आपल्या राजदूताच्या भूमिकेपेक्षा रशियाची भूमिका वेगळी नसल्याचे झाखारोव्हा म्हणाल्या. तर रशियाने याआधीही आखातातील शांती व स्थैर्यासाठी पॅलेस्टाईनचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला होता. आताही हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी रशिया आपली भूमिका पार पाडू शकतो, असे रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या झाखारोव्हा यांनी स्पष्ट केले. हे सांगत असताना इस्रायलच्या सिरियातील हवाई हल्ल्यांमुळे या क्षेत्रातील अस्थैर्य वाढल्याचा गंभीर आरोप झाखारोव्हा यांनी केला.

दरम्यान, इस्रायलच्या कठोर भूमिकेने रशिया अस्वस्थ झाल्याचे दिसत आहे. म्हणूनच रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या प्रतिक्रियेवरून हे उघड होत आहे. याआधीही इस्रायलच्या सिरियातील हवाई हल्ल्यांच्या विरोधात रशियाने ठाम भूमिका स्वीकारली होती. तसेच इराणबाबत इस्रायलने स्वीकारलेली भूमिका रशियाला मान्य नसल्याचेही वेळोवेळी स्पष्ट झाले होते.

leave a reply